Friday, January 27, 2023

शिरोड्याला जाताय? मग, तुम्ही न पाहिलेल्या 'या' ठिकाणांना भेट नक्की द्या


  गोवा पाहून कंटाळा आलाय? तर मग शिरोड्याला जा!. तुम्ही म्हणाल, आम्ही शिरोड्यालादेखील जाऊन आलोय. पण, शिरोड्याला पुन्हा एकदा जा, असं आम्ही आपल्याला सूचवू. कारण, शिरोडा बीचशिवाय, या परिसरातील काही अन्य स्थळे पाहण्यासारखी आहेत. कदाचित ही स्थळे तुम्ही कदाचित पाहिली नसतील. ती कोणकोणती स्थळे आहेत आणि तेथे कसे जाता येते, याविषयीची माहिती आम्ही येथे देत आहोत. 

शिरोडा हे महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील एक ठिकाण आहे. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव असून सुंदर समुद्रकिनारा लाभलेले प्रेक्षणीय स्थळ आहे. बीचवर किंवा समुद्री किनारी जायचं म्हटलं की, किती उत्साह असतो आपला! मासे, वडा कोंबडा, सी-फूड, घावण, सोलकडी विथ चिकण....मस्तचं...खायला मिळणार. मग, बोटींग, पॅराग्लायडींग करत समुद्राची सफारी त्याशिवाय खळखळत्या समुद्राच्या लाटांवर पोहायचं!...किती किती त्या इच्छा. समुद्राबरोबरचं जर तुम्हाला आणखी काही प्रेक्षणीय ठिकाणं पाहायला मिळाली तर? मग चला तर जेव्हा तुम्ही शिरोडा बीचवर जा, तेथून अगदी जवळ काही अंतरावर अनेक सुंदर ठिकाणं आहत, जे तुम्हाला पाहता येतील. फार वेळ आणि पैसाही खर्चिक होणार नाही. पण, विलोभनीय आणि आकर्षक अशी ही स्थळ तुम्हाला शिरोड्यात गेल्यानंतर पाहता येतील आणि त्याचा मनमुराद आनंद लुटता येईल.   


शिरोडा बीच : 

येथे समुद्रकिनारी राहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. छोट्या - छोट्या खोल्या किंवा लाकडाची घरं तेही समुद्रासमोर तसेच आजूबाजूच्या परिसरात राहायला हॉटेल्स, रेस्टाॅरंटचीही व्यवस्था आहे. त्यामुळे राहण्याचा, जेवण खाण्याचाही प्रश्न मिटतो. सायंकाळी सूर्यास्त होताना आकाशी पसरलेली सूर्यकिरणे, लाल-केशरी-पिवळ्या रंगछटा आणि मंद वारं ही निसर्गाची उधळण तुम्ही अनुभवायला हवी. त्याचबरोबर येथे समुद्र सफारीही करता येते. बोटीतून समुद्रात जाणे आणि पॅराग्लायडिंगचा येथे अनुभवही येथे घेता येतो. हे फार खर्चिक नसून आपल्याला परवडण्यासारखे आहे.


रेडीचा गणपती :

रेडी गणेश मंदिर हे रेडी बंदराजवळच आहे. रेडी गावातील लोह खनिजाच्या खाणीत १८ एप्रिल, १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मूर्ती सापडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी हे प्रसिध्द ठिकाण. उंच उंच माडाची झाडे, निसर्ग आणि समुद्रकिनाऱ्यालगत असलेलं हे रेडीचा गणेश मंदिर. जागृत देवस्थान अशी ख्याती असल्याने भाविकांचा मोठा ओघ येथे येत असतो. या मंदिरात गणेशाची सुंदर, मनमोहक मूर्ती पाहायला मिळते. शिवाय रेडीचा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर आहे. 

येथे मॅगनीजच्या खाणीही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे लाल मातीचे डोंगर, लाल मातीचे कच्चे रस्ते, नारळ आणि पोफळीच्या बागा आणि यातून वाट काढत गेल्यानंतर रेडी गावात सागरकिनार्‍यालगत यशवंतगड किल्ला मोठ्या डौलाने उभा आहे. अनेक पर्यटकांना माहिती नसतं की, रेडीच्या गणपतीचे दर्शन घेऊन तुम्ही थेट यशवंतगड किल्ल्याला जाऊ शकता. त्याचबरोबर पणजी येथून जवळ आहे. त्यामुळे तुम्हाला आणखी थोडं फिरायचे असल्यास शिरोड्यातून तुम्ही गोव्यात कमी वेळेत पोहोचू शकता.    

यशवंतगड किल्ला : 

मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर जवळपास २ -३ कि.मी अंतरावर यशवंतगड हा किल्ला समोर दिसतो. अगदी छोट्या छोट्या वाटेतून समुद्रालगत असणाऱ्या गिरिदुर्ग प्रकारातील या किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. तसेच चारचाकीदेखील किल्ल्यापर्यंत जाते. येथे पार्किंगसाठी थोडी जागा देखील आहे. महत्त्वाचं म्हणजे हा किल्ला वर चढावा लागत नाही किंवा दमछाक होत नाही. त्यामुळे अगदी लहानांपासून वृध्दापर्यंत हा किल्ला तुम्हाला पाहता येतो. सुरुवातीला एन्ट्री केल्यानंतर टेहळणी बुरूज आणि काही पायऱ्यांशिवाय येथे काहीचं नाही, असं वाटतं. पण, थोडं लांब पाहिलं की, एक मोठं मैदान दिसतं. या मैदानावर मोठ्या प्रमाणात झाडंझुडपं असल्याने पलिकडचा महत्त्वाचा किल्ला दिसत नाही. झाडंझुडपं असले तरी किल्ल्यावर जायला मुख्य रस्ता आहे.  

हा किल्ला लवकर निदर्शनास पडत नाही. कारण आतील परिसर झाडाझुडपांनी वेढलेला आहे. किल्ल्याच्या बाजूंनी खंदक खोदलेले आहे. पण, तटदरवाज्यातून आत गेल्यानंतर बालेकिल्ला लागतो. सुरूवातीला केवळ किल्ल्याचे अवशेष दिसणारे आत गेल्यानंतर लाल रंगाचा किल्ला लक्ष वेधून घेतो. येथे वाड्याचे अवशेषही आहेत. परंतु, पाण्याचा साठा कुठे दिसत नाही.. शिवाय एक छोटे मंदिरदेखील आहे. हा किल्ला रेडीचा यशवंतगड म्हणून ओळखला जातो. हा किल्ला पाहण्यासारखा आहे. आतून किल्ल्याचा परिसर खूप मोठा आहे. आपण, याआधी एखाद्या किल्ल्यावर इतकी मोठी जागा कधीही पाहिली नसेल, अशी रचना येथील आहे. येथे  इ. स. १६३२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याला ‘यशवंतगड’ असे नाव दिल्याची इतिहासात नोंद सापडते. 


तेरेखोल किल्ला - 

तेरेखोल किल्ला हा गोवा राज्यातील एक किल्ला आहे. पण, तो शिरोड्यापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेवरील या किल्ल्याचे रुपांतर हेरिटेज रिसॉर्टमध्ये केले गेले आहे. त्यामुळे किल्ल्याचे संवर्धन झाले आहे. किल्ल्यावर हॉटेल जरी झाले असले तरी पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी हॉटेलमध्ये जाता येते. तटबंदी दुरुस्त करून येथे रंगरंगोटी करण्यात आली आहे. किल्ल्यामध्ये सेंट अँथोनी चर्च सुस्थितीत आहे. तेरेखोलच्या खाडीच्या तीरावर सावंतवाडीच्या राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले. त्यानंतर १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडाच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यात काही बदल केले. त्यानंतर मराठे आणि नंतर पुन्हा पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. किल्ल्याच्या तटबंदीवरुन तेरेखोलच्या खाडीचे आणि पलीकडे असणाऱ्या गोव्याच्या माडबनांचे विहंगम दृश्य दिसते. 

याशिवाय सिध्देश्वर मंदिर, सोनुर्ली मंदिर, तसेच सागरतीर्थ बीच, आरवली बीच ही ठिकाणेदेखील पाहता येतील. 

कसे जाल : 

शिरोडा : सावंतवाडीतून शिरोडा गावात जाता येते.

रेडीचा गणपती : रेडीला येण्यासाठी वेंगुर्ल्याहून बसची सोय आहे. तसेच मालवणमधून रेडीपर्यंतही जाता येते. 

यशवंतगड : रेडी गावातून तीन-चार किलोमीटर अंतरावर यशवंतगड आहे. रेडी गावातून १५ मिनिटे पायी चालत किंवा थेट गाडीदेखील गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते. 

तेरेखोल किल्ला : तेरेखोलला जाण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून दोन मार्ग आहेत. महाराष्ट्रातून जाताना वेंगुर्ले, रेडी मार्गे तेरेखोलला पोहोचता येते. गोव्यातून येताना पणजी, हरमल, केरी मार्गे यावे लागते. 


             न्याहरी निवास योजना - 

न्याहरी निवास योजना ही एमटीडीसीअंतर्गत येते. स्वस्तात मस्त असणाऱ्या या योजनेंतर्गत पर्यटकांसाठी अत्यंत माफक दरात राहण्याची व्यवस्था केली जाते. स्थानिक घरांमधील कुटुंबे पर्यटकांसाठी राहण्याची, जेवणाची सोय करते. यासाठी येथील घरांना परवाना दिला जातो. एमटीडीसी त्याचं मार्केटिंग करतं. लॉज, हॉटेल्सपेश्रा कमी दरात घरगुती पध्दतीचा उत्तम नाष्ता, जेवणाची सोय केली जाते. येथे सुरक्षितता आहे. त्यामुळे पर्यटकांना घरातच झोपण्यासाठी सोय केली जाते. विशेष म्हणजे येथे स्वच्छता असते. त्यामुळे शिरोड्यात गेल्यानंतर हॉटेल शोधण्यासाठी फार धावपळ होत नाही. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५० न्याहरी निवास योजनेची व्यवस्था उपलब्ध आहे.


               

No comments:

Post a Comment

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...