Thursday, June 8, 2023

आता कुठं जायचं? मग, आंबोळगडला जा ना!



तुम्ही रत्नागिरी, साखरपा, गणपतीपुळे, आरेवारे, दापोलीला पर्यटनाला गेला असाल. पण, कधी आंबोळगडाला गेलाय का? तुम्ही म्हणाल, येथे आहे तरी काय? ही पुढील माहिती वाचल्यानंतर येथे जायला तुम्हाला नक्की आवडेल. तर मग, चला आंबोळगडला!...  



आंबोळगड हे नाव आपल्या फारसं परिचयाचं नसलं तरी रत्नागिरी जिल्ह्यातील हे प्रसिध्द ठिकाण आहे. निखळ खळखळणारा अर्धचंद्राकृती समुद्रकिनारा, घेरायशवंतगड, गगनगिरी महाराजांचं मठ, ध्यानकेंद्र, मुसाकाजी बंदर, आंबोळगडचा किल्ला आणि बरंच काही,  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पही या ठिकाणाजवळचं आहे. आंबोळगडाला लागून असलेला अथांग पसरलेला अरबी सुमद्र पर्यटकांना खुणावतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळ यशवंतगडावरून सरळ थेट रस्ता आंबोळगडाला जातो. आंबोळगडापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला काजू आणि आंब्याच्या बागा, फणसाची झाडे आणि दुतर्फा झाडांनी नटलेला निसर्ग पाहता येतो.   


आंबोळगडाला जाताना जी गावे लागतात, तिथे तुम्हाला प्रवासात फार वस्ती, वाहने दिसणार नाहीत. येथील गावेही शांत असलेली तुम्हाला दिसतील. गावातील कर्ते पुरुष हे कामानिमित्त बाहेरगावी असलेले दिसतात.


आंबोळगडचा समुद्रकिनारा -


नेहमी आपल्य़ाला समुद्रकिनारी पिवळी, सोनेरी वाळू दिसते. पण, आंबोळगडच्या समुद्रकिनारी पांढरी आणि काळी वाळू पाहायला मिळते. येथे छोट्या-मोठ्या नौका, होड्यादेखील पाहायला मिळतात. मासेमारीसाठी या होड्य़ा वापरल्या जातात. छोटा समुद्रकिनारा लाभला असला तरी, येथील शांतता मनाला समाधान देऊन जाते. नितळ, स्वच्छ पाणी, भिरभिरणारं वारं आणि सुंदर समुद्रकिनारा तुम्हाला मोहात पाडतो. 


यशवंतगड -


कोकणातील राजापूर तालुक्यातील नाटे गावात श्री किल्ले घेरायशवंत गड नावाचा किल्ला आहे. नाटे गावातून सरळ पुढे चालत गेल्यानंतर डाव्या बाजूला एक भक्कम बुरूज आणि त्याच्या कडेने खंदक असलेलं पाहायला मिळतं. दोन भक्कम बुरुंजामघ्ये प्रवेशद्वार लपलेलं दिसतं. गडावर काही अवशेष, कोरडी विहीर आणि कोठारे पाहायला मिळतात. जैतापूर खाडीच्या काठावर हा किल्ला वसलेला आहे.


गगनगिरी महाराजांचे आश्रम-


एका बाजूला विस्तीर्ण जांभ्याच्या पठारावर श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. आणि दुसऱ्या बाजूला समुद्र. अगदी नीरव शांतता असणारं हे ठिकाण. परंतु, समुद्राच्या लाटा या परिसरातील शांतता भंग करतात. आंबोळगडाच्या या आश्रमात सुंदर दत्तमंदिर आहे. आश्रमाच्या खालील बाजूस समुद्राकडे जाणाऱ्या जांभा दगडांच्या पायऱ्या आहेत. समोरचं लक्ष वेधून घेणारा निळाशार समुद्र आहे. 


येथे गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या गुहा आहे. येथे भाविक, पर्यटकांना जाता येतं. गगनगिरी महाराजांनी येथे तपश्चर्या केल्याचं सांगितले जातं. येथे ध्यानकेंद्र देखील आहे. या आश्रमाच्या जवळचं आंबोळगडाचा किल्ला आहे. 


आंबोळगडचा किल्ला-


आंबोळगडावर पाहण्यासारखं म्हणजे तुटलेली तोफ, तटबंदीचे काही अवशेष आहेत. वाड्याचे काही अवशेषही इथं शिल्लक आहेत. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र आहे. आणि उत्तर-पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्यात एक चौकोनी विहीर आहे. 


मुसाकाजी बंदर -


रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेलं हे मुसाकाजी बंदर होय. स्वच्छ परिसर असलेलं हे बंदर अप्रतिम आहे. राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळील यशवंतगडाकडून ३ किमी. अंतरावर आंबोळगडाच्या डावीकडील रस्त्यावर हे लहानसे बंदर आहे. समुद्राचे निळेशार पाणी आणि मऊ वाळू पर्यटकांचे चटकन लक्ष वेधून घेतात. येथे फारशी वर्दळ नसते. बंदरावर छोट्या-छोट्या होड्या निदर्शनास पडतात. 


शिमगोत्सव -


अप्रतिम शिमगोत्सव येथे पाहायला मिळतो. विशिष्ट पध्दतीच्या पगड्या, एकसारखा वेष, पालखी, हातात वाद्ये आणि एका तालात नृत्य हे नाटे आणि शेडभूच्या परिसरात आम्ही अनुभवलेला शिमगोत्सव होता. तसं पाहिलं तर कोकणात प्रादेशिकरित्या विविध संस्कृती, चालीरीती पाहायला मिळतात. येथील शिमगोत्सवाचे स्वरूपही वेगवेगळे असते. 


आणखी काय पाहाल? 


रत्नागिरी जिल्ह्यात कणकादित्य मंदिर (कनकादित्य हे सूर्यमंदिर असल्यामुळे या मंदिरात रथसप्तमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो), महाकाली मंदिर, गोडवणे बीच, आर्यादुर्गा मंदिर आणि कातळशिल्पे ही ठिकाणेही पाहता येतील.  


कसे जाल? 


कोल्हापूर-शाहूवाडी मार्गे रत्नागिरी- आडीवरे-नाटे-आंबोळगड 


कोल्हापूर -राजापूर-नाटे-शेडभू-आंबोळगड  


तुम्हाला निवांतपणा, शांतता हवी असेल तर आंबोळगडच्या बीचवर जा. येथे तुम्हाला फारशी वर्दळ दिसणार नाही. पण, समुद्रालगत बरीच वस्ती आहे. काही हॉटेल्स आणि रूम्सदेखील उपलब्ध आहेत. येथे राहण्याची आणि खाण्याची सोयदेखील उत्तम आहे. मासे, सोलकडी, अंडाकरी, चिकनकरी असे घरगुती पध्दतीच्या जेवणाची चवदेखील येथे चाखता येते. दोन दिवसांत तुम्हाला आंबोळगडाचा प्रवास करून परत येता येते. विविध समुद्रकिनारी तुम्ही अनुभवलेल्या नेहमीच्या ट्रीपपेक्षा आंबोळगडचा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल...

No comments:

Post a Comment

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...