Monday, January 22, 2024

Kolhapur-Sangli Ramling Temples : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 'या' राममंदिर आणि रामलिंग स्थळांना भेट दिलीय का?

 


कोल्हापूर जिल्ह्यात रामलिंग नावाची अनेक ठिकाणे आहेत. आज आपण काही प्रसिद्ध रामलिंग मंदिरांची माहिती पाहणार आहोत. खूप कमी खर्चात तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. शिवाय एक रामलिंग आणि परिसर पाहण्यासाठी एका दिवसाचा कालावधी पुरेसा ठरतो. सर्व ठिकाणे डोंगराच्या कुशीत, धबधबे, खळखळणारे झरे आणि हिरव्यागार निसर्गात पाहता येतात. 

हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ रामलिंग (Ramling) म्हणून असेच एक स्थान आहे. रामलिंग नावाची अनेक ठिकाणे आहेत.

गगनबावड्यातील रामलिंग -  

कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि हिरवाईने नटलेला परिसर म्हणजे पळसंबे. पळसंबे (ता. गगनबावडा) येथील रामलिंग मंदिर आणि गुहेतील शिवलिंग अशी दोन क्षेत्र. (Kolhapur-Sangli Ramling Temple ) याठिकाणी देशभरातील पर्यटक भेटी द्यायला येतात. निसर्गाचा अद्भूत चमत्कार म्हणावा, असे हे ठिकाण. इथे गेल्याशिवाय या चमत्काराची प्रचिती येणार नाही. त्यामुळे तुम्ही इथे कुटुंबासह किंवा सोलो ट्रीपदेखील करू शकता. (Kolhapur-Sangli Ramling Temple )

गगनबावडा तालुक्यात पळसंबे गावामध्ये रामलिंग गुहा आणि मंदिर आहेत. येथील आकर्षण म्हणजे पावसाळ्यात धो-धो वाहणारा धबधबा, दाट धुके आणि उन्हाळ्यातदेखील गारवा देणारे ठिकाण. हे ठिकाण पांडवकालीन लेण्यांसाठीही प्रसिद्ध आहेत. अखंड शिळेमध्ये कारलेले रामलिंग हे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. 

 रामलिंगचा धबधबा आणि रामलिंग गुहेत पडणारे पाणी एक वेगळी अनुभूती देऊन जाते. या गुहेत पाणी कमी असताना जाता येते. गुहेच्या दगडांमधून पाझरणारे पाणी अंगावर झेलत शिवलिंगाचे दर्शन गुहेत करता येते. गुहेत काळोख असल्यामुळे येथे जाताना मोबाईलची टॉर्च अथवा मोठी टॉर्च घेऊन जावे. खळखळणाऱ्या नितळ पाण्यातून मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे, अविस्मरणीय आहे. 

पळसंबे रामलिंग स्थळी कसे जाता येईल? 

कोल्हापूर शहरापासून ४२ किलोमीटर अंतरावर पळसंबे गाव आहे. कोल्हापूर-बालिंगा-कळे मार्गे पळसंबे. पळसंबे गावापासून डावीकडे ३ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून या ठिकाणी चारचाकी-दुचाकी जाते. आडबाजूला हे रामलिंग असल्यामुळे नीरव शांतता, हिरवागार निसर्ग आणि धार्मिक पर्यटन अशी ओळख ठरली आहे. येथे बौद्धकालीन लेणी असल्याचेही म्हटले जाते. (Kolhapur-Sangli Ramling Temple )

गगनगिरी महाराजांचे मठ - 

हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात असले तरी त्यास व्यावसायिक रूप देण्यात आलेले नाही. याठिकाणी अनेक पर्यटकांसोबत शाळेच्या सहलीदेखील भेट देण्यास येतात. या रामलिंग ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे गगनगिरी महाराजांचे बाजूलाच मठ आहेय या मठाचा विस्तीर्ण परिसर असून अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. तुम्ही याठिकाणी बसून जेवणाचा आस्वाददेखील घेऊ शकता. 

काय खाता येईल? 

पळसंबे गावात खाण्याची कोणतीही सोय नाही. इथे जाताना देखील पिण्यासाठी पाणी घेऊन जावे. पण, पळसंबेपासून पुढे गेल्यानंतर गगनबावड्याचे मुख्य ठिकाण एसटी स्टॅण्डजवळ शाकाहारी जेवण मिळू शकते.

 शिवाय, नाष्टा, चहा-पाण्याची अनेक दुकाने इथे आहेत. 

आळते रामलिंग - 

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ रामलिंग आहे. रामलिंग नावाची अनेक ठिकाणे आहेत. आळते गावात डोंगराच्या कुशीत दडलेलं रामलिंग. याठिकाणी गेला तर तुम्हाला मंदिराच्या बाहेर गोमुखातून सतत पाण्याची धार पडताना दिसेल. येथील पाणी कधीच आटत नाही. १२ महिने २४ तास ही धार सुरु असते. रामलिंगच्या गुहेतून गेल्यानंतर शिवपिंड आहे, या शिवपिंडीवर गुहेतील काळ्या दगडातून झिरपणारे पाणी पडत असते. संपूर्ण गुहेत दगडांमधून पाझरणारे पाणी, गारवा आणि मनाला समाधान देते. 


हे पाणी अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरे आणि पाण्याचे कुंड आहेत. विठोबा रखुमाईची मूर्ती, धुनी अग्निकुंड, पार्वती, गणपती, वीरभद्र, कालभैरव यांच्या मूर्ती आहेत. सप्तर्षीच्या नावाची मंदिरे आणि दगडी धर्मशाळा देखील आहे. कोल्हापूरपासून गेल्यास एका दिवसात ही ठिकाणे पाहून होतात. या मंदिर परिसरात धुळोबा जागृत देवस्थान मंदिरही आहे. 

याशिवाय काय पाहता येईल? 

बाहुबली (कुंभोज) हे जैन धर्मीयांचे कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. जहाज मंदिर आणि संग्रहालय, पद्मावती मंदिर, आलमप्रभू डोंगर, आळते. 

काय खाल? 

याठिकाणी शुद्ध सात्विक जेवणाचे हॉटेल आहेत. पाणी, मुलांसाठी खाऊची छोटी दुकानेदेखील आहेत. 

बहेतील रामलिंग -  

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीमध्ये रामलिंग नावाचे बेट आहे. या बेटावर शिवपिंड आणि रामाचेही स्थान आहे. हे क्षेत्र ‘बहेचा मारुती’ म्हणूनही ओ‍ळखले जाते. मारुतीचे क्षेत्र म्हणजे बहे बोरगाव हे खूप निसर्गरम्य ठिकाण आहे. बहे रामलिंग बेटावर कसे जाता येईल पाहा. 

बहे रामलिंग स्थळी कसे जाता येईल?

कोल्हापूरहून जायचे असल्यास एनएच ४ हायवेवरून तुम्हाला सर्वात आधी इस्लामपूरमध्ये जावे लागेल. येथून सहा किलोमीटरवर बहे गाव आहे. या गावच्या अलिकडेच डाव्या बाजूने बंधारा असून तेथून थोड्या अंतरावर चालत जावे लागते, जिथे कृष्णेच्या नदीमध्य़े रामलिंग बेट आहे. 

काय खाल? 

इस्लामपूर शहर मोठे असल्यामुळे याठिकाणी जेवणाची सर्व सोय उपलब्ध आहेत. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स उपलब्ध आहेत. 

शिवाय तुम्हाला इस्लामपूरमधील राजाराम नगर येथे प्रभू श्रीरामांचे मोठे मंदिर आहे. येथे रामनवमीला मोठी  यात्रा भरते.


Friday, January 19, 2024

Raigad Explore : जिजाऊंचे पाचाड-शिवरायांच्या रायगडला गेला का?

स्वर्गसुख’ ज्याला म्हणतात, ते म्हणजे ‘दुर्गराज रायगड’ होय. आयुष्यात एकदा तरी ‘रायगडवारी’ करावी. जमलचं तर रायगडचा किल्ला डोंगराच्या पायथ्यापासून चालत सर करावा. पावसाळ्यानंतरचा रायगड किल्ला डोळ्यांनी पाहणं म्हणजे सुवर्णपर्वणीच होय. (Raigad Explore ) तुम्ही सोलो ट्रिप किंवा फॅमिली ट्रिपदेखील करू शकता. दाट धुक्यातील रायगड, वेगाने वाहणारं वारं आणि क्षणाक्षणाला बदलणारे हवामान पाहूनचं रायगड किती भव्य आणि दिव्य आहे, याची प्रचिती येते.


रायगडला रस्त्यावरून जाताना हा केवळ डोंगर आहे, असे वाटते. पण, त्याच भव्य डोंगराच्या माथ्याला गेल्यानंतर दिव्यत्वाची अनुभूती येते. रायगडला भेट देणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. तुम्हाला चालत जायचे असेल तर २ दिवसांचा वेळ काढून जावं लागेल. किंवा रोप वेतून जाण्य़ाचा पर्यायदेखील तुम्ही स्वीकारू शकता.

रायगड किल्ला –

इतिहासामध्ये रायगड किल्ल्याची एक खास ओळख आहे. रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ होते. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे महत्त्व पाहून १६ व्या शतकात आपल्या राज्याची राजधानी बनविली.

शिवरायांचा शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाच्या भूमीला आयुष्यात एकदा तरी भेट नक्की द्यावी. दुर्गम, अजिंक्य अशा रायगडला जाण्याचा अनुभव पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात घ्यावा.

रायगड किल्यावर काय पाहाल?

शिवाजी महाराजांची समाधी, जगदिश्वर मंदिर, हत्ती तलाव, खुबलढा बुरूज, चोरदिंडी, हिरकणी बुरुज. (हिरकणी गावात अद्यापही हिरकणीचे वंशज राहतात)

नाणे दरवाजा, महादरवाजा, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, उंच मनोरे, बाजारपेठ, नगारखाना, रत्नशाळा, राजभवन, राजसभा, शिरकाई देऊळ, कुशावर्त तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक.

कुठे राहाल?

रायगडाच्या डोंगरावर राहण्यासाठी धर्मशाळा आहे. तेथे टेंटमध्येदेखील राहण्याची सोय होते. रायगडाच्या पायथ्याशी राहायचे असेल तर अनेक होम स्टे आणि हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस उपलब्ध आहेत.

काय खाल?गडावर छोटी हॉटेल्स आणि खाऊ मिळण्याची छोटी दुकाने आहेत. यातून स्थानिकांना रोजगार प्राप्त होतो. रायगडाच्या पायथ्याला, अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि घरगुती जेवण मिळते.

यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे जेवण मिळते. चहा नाष्टादेखील येथे उपलब्ध होतो.


रोप वेची सुविधा –

दुर्गराज रायगड चढण्यासाठी कठीण वाटतो. पण ज्यांना चालायला जमत नाही ते रोप वे मधून जाऊ शकतात. रोप वेची व्यवस्था रायगडच्या पायथ्याशी आहे. माणसी ४०० ते ५०० रुपयांचे तिकिट या रोप वे साठी मोजावे लागतात.

पावसाळ्यात रायगड डोंगर परिसरातील जोरात वारे वाहून हवामान बदलते, त्यामुळे काही वेळा रोप वेची वाहतूक थांबवण्यात येते.

त्यामुळे अशा काही प्रसंगात वस्ती राहण्याची तयारी ठेवूनच रायगडला जावे. रायगड पायथ्यापासून तीन हजार फूट उंचीवर आहे. त्यामुळे रोप वेतून जाताना भव्य रायगडचा डोंगर, हिरवीगार सृष्टी, शेती-वने, घरे आणि सभोवतालचा निसर्ग आपल्याला सुखद क्षण देऊन जातो.

ट्रेकर्ससाठी सह्याद्रीतील सुखद अनुभव – सह्याद्रीचे कणखर डोंगर, दर्‍याखोऱ्या आणि जंगलातून निघणारा मार्ग शोधणार्या ट्रेकर्ससाठी रायगडवारी म्हणजे सुखद धक्का असतो. अनेक ट्रेकर्स रायगड सर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. ((Raigad Explore) )

कोणत्या कालावधीत जाल?

रायगडला जाण्यासाठी पावसाळा संपत असताना किंवा संपल्यानंतरचा कालावधी उत्तम आहे. रायगडच्या डोंगरावरून पडणारे फेसाळणारे अनेक धबधबे चटकन लक्ष वेधून घेणारे असतात.

सोबत हिरवागार शालू पांघरून डोंगर ऐटीत उभारलेला दिसतो. त्यामु‍ळे रोप वे मधून जात असताना नयनरम्य अनुभूती येते.

कसे जाल रायगडला? 

मुंबईहून गोवा महामार्गाने माणगाव पार केल्यानंतर डावीकडे रायगडला जाणारा रस्ता आहे. महाडमार्गे रायगड १८५ किलोमीटर आहे

माँ जिजाऊंचे पाचाड –

रायगड किल्ल्यावरील थंड हवामान राजमाता जिजाऊ माँसाहेबांना मानवत नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचाड येथे भव्य राजवाडा बांधला होता. हा राजवाडा म्हणजे जिजामातांचे निवासस्थान होते.

पाचाडमधील जिजाऊंचे निवासस्थान

रायगडाला भेट दिल्यानंतर किल्ल्याच्या पायथ्याशी काही अंतरावर राजमाता जिजाऊंची समाधी आहे. ते गाव पाचाड होय. इथे जिजाऊंचे निवासस्थान असलेल्या राजवाड्याचे अवशेषदेखील पाहायला मिळतात.

पाचाड गावात उजवीकडे जिजाऊंचे निवासस्थान असलेला राजवाड्याचे अवशेष कितीतरी एकरात पाहायला मिळतात.

संपूर्ण दगडी बांधकाम असलला चौथरा, स्वयंपाक घर, घोडे बांधण्याची जागा, विहिरी, तटबंदी, चौकी पहारे, मुख्य इमारत, इतर छोट्या इमारती असे अवशेष पाहायला मिळतात. त्या निवास्थानाला ‘कोट’ असे म्हणतात. येथून ‘दुर्गराज’ रायगडचा दिमाखात उभा असलेला डोंगर नजरेस भरतो.

राजमाता जिजाऊंची समाधी

राजमाता जिजाऊंचे निवासस्थान असलेला राजवाडा पाहिल्यानंतर तिथून काही अंतरावर जवळच जिजाऊंची समाधी पाहायला मिळते. विस्तीर्ण जागेत असलेल्या समाधीच्या परिसरात नीरव शांतता आहे. सभोवताली हिरवेगार झाडे आणि मैदान परिसर आहे. ((Raigad Explore) )

कसे जाल पाचाड?

मुंबईहून माणगावमार्गे पाचाड हे अंतर १५७ किलोमीटर आहे.

गांधारपाले लेणी

डोंगरावर कोरलेली ही लेणी हायवेला लागूनच आहेत. लेण्यापर्यंत जायला पायऱ्या आहेत. ही लेणी गांधारपाले या गावाला लागून असलेल्या टेकडीवर आहेत. पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर ही लेणी आहेत. लेणी समूहात एकूण २८ लेणी असून त्यात ३ चैत्यगृह आणि १९ विहार आहेत. पायऱ्या चढण्यासाठी जवळपास २५ मिनिटे लागतात.

कसे जाल गांधारपाले लेणी पाहायला?

लेणी रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवेवर (NH 17) महाड शहरालगत आहे. मुंबईपासून अंतर १७५ कि.मी. आहे.

चिपळूण परशुराम मंदिर –

खरंतर परशुरामाचे हे मंदिर महेंद्रगिरी नावाच्या डोंगरावर स्थित आहे. पण येथे पायथ्यापर्यंत गाडी जाते. गावातील परशुरामाच्या मंदिरामुळे गावाला परशुराम म्हणतात. या मंदिरात काळ, काम आणि परशुराम यांच्या तीन मूर्ती आहेत. परशुरामांची मूर्ती थोडी उंच असून आकर्षक आहे. मंदिराची स्थापत्यशैली वेगळी आहे. लाकडी बांमधकामावर सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. येथे परशुराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गावात तीन दिवस हा उत्सव असतो. शानदार वास्तूशिल्प आणि मंदिरावर हिंदू-इस्लामिक स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसतो. या मंदिराची निर्मिती जवळपास ३०० वर्षापूर्वी ब्रह्मेन्द्र स्वामी यांनी केल्याचे म्हटले जाते.हे मंदिर शांत परिसरात आहे. परशुराम मंदिराच्या मागे रेणुका देवीचे मंदिर आहे. रेणुकामंदिर आणि परशुराम मंदिर यांच्यामध्ये बाणगंगा कुंड आहे. कुंडाच्या पलीकडे गंगामातेचे मंदिर आहे. या मंदिर परिसरात नक्षत्र गार्डनदेखील आहे. परशुराम मंदिराच्या जवळच ग्रामदेवी जाखमातेचे मंदिर आहे.

कसे जाल परशुराम मंदिर?

चिपळूणपासून ४ किलोमीटर अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर हे मंदिर आहे. चिपळूणमध्ये लोटे औद्योगिक भागात डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने परशुराम मंदिराकडे जाता येते. चिपळूण शहरातूनसुद्धा रिक्षाने मंदिराकडे जाता येते. चिपळूण शहराच्या अलीकडे दहा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता अरूंद आहे. पण तिथे चारचाकी गाडी जाऊ शकते. हे मंदिर सहजासहजी नजरेस पडत नाही. पुढे पुढे गेल्यानंतर परशुरामाचे मोठे मंदिर दिसते. येथे गाडी पार्क करण्यासाठी मैदान आहे.


 https://pudhari.news/features/693043/maharashtra-explore-raigad-fort-pachad-jijamata-rajwada-village-chiplun-parshuram-temple-gandharpale-caves/ar

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...