Friday, January 27, 2023

Ratnagiri best Tourism : राजापुरात पाहायला जा 'ही' अद्भूत ठिकाणे


रत्नागिरीत अनेक प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत. खूप सारे पर्यटक समुद्र किनारी जायला पसंती देतात. खळखळत्या समुद्रकिनारी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. पण, रत्नागिरीमध्ये अशी काही ठिकाणे आहेत, जिथे फार कमी लोक जातात किंवा तेथे फार गर्दी नसते. अशाच काही उत्तम ठिकाणांविषयीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Ratnagiri best Tourism) राजापूर, कसबा, संगमेश्वर, जुवे बेट आणि तुम्ही कादाचित या ठिकाणी कधी गेला नसाल अशा स्थळांबद्दल आम्ही सांगणार आहोत. लाँग ड्राईव्हसोबत वेगळी कला-संस्कृती आणि कोकणचा साद घालणारा निसर्ग यांचा तिहेरी संगम या रत्नागिरीच्या ट्रीपमधून तुम्हाला अनुभवता येईल. यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. यानंतर तुम्ही या ठिकाणांना नक्कीच भेट द्याल! तुमच्या नेहमीच्या टूरपेक्षा ही हटके टूर असेल. (Ratnagiri best Tourism)

राजापूरची गंगा - देवगिरीच्या यादव काळापासून राजापूर ही प्रसिद्ध व्यापारी पेठ होती. रत्नागिरी जिल्ह्यातील 'राजापूरची गंगा' तीर्थस्थानला खूप महत्त्व आहे. ऐतिहासिक काळापसून या ठिकाणाला महत्त्व आहे. जमिनीत असलेल्या १४ कुंड अचानक पाण्याने भरून जातात. सामान्यपणे तीन वर्षांतून एकदा राजापूरची गंगा अवतरते. साधारणपणे तीन महिने ही गंगा थांबते. गंगेचे दर्शन घेऊन स्नान करण्यासाठी येथे भाविक गर्दी करतात.

कसे जाल - बालिंगे- घरपण - साळवण - असळज-गगनबावडा-भूईबावडा घाट-तिरवडे तर्फ खारेपाटण-मेहबूबनगर-कोळपे-तीथवली-मुंबई-गोवा हायवे- पनवेल कोची कन्याकुमारी हायवे-हातखंबा गोवा रोड-राजापूर गाव-राजपूरची गंगा.

उन्हाळे - गरम पाण्याचे झरे येथे आढळतात. उन्हाळे हे राजापूर तालुक्यातीस गाव आहे. या गावात प्रसिध्द महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. या मातेच्या चरणापासून झऱ्याची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. येथे १२ महिने गरम पाण्याचे झरे प्रवाहित होतात. राजापूर तालुक्यात असे अनेक छोटे-छोटे गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात.

 उन्हाळे गावातील महालक्ष्मी मंदिरासमोर एक कुंड आहे. या कुंडात गरम पाण्याचे दोन वेगवेगळे झरे आहेत. यास गंगा तीर्थ असे म्हटले जाते. या गरम पाण्याच्या झऱ्यापासून ३०० मीटर अंतरावर श्री. स्वामी समर्थ महाराजांचा मठदेखील आहे. हा मठ पाहण्यासारखा आहे. नारळी, आंबा, पोफळी, फणस या झाडांच्यामध्ये हे गाव वसलेले आहे. 

आजूबाजूला नदी, हिरवागार निसर्ग, रम्य शांत वातावरणात हे मठ आहे. हे मठ कौलारु जांभ्या दगडापासून बनवलेले आहे. गंगा तीर्थ उन्हाळे येथे गंगा ही मूळगंगा, चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुना कुंड, सरस्वती कुंड, गोदावरी कुंड, कृष्ण कुंड, नर्मदा कुंड, कावेरी कुंड, अग्नि कुंड, भीमा कुंड, चंद्रभागा कुंड आणि काशी कुंड या चौदा कुंडाकडे वाहते. यापैकी काशीकुंड आणि मूळ गंगा हे प्रमुख मानले जाते.

कसे जाल - राजापूरची गंगा पासून उन्हाळे गरम पाण्याचे झरे हे दीड किलोमीटरचे अंतर आहे. राजापूरची गंगा- रेल्वेस्टेशन रोड-उन्हाळे गरम पाण्याचे कुंड/हॉट वॉटर स्प्रिंग.

उक्षी ब्रीज - संगमेश्वरला जाताना डाव्या बाजुलाच मुंबई गोवा हायवेला लागून उक्षी ब्रीज आहे. अतिशय सुंदर हे ब्रीज असून कोकण म्हणजे काय? हे इथं अनुभवता येतं. सुंदर वातावरण, नदीवर पुल, आजूबाजूला विस्तीर्ण पसरलेली माडाची झाडे, पोफळीच्या बागा आणि सुपारीचे मळे तुम्हाला निदर्शनास पडतील. फोटोग्राफी करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

कसबा पेठ - कसबा पेठेतून पुढे गेल्यानंतर छोटे संगमेश्वरचे मंदिर आहे. जरा अतिशय सुंदर शिल्पकाम असलेले कर्णेश्वर मंदिर दृष्टीस पडते. येथे जुनी गावे, गावातील जुने घरे, लाकडी वाडे, लाकडी वाड्यांवर केलेले कोरीव काम आणि निरामय शांतता अनुभवता येते. येथील बहुतांशी घराला कुलूप दिसते. जवळ असलेल्या मुंबईच्या ठिकाणी येथील माणसे बहुदा कामासाठी गेली असावीत, असा अंदाज लावता येईल. कसबा गावात सोमेश्वराचेदेखील दगडी बांधकाम असलेले प्राचीन मंदिर आहे.

संगमेश्वर मंदिर - संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरपेक्षाही संगमेश्वर खूप जुनं मंदिर असल्याचे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास 'रामक्षेत्र' असेही म्हटले जाते.

 संगमेश्वरला जाण्यासाठी राजापूरची गंगा ठिकाणापासून अडीच तासांचा रस्ता आहे. सुरुवातीलाच संगमेश्वर हे छोटेखानी महादेवाचं मंदिर दिसतं. नदीच्या किनारी वसलेलं खूप सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे. पण, ५ मिनिटाच्या अंतरावर कर्णेश्वराचं मंदिर आहे. पण, ते सहजासहजी दृश्यास पडत नाही. एका लोखंडी पुलावरून पुढे गेल्यानंतर एखाद्या घराच्या पायऱ्या असल्याप्रमाणे जांभा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक विस्तीर्ण मैदान लागते. या मैदानावर कर्णेश्वराचे प्रसिध्द महादेव मंदिर आहे.

कर्णेश्वर मंदिर - हे महादेवाचे प्रसिध्द मंदिर आहे. कोल्हापुरातील खिद्रापूरच्या मंदिराच्या स्थापत्यशैलीशी मिळते-जुळते असलेले कर्णेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर खिद्रापूरपेक्षाही जुने असल्याचे येथील मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून ओळखते. काही जण हे मंदिर कर्ण राजा (कोल्हापूर) ने बांधले असावे असे म्हणतात. तर काही जण इ.स. १०७५ ते १०९५ या काळात गुजरातच्या चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर गणपती, लक्ष्मी, महिषासूरमर्दिणी, विष्णू अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. 

अतिशय आखीव रेखीव कोरीव काम असलेल्या या मूर्ती भक्तांच्या चटकन लक्ष वेधून घेतात. त्याकाळात इतकी सुंदर शिल्पे कशी काय घडवली असावीत, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. मंदिरात गेल्यानंतर भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आढळते. बाहेर कितीही ऊन पडलेलं असो वा गर्मी असो, मंदिरात पाऊल ठेवताच मनाला आणि शरीराला शितलता वाटते. गर्भगृहात कर्णेश्वराची पिंड आहे. सोबत पार्वतीची मूर्तीही आहे. येथे सुंदर प्रभावळदेखील दिसते.

कसे जाल -१) राजापूर-मांडवकरवाडी-नेरकेवाडी-मुंबई गोवा हायवे-हातखंबा गोवा रोड-पाली फाटा-निवळी घाट-उक्षी ब्रीज साईट रोड- संगमेश्वर रोड-संगमेश्वर मंदिर आणि कर्णेश्वर मंदिर.

२) मुंबई-गोवा महामार्ग-कसबा गाव - संगमेश्वर मंदिर आणि कर्णेश्वर मंदिर.

३) रेल्वेने यायचे असेल तर कोकण रेल्वे आहे. संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ थांबता येते.

४) रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुण्याहून एसटी आहे.

पण, शक्यतो स्वत:ची गाडी असलेली चांगली. यामुळे तुम्हाला जागोजागी थांबून विविध पॉईंट्स पाहता येतात. शिवाय वेळही वाचेल.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक - संगमेश्वरात कसबा या गावात छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे.

छत्रपती संभाजी महाराज स्मारकश्री सप्तेश्वर मंदिर - संगमेश्वरापासून सप्तेश्वर मंदिर हे अंतर सव्वा तासांचे आहे. कुठेही पाहायला मिळणार नाही असा सप्तेश्वराचा मंदिर परिसर आहे. स्वच्छ नितळ पाण्याचे कुंड असलेला हा परिसर हिरवाईने नटलेला आहे.

कसे जाल - संगमेश्वर - मुंबई गोवा हायवे-संगमेश्वर सप्तेश्वर मार्ग- कसबा लावगणवाडी (Kasba lavganwadi) - पुढे आतमध्ये फाटा गेलेला आहे-सप्तेश्वर मंदिर

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे येथील पाण्यातील मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासारखं आहे.

कसे जाल - मुंबई गोवा हायवेवर चिपळूण नंतर सावर्डे बस स्थानक- मल्लिकार्जुन मंदिर

जुवे बेट - राजापूर तालुक्यातील जुवे नावाचे गाव आहे. जुवे बेटाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे ठिकाण सप्तेश्वर मंदिरापासून ५० कि.मी अंतरावर आहे. पावणे दोन तासात हे अंतर कापता येते. या जुवे गावात पारंपरिक पद्धतीची कौलारू घरे आहेत. आंबा, फणस, नारळ, काजूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. गावात आल्हाददायक वातावरण आहे. भौतिक सुख-सुविधांपासून हे गाव दूर आहे. गावात श्री रवळनाथ, श्री सीमराई देवीची मंदिरे आहेत. समुद्रकिनाऱ्यामुळे या गावाचे निसर्ग आणखी बहरले आहे. अर्जुना नदीच्या मुखाशी जुवे बेट असून याठिकाणची शांतता तुम्हाला मोहून टाकणारी आहे.

कसे जाल- सप्तेश्वर मंदिर-कसबा लावगणवाडी-मुंबई गोवा हायवे-शास्त्री पुल-पनवेल कोची कन्याकुमारी हायवे-कोल्हापूर रत्नागिरी रोड-निवखोळ रोड- कर्ला रोड- खालची गल्ली-जुवे.

आणखी काय पाहाल?

  • कोल्हापूरहून जाताना घाटकडा धबधबा पाहू शकता. पुढे व्हयू पॉईंट पाहू शकता.
  • राजापूर गढी, वखार, ब्रिटीश वेअरहाऊस
  • भूईबावडा घाट येथे सनसेट पॉईंट पाहण्यासाठी थांबू शकता.
  • कसबा पेठ येथे गणेश मंदिर, श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर येथे दर्शनासाठी जाऊ शकता.
  • राजापुरात तुम्हाला जितवणे धबधबा, कातळकडा धबधबा (हर्डी) अशा ठिकाणांनाही भेटी देता येतील.
  • हक्रावाने वाडी (Hakrawane Wadi) हे देखील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
  • तसेच कुंभेश्वर, काशी विश्वेश्वर, केदारेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नन्दिकेश (संगम मंदिर), काळभैरव अशा मंदिरांनादेखील भेटी देऊ शकता.
  • तुम्ही प्रसिध्द महादेवाचे मंदिर मार्लेश्वर आणि मार्लेश्वर धबाधबा देखील पाहू शकता.
  • काय खाल?

    मासे, सोलकडी, तांदळाची भाकरी, भात, गोलमा, ऑम्लेट, पोहे, चहा, अंडाकरी, चिकन, गोलमा, चपाती, ताक, शाकाहारी जेवण आदी.

No comments:

Post a Comment

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...