‘कोल्हापूरचं स्वर्ग’ म्हणून ओळखलं जाणारे काळम्मावाडी धरण खूपच खास आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण म्हणून काळम्मावाडीकडे पाहिले जाते. या धरणाचे बांधकाम महाराष्ट्र सरकारने १९८३ मध्ये सुरू केले. ते १९९९ मध्ये पूर्ण झाले. याचा वापर सिंचन तसेच जलविद्युत निर्मितीसाठी केला जात आहे. तसेच कोल्हापूर पर्यटनाचे आकर्षण केंद्र असलेले सहलींसाठी उत्तम ठिकाण असलेले पर्यटन स्थळ आहेत.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याच्या नैऋत्य भागात सुंदर वाहणाऱ्या दुधगंगा नदीवर हे धरण आहे. २८ हजार दशलक्ष टीएमसी पाण्याची साठवण क्षमता असलेले हे धरण घनदाट जंगलात वसलेले आहे. निसर्गरम्य परिसरातील या पाण्याचा आवाज मंत्रमुग्ध करणारा आहे. निसर्गमय सौंदर्य, धरण भोवतीची हिरवळ आणि घनदाट जंगल ज्यामुळे ते निसर्ग प्रेमींसाठी एक आकर्षक ठिकाण बनले आहे. पर्यटक बोटिंग, मासेमारी, पक्षी निरीक्षण आणि पिकनिकचा आनंद घेऊ शकतात. पर्यटकांना येथे सहज पोहोचता येते.
कृषी – आसपासच्या शेतकर्यांना पाण्याचा पुरवठा करून शेतीसाठी उपयुक्त आहे. धरणामुळे आसपासच्या गावांना पाणीपुरवठा आणि सिंचनाच्या सुविधांमुळे जीवनमान सुधारले आहे. पिक उत्पादनात वाढ झाली आहे.
विविध गावांना पाणीपुरवठा – धरणाचे जल गावांना पिण्याच्या आणि दैनंदिन वापरासाठी पाणी पुरवण्यासाठी वापरले जाते.
वीज उत्पादन – धरणात विजेचे तिन्ही जनरेटर आहेत, जे उर्जा निर्मितीसाठी वापरले जातात.
पर्यटन आणि निसर्ग सौंदर्य – काळम्मावाडी धरणाच्या आसपासचे जंगलं फार घनदाट आहेत, जैवविविधतेने समृद्ध आहेत. हे जंगल गव्यांसाठी प्रसिद्ध असून प्राण्यांच्या अनेक विविध प्रजाती आढळतात. धरण परिसरातील निसर्ग आणि जंगल, धबधबे इत्यादींमुळे हे ठिकाण पर्यटनासाठी खूप प्रसिद्ध आहे. राधानगरीतील वन्यजीव दाजीपूर अभयारण्य प्रसिद्ध आहे. इथे दूधसागर धबधबा, बायसन सेल्फी पॉईंट, बटरफ्लाय गार्डन, रामणवाडी धबधबा, राऊतवाडी धबधबा, सह्याद्रीच्या डोंगररांगा अशी पर्यटन स्थळे आहेत. धरणाचा परिसर पिकनिक आणि फोटोग्राफीसाठी शांत वातावरणाचा आहे. याठिकाणी देवी काळम्मा देवीला समर्पित मंदिर धरणाजवळ आहे. राधानगरी परिसरात एक ऐतिहासिक स्मारक हत्ती महाल देखील प्रसिद्ध आहे. तसेच शाहू महाराजांचे स्मारकाला देखील तुम्ही भेट देऊ शकता.
दूधगंगा नदीवरील एक आकर्षित करणारे पर्यटनसथळ म्हणून देखील ते नावारुपास आले आहे. धरणाची उंची ७३.०८ मीटर (२३९.८ फूट) आहे तर लांबी १,२८० मीटर (४,२०० फूट) आहे.
धरण प्रकार: Gravity dam (गुरुत्वाकर्षण प्रकाराचे धरण)
जलाशयाची एकूण क्षमता-७१९,१२०,००० मी.
अंतर-
कोल्हापूरपासून ६० किमी. अंतरावर हे धरण आहे.
कसे पोहोचाल?
कोल्हापूर - वाडीपीर - हळदी - भोगावती - घोटावडे - शिरसे - खिंडी वरवडे - कारंजफेण - गैबी फाटा - काळम्मावाडी
इतर ॲक्टिव्हिटीज
काळम्मावाडी जंगलात कॅम्पिंग, ट्रेकिंग आणि वन्यजीव सफारीसारख्या ॲक्टिव्हिटीज करता येतात. धावपळीच्या जीवनातून शांतता आणि आनंदाचा अनुभव घेण्यासाठी हे ठिकाण उत्तम आहे. निसर्ग भटकंती करत धरणाभोवती फिरताना निसर्गाची विविध रूपे पाहण्याचा आनंद घेता येतो. रात्रीच्या वेळी तंबू लावून कॅम्पिंग करण्याचा अनुभव अविस्मरणीय बनवता येऊ शकतो. काळम्मावाडी धरणाजवळील वाकीघोळ जंगलात एक छान ट्रेक करता येतो. पण जंगलात जाताना वाटाड्या किंवा गाईड सोबत असणे, गरजेचे आहे. वाकोबा मंदिराजवळून काळम्मा मंदिर पर्यंत असणाऱ्या कड्याकपारीतून जंगलातून असणारी ही भटकंती तुम्हाला वेगळा अनुभव देऊन जाईल. परिवारासोबत याठिकाणी वन डे -टू डे सहलीला देखील जाऊ शकता. याठिकाणी काही हॉटेल्स, रेस्टॉरंट देखील आहेत, जिथे तुम्ही राहू शकता.
दूध आमटी ची खासियत
याठिकाणी गरमागरम भजी, चहा, उकडलेले कमीस, शाकाहारीमध्ये दूध आमटी थाळी प्रसिद्ध आहे. तर मांसाहारी अस्सल कोल्हापूरी तांबडा-पांढरा रस्सा थाळी मिळते. या पदार्थांवर तुम्ही यथेच्छ ताव मारू शकता. विशेष म्हणजे, राधानगरीचे जंगल पार केल्यानंतर फोंडा घाट लागतो, जो कोकणाला जोडणारा रस्ता आहे.
अतिवृष्टीचा फटका
पावसाळ्यात काळम्मावाडी येथील धरण परिक्षेत्रात अतिवृष्टी होते. धरण सुरक्षेच्या दृष्टीने धरणातील पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी पाण्याचा विसर्ग दूधगंगा नदीपात्रात सोडला जातो. त्यानंतर नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. पाण्याच्या विसर्गात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यानंतर दूधगंगा नदी पात्राबाहेर पडते. ज्यामुळे अनेक रस्त्यांवर पाणी येऊन पिके आणि बंधारे पाण्याखाली जातात. परिणामी, वाहतुकीचे मार्ग बंद होतात. कासारपुतळे, सावर्डे पाटणकर या गावात रस्त्यावर पाणी येते. तसेच तुरंबे, सुळंबी जुना बंधारा पाण्याखाली जातो. तर सरवडे गावच्या दत मंदिराला पाण्याचा वेढा पडला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाटबंधारे विभाग दक्ष असते.
No comments:
Post a Comment