Tuesday, August 22, 2023

Bijli Mahadev Temple: या मंदिरावर १२ वर्षातून एकदा पडते वीज, असा घडतो चमत्कार


हिमाचल प्रदेशातील सुंदर पर्वतीय प्रदेशातील एक म्हणजे कुल्लू. निसर्गाने वेढलेलं आणि समृद्ध, सुंदर घरे, प्राचीन संरचनांपर्यंत अनेक गोष्टींसाठी ओळखले जाते. कुल्लू जिल्ह्यातील एका अनोख्या मंदिराविषयी काही रंजक गोष्टी सांगितल्या जातात. या मंदिराला खूप धार्मिक महत्त्व आहे. हे मंदिर बिजली महादेव म्हणून ओळखले जाते. 

बिजली महादेव मंदिर हे २ हजार ४६० मीटर उंचीवर असलेल्या कुल्लू खोऱ्यातील काशवारी या सुंदर गावात आहे. हे मंदिर शिव देवतेला समर्पित आहे. भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांमध्येही याची गणना होते. अनेक पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे. कुल्लू घाटीतील सुंदर गाव काशवरी येथे हे बिजली महादेव मंदिर आहे. (Bijli Mahadev Temple). हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. 

रिपोर्टनुसार, मंदिराच्या आत स्थित असलेले शिवलिंग प्रत्येक वर्षी १२ वर्षांनी विजेच्या संपर्कात येते. ज्यामुळे शिवलिंग खंडित होते. यानंतर पुजारी शिवलिंग अन्न, डाळ आणि पीठ तसेच मीठविरहित लोण्याच्या मिश्रणाने जोडतात. स्थानिक लोक हा भगवान शिवचा आशीर्वाद मानतात. काही लोकांचे हेदेखील म्हणणे आहे की, ही वीज एक दिव्य आशीर्वाद आहे, ज्यामध्ये अनेक शक्ती असतात.

काही महिन्यांनंतर शिवलिंग पहिल्यासारखे स्थितीत येऊ लागते. येथे लोक सांगतात की, भगवान शिवच्या आदेशाने भगवान इंद्र देव १२ वर्षांनी वीज सोडतात. हे मंदिर कुल्लूहून जवळपास २० किमी दूर आहे. तुम्ही ३ किमीचा ट्रेक करतदेखील तिथे पोहोचू शकता. हा ट्रॅक पर्यटकांसाठी खूप मजेदार आहे. घाटी आणि नद्यांच्या काही मनोहर दृश्यांसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. 

Nagchandreshwar Mandir : वर्षातून एकदाच उघडते उज्जैनचे प्रसिद्ध नाग मंदिर, काय आहे खासियत?

 





देशात शतकानुशतके नागाची पूजा करण्याची परंपरा आहे. आपल्या देशात नागांचे अनेक प्रसिद्ध मंदिरेही आहेत. यापैकी एक आहे- उज्जैनमधील नागचंद्रेश्वर मंदिर. उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वर मंदिर आहे. (Nagchandreshwar Mandir) या मंदिराची सर्वात मोठी खासियत ही आहे की, केवळ नागपंचमीच्या दिवशी दर्शनासाठी हे मंदिर उघडले जाते. (Nagchandreshwar Mandir)

असे म्हटले जाते की, नागराज तक्षक स्वत: या मंदिरात आहेत. त्यामुळेच केवळ नागपंचमीच्या दिवशी हे मंदिर उघडून नाग देवतेची पूजा-अर्चना केली जाते. नागचंद्रेश्वर मंदिरात ११ व्या शतकातील मूर्ती आहे आणि असा दावा केला जातो की, अशी मूर्ती जगभरात कुठेही नाही. ही मूर्ती नेपाळहून आणण्यात आली होती.

नागचंद्रेश्वर मंदिरात भगवान शंकर नागावर विराजमान आहेत. मंदिरात स्थापित केलेली प्राचीन मूर्ती, भगवान शिव, भगवान गणेश आणि माता पार्वती यांच्यासह दशमुखी नागावर विराजमान आहेत. पौराणिक मान्यतेनुसार, सर्पराज तक्षक यांनी भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. सर्पराजाच्या तपश्चर्येने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मग त्यांनी नागांचा राजा तक्षक नाग याला वरदान म्हणून अमरत्व दिले. तेव्हापासून तक्षक राजा परमेश्वराच्या सान्निध्यात राहू लागला.

या प्राचीन मंदिराची उभारणी परमार राजा भोजने इ. स. १०५० च्या आसपास केली होती. यानंतर सिंधिया घराण्याचे महाराज राणोजी सिंधियाने १७३२ मध्ये महाकाल मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यावेळी या मंदिराचाही जीर्णोद्धार झाला होता. नागराजवर विराजमान भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक वर्षाची प्रतीक्षा करतात.

रिपोर्टनुसार, भगवान नागचंद्रेश्वरची त्रिकाल पूजेची परंपरा आहे. त्रिकाल पूजेचा अर्थ तीन वेगवेगळ्या समयी केलेली पूजा होय. पहिली पूजा मध्यरात्रीला महानिर्वाणी, दुसरी पूजा नागपंचमीच्या दिवशी दुपारी प्रशासनद्वारा केली जाते. तिसरी पूजा नागपंचमीच्या सायंकाळी भगवान महाकालच्या पूजेनंतर मंदिर समिती करते. पुन्हा रात्री १२ वाजता एक वर्षासाठी दरवाजे बंद केले जातात.


Sunday, August 20, 2023

Shravan Special 1st somvar - Tungnath Temple: जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले शिव मंदिर


 https://pudhari.news/features/tour-and-travels/620319/wolrld-highest-shiv-temple-tungnath-in-uttarakhand/ar

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात जगातील सर्वात उंच शिव मंदिर स्थित आहे. (Shravan Special – Tungnath Temple) या मंदिराला तुंगनाथ मंदिर देखील म्हटले जाते. असे म्हटले जाते की, या मंदिराची निर्मिती पांडवांद्वारे करण्यात आली होती. तुंगनाथ पर्वतावर स्थित असलेल्या या मंदिराची उंची ३६४० मीटर आहे. तुंगनाथ मंदिर पंचकेदार (तुंगनाथ, केदारनाथ, मध्य महेश्वर, रुद्रनाथ आणि कल्पेश्वर) पैकी सर्वात उंचावर स्थित आहे. असे म्हटले जाते की, याच ठिकाणी शिव भुजा रूपात विद्यमान आहेत. म्हणूनच प्राचीनकाळापासून या मंदिरात भगवान शिवच्या भुजांची पूजा होते. (Shravan Special – Tungnath Temple)

तुंगनाथ मंदिर विषयी पौराणिक मान्यता आहे की, या मंदिराची निर्मिती पांडवांद्वारे करण्यात आली होती. जेव्हा महाभारत युद्धात नरसंहाराने शिवजी पांडवांवर नाराज होते, तेव्हा त्यांना प्रसन्न करण्यासाठी पांडवांनी हे मंदिर बनवलं होतं. याशिवाय असे म्हटले जाते की, माता पार्वतीने भगवाव शिवला पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी तुंगनाथजवळ तपस्या केली होती.

चंद्रशिलाच्य़ा दर्शनाविना तुंगनाथ मंदिराची यात्रा अपूर्ण मानली जाते. मंदिरापासून काही अंतरावर चंद्रशिला मंदिर आहे. येथे रावणशिला आहे, ज्याला (स्पीकिंग माउंटेन) नावाने ओळखले जाते. सगळीकडे बर्फ, मऊमऊ गवत, रंग-बिरंगे फूल आणि ढगांनी व्यापलेला धुक्याने वेढलेला हा परिसर तुम्हाला भुरळ घालेल. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येथे फक्त बर्फाची चादर दिसते. म्हणूनच या ठिकाणाला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असेही म्हणतात.

असेही म्हटले जाते की, उत्तराखंडचे तुंगनाथ मंदिर महादेव आणि पार्वती देवीला समर्पित आहे. १८ व्या शतकात संत शंकराचार्यांनी या मंदिराचा शोध लावल्याचे सांगितले जाते. मंदिरासोबतच आजूबाजूचे सौंदर्यही मंत्रमुग्ध करणारे आहे.




Tuesday, July 18, 2023

Dudhsagar Waterfall Crowd : 'दूधसागर'ला तरुणांची इतकी गर्दी का होतेय?

 https://pudhari.news/features/youthworld/596007/why-dudhsagar-waterfall-is-crowded-with-tourist-trekkers/ar

Last Updated: July 17, 2023, 1:17 PM



दूधसागरला हजारोंच्या संख्येने पोहोचलेले पर्यटक, ट्रेकर यांचा काल रविवारी दि. १७ रोजी चांगलाच हिरमोड झाला. (Dudhsagar Waterfall Crowd) शनिवार, रविवार असे सुट्टीचे दिवस असल्याने अगदी पहाटेपासूनच कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊ लागली. तर साऊथवरून येणारे बहुसंख्य पर्यटक कोलेममधून दूधसागर धबधब्याजवळ चालत येत होते. ही संख्या जवळपास दोन हजारांहून अधिक असावी. देशभरातील लोक दूधसागर धबधबा पाहण्याच्या इच्छेने येथे दाखल होत असतात. मात्र, मुळातच याठिकाणी जाण्यास बंदी असल्याने रेल्वे पोलिसांसह, वनकर्मचाऱ्यांनी पर्यटक, ट्रेकर्सना अडवले. त्यांना परत माघारी जाण्याची सूचना केली. यामध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. यावेळी हजारोंच्या संख्येने तरूण रेल्वे रूळावर थांबून राहिले. पण, दूधसागर धबधब्याला तरुणांची इतकी मोठी गर्दी का होतेय? (Dudhsagar Waterfall Crowd)

निसर्गाचा अनोखा चमत्कार

निसर्गाच्या कुशीत लपून बसलेला दूधसागर धबधबा या ठिकाणापर्यंत पोहोचणं, एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. असेच एक ठिकाण म्हणजे दुधासारखा अखंड वाहणारा, चमचमत्या ताऱ्यांप्रमाणे जल वाहून नेणारा आणि खळाळत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारा धबधबा म्हणजे ‘दूधसागर.’ याचा अर्थ स्पष्ट आहे. दूधसागर म्हणजेच दुधाचा धबधबा असं म्हणता येईल. हा धबधबा मोल्लेम राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात आहे. हे ठिकाण अद्भूत, भव्य आणि निसर्गाची ओढ लावणारं आहे.

दूधसागर धबधबा-

दूधसागर हा भारतातील पाचवा सर्वात उंच धबधबा आहे जो १०२० फूट उंचीवरून कोसळतो. गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर हा धबधबा आहे. येथे जाण्यासाठी ज‍वळचे दोन रस्ते आहेत. एक गोव्याहून आणि दुसरा कर्नाटकाहून. दूध सागर धबधबा गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर मांडवी नदीवर स्थित आहे. हा धबधबा जगातील २२७ व्या क्रमांकाचा सर्वात सुंदर धबधबा आहे. विदेशी पर्यटकांनाही या धबधब्याची भूरळ आहे.

बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग –

चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातील एका भागाचे शूटिंग याच धबधब्यावर झाले आहे. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यावर काही दृश्ये या धबधब्यावर चित्रीत करण्यात आली होती. उन्हाळ्यात हा धबधबा कोरडा पडतो. मात्र इतरवेळी हा धबाधबा पाहायला जाणे, हे पर्यटकांचे स्वप्न असते.

रेल्वेमधून नक्की जा!

निजामुद्दीन एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस या रेल्वे दूधसागरहून मार्गक्रमण करतात. तुम्हाला या धबधब्याच्या ठिकाणी प्रत्यक्षात जाता येत नसले तरी दक्षिण भारताकडे जाणाऱ्या या रेल्वेमधून तुम्ही प्रवास करत हा धबधबा पाहू शकता. रेल्वेमधून हा धबधबा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरेल.


अनेक बोगदे पार केल्यानंतर ही रेल्वे दूधसागरच्या रेल्वे पुलाजवळ पोहोचते. बोगद्यातून आणि रेल्वे ट्रॅकवरून धबधब्यापर्यंतचा प्रवास एक थ्रीलचं असतो. आयुष्यभर विसरणार नाही, असा हा प्रवास घडतो. खडकांच्या डोंगरांमधून वाहणारा धबधबा पाहून डोळे दिपतात. दूर अंतरावरून येणारे पाण्याचे फवारे ओलेचिंब करून जातात. एकीकडे धबधबा आणि दुसरीकडे ब्रीजवरून जाणारी रेल्वे, यातून घडणारा प्रवास अवर्णनीय असतो. धबधब्याच्या शिरोमणीवर नजर टाकली की, हे पाणी नेमकं येतं तरी कोठून? असा प्रश्न आपसूक मनात येतो.

ट्रेकिंगसाठी थ्रील अनुभव –

बहुसंख्येने ट्रेकर्स दूधसागर ट्रेक करण्यासाठी येत असतात. कॅसलरॉकपासून १२ किलोमीटर व कुलेमपासून ३ किलोमीटरपर्यंत चालत ट्रेकर्स धबधब्याजवळ जातात. तर काही जण रेल्वेतून उतरून जंगल आणि रेल्वे ट्रॅक वरून चालत जात दूधसागर धबधब्यापर्यंतचा १६ किलोमीटर ट्रेक पूर्ण करतात. कोलेम असो वा कॅसल रॉक…ट्रेकर्स रेल्वे ट्रॅकचाच मार्ग निवडतात. रेल्वे रुळावरून इतक्या किलोमीटरचा ट्रेक पूर्ण करणे, ट्रेकर्ससाठी थ्रील असते. ट्रेकर्स दूधसागर धबधब्याला भेट देऊन भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यास भेट देतात. आसपासची छोटी-मोठी ठिकाणे जंगलांनी वेढलेली दिसतात, जी पर्यटक, ट्रेकर्स-तरुणांना आकर्षित करणारी आहेत.

भगवान महावीर अभयारण्य किंवा मोल्लेम राष्ट्रीय उद्यान –

दूधसागर धबधबा भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यान यांच्यामध्ये आहे. एका बाजूला डोंगर कपाऱ्यांमधून वाहणारा धबधबा आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड घनदाट वने आणि पाने -फुले, औषधी वनस्पतींनी वेढलेली जंगले, स्पाईस गार्डन असा सगळा निसर्गाचा पसारा दूधसागरच्या सभोवताली आहे. धबधब्या भोवती जैवविविधतेने समृद्ध असे भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यान आहे, हे पाहण्यासाठी लोक हमखास जातात. 



मोल्लेम जंगल

मोल्लेम जंगल हे घनदाट सदाबहार आणि निम्न-सदाबहार वनांनी वेढलेले आहे. हे जंगल विशाल वन्य जीव विविधतेने नटलेले आहे. येथे वाघ, बिबट्या, गवे आणि अन्य २०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आणि आहेत. येथे मायसेना जीनस नावाची प्रकाश देणारी मशरुमची प्रजातीही आढळते. तसेच किंग कोबरा, हंप-नोज्ड पिट वायपर, इंडियन रॉक पायथॉन अशा सापांच्या प्रजाती आढळतात.

तांबडी सुरला मंदिर –

माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना-फ़ुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी!!” ही बा. भ. बोरकरांनी लिहिलेली कविता येथील निसर्गाला तंतोतंत लागू पडते. तांबडी सुरला येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. अनोख्या शैलीतील या मंदिराची निर्मिती १२ व्या शतकात झाली आहे. हे मंदिर कदंब यादव वंश काळातील वास्तुकला शैलीचे एकमेव स्मारक आहे. तांबडी सुरला मंदिर पणजीपासून ६६ किलोमीटर आहे. तांबडी सुरला जवळ धबधबादेखील आहे. जो तांबडी सुरला मंदिरापासून २१ किलोमीटर अंतरावर आहे. तांबडी सुरला मंदिरापर्यंत गाडी जाते.

नेत्रावली धबधबा –

पश्चिम घाटात वाईल्डलाईफ सॅन्चुरी येथील नेत्रावली धबधबा सर्व निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. मान्सूनमध्ये फिरण्यासाठी हे सर्वांत उत्तम स्थळ आहे. येथे बर्ड वॉचिंग आणि स्पॉटिंग वाईल्ड लाईफ पाहू शकता. येथे Mhadei Wildlife Sanctuary सर्वात प्रमुख आहे.

Thursday, June 8, 2023

Konkan kandalvan Safari : कांदळवनांचं पर्यटन करणाऱ्या गावात नक्की जा!



 मागील लेखामध्ये आम्ही तुम्हाला वेळणेश्वरसह हेदवी, बामणघळविषयी माहिती दिली होती. तुम्हाला तो लेख नक्कीच आवडलाही असेल. आता आम्ही तुम्हाला कांदळवनांबद्दल सांगणार आहोत. (Konkan kandalvan Safari) त्याचसोबत श्रीवर्धन, हरिहरेश्वर, श्रीवर्धन बीच, अरवी बीच, घुमचे घुमेश्वर मंदिर आणि पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अनेक ठिकाणांविषयी माहिती देणार आहोत. कांदळवनांचं पर्यटन करणारे गाव म्हणून ‘काळिंजे’ प्रसिद्ध आहे. समुद्रालाच आपला देव मानणारे आणि त्याची पूजा करणारे येथील माणसं निसर्गाची राखण कशी करतात, याची अद्भुत सफर घडवणारी कांदळवनांची सफर आयुष्यात एकदा का होईना, करायलाचं हवी. नेहमीपेक्षा थोडीशी हटके असणारे ही ट्रीप तुम्हाला न विसरणारी ठरेल! (Konkan kandalvan Safari)

तांबळडेग, सिंधुदुर्गमध्ये कांदळवने पाहायला मिळतात. मालवणमध्येही, वेंगुर्ल्यातील एका बीचवरही कांदळवन आहे. पण आज आम्ही तुम्हाला रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील काळिंजे गावातील निसर्ग पर्यटनाविषयी सांगणार आहोत. सोबत अरवी, हरिहरेश्वर, आरवी बीचविषयी सांगणार आहोत.

श्रीवर्धन –

श्रीवर्धन हा रायगड जिल्ह्यातील निसर्गाने नटलेले तालुक्याचे ठिकाण आहे. नारळ, पोफळी आणि सुपारीच्या बागांनी वेढलेले श्रीवर्धन तीर्थक्षेत्रामुळेही प्रसिद्ध आहे. पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांचे जन्मस्थान श्रीवर्धन होय. पेशव्यांचे शहर म्हणूनही श्रीवर्धन’ला ओळखले जाते. धकाधकीच्या जीवनातून वेळ काढून या ठिकाणांना अवश्य भेट द्यायला हवी.

श्रीवर्धन बीच –

अतिशय स्वच्छ असे श्रीवर्धनचे बीच आहे. एका बाजूला अरबी समुद्र दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वत अशी श्रीवर्धनची भौगोलिक रचना आहे. लांब पसरलेले रुंद समुद्रकिनारे आणि शांतता हे येथील वैशिष्ट्य म्हणता येईल. येथे घोंगवणारा वारा आणि नीरव शांततेत सूर्यास्त पाहणे म्हणजे ‘व्वा! अप्रतिम’. येथे घोडेस्वारी, बग्गीतून फेरफाटका मारता येतो. तुम्ही जण सहलीचा प्ल्रॅन करत असाला तर श्रीवर्धनला नक्की जा.

कसे जाल?

श्रीवर्धनला रेल्वे आणि बसने जाता येते. जवळचे रेल्वे स्टेशन माणगाव आहे. ४५ किमी. प्रवास करून तुम्ही रेल्वेने श्रीवर्धनला पोहोचू शकता. श्रीवर्धन हे अलिबागपासून ११७ किमी. अंतर तर मुंबईपासून १८२, तसेच पुण्यापासून १६२ किमी. अंतर आहे.

काय खाल?

सीफूडची चव चाखण्यासाठी येथे एक रात्र घालवावी लागेल. ताजे मासे, बोंबील, सुरमई, पापलेट, बांगडा, तारली, कोळंबीची टेस्टी टेस्टी चव चाखायला कुणाला आवडणार नाही! त्याचसोबत येथील उकडी मोदक प्रसिद्ध आहेत. (Konkan kandalvan Safari)

कुठे राहाल?

राहण्यासाठी रिसॉर्ट्स, निवासस्थाने, हॉटेल्स उपलब्ध आहेत.

आणखी काय काय पहाल ?

पेशवे स्मारक-पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांच्या जन्मस्थळी पेशवे स्मारक बांधण्यात आले आहे.
लक्ष्मी नारायण मंदिर- भगवान विष्णूचे हे मंदिर २०० वर्षे जुने असल्याचे म्हटले जाते.

दिवेआगर बीच-

श्रीवर्धनपासून २३ किमी. अंतरावर हा स्वच्छ बीच आहे.

स्वयंभू घुमेश्वर मंदिर –

घुम गावातील हे स्वयंभू घुमेश्वर मंदिर होय. काही प्राचीन मूर्ती इथे पाहायला मिळतात. श्रीवर्धनपासून अर्धा तासांच्या अंतरावर हे मंदिर आहे.

श्री जिवनेश्वर मंदिर देवस्थान-

श्री जिवनेश्वर मंदिर पेशवेकालीन असून मंदिराचे सुबक बांधकाम आहे. हे मंदिर अप्रतिम वास्तुकलेचा नमुना आहे. लाकडी बांधकाम असलेले हे मंदिर आकर्षक आहे.

हरिहरेश्वर –

येथे प्राचीन शिव मंदिर आहे. येथे श्री हरिहरेश्वरचे प्रसिद्ध मंदिर आहे. हरिहरेश्वरमध्ये एमटीडीसी रिसॉर्टदेखील आहेत. वर्षभर पर्यटनासाठी हे ठिकाण उपलब्ध आहे. पावसाळ्यात येथे प्रचंड पाऊस असतो. तसेच काळभैरवाचे मंदिरही तुम्हाला पाहता येईल.

कसे जाल?

श्रीवर्धनपासून १ किमी. अंतरावर हरिहरेश्वर आहे.

वेळास बीच-

वेळास बीच कासव महोत्सवासाठी प्रसिद्ध आहे.

कसे जाल?

हरिहरेश्वरच्या दक्षिणेला १२ किमी. अंतरावर अंतरावर हे ठिकाण आहे.

आरवी बीच –

श्रीवर्धनजवळील आरवी समुद्रकिनारा हा सुंदर पांढऱ्या वाळूचा किनारा आहे.

कसे जाल?

श्रीवर्धनपासून १० किमी तर दिवेआगरपासून १२ किमी. अंतरावर हा किनारा आहे. हा किनारा ऑलिव्ह रिडले कासवांचे प्रजननाचे ठिकाण म्हणूनही प्रसिद्ध आहे. येथे डॉल्फिनही पाहता येतात.

आरवी बीचजवळ रिसॉर्ट्स आहेत. काही घरगुती निवास व्यवस्था आहे. तसेच या जवळ असणारे आडगाव बीच, शेखाडी बीच, कोंवील बीच, नानवली लाईट हाऊस पाहता येईल.

कांदळवनांची अविस्मरणीय बोट सफर

अनेक समुद्रकिनाऱ्यांची फिरस्ती झाली असेल तर कोकणातील कांदळवनांची अद्भूत सफर करायलाच हवी राव! श्रीवर्धनमधील काळिंजे गावाला कांदळवनांचे अनोखे वैभव लाभले आहे. कोकण किनारपट्टीवरील हे छोटसं गाव आहे. एका बाजूला बेट आणि दुसऱ्या बाजूला कांदळवन असं निसर्गाचं देखणं रुप आपणास पाहायला मिळतं. शिवाय काळिंजे गावातील महिला गाईड म्हणून काम करतात. वनविभागाच्या कांदळवनांवर आधारित निसर्ग पर्यटनाचे उपक्रम येथे राबवले जाते. संवर्धन आणि संरक्षण करून रोजगारासाठी कांदळवनाची सफारी पुढे येतेय.

एकीकडे बेटाच्या स्वरुपात कांदळवन आणि दुसरीकडे बेटावंर नारळ, पोफळी, चिंच, इतर वनस्पती आहेत. गोड्या पाण्याची विहिरी, जुनी घरे पाहायला मिळतात. ११ प्रजातीचे कांदळवन आणि ५ प्रकारचे मँग्रुव्ह येथे सापडतात. मँग्रुव्ह वॉक, सफारी बोट हे गावातील लोकांचे उपजीविकेचं साधन बनले आहे.

तीवर, पिवळी डुंबी अशी झाडे येथे असून ती स्वत:चे रोपटं स्वत: तयार करतात. यास ‘वॉकिंग ट्री’ देखील म्हणतात. काळिंजे खाडीत ८५ पक्षांची प्रजाती आहेत. ब्लॅक कॅट किंग फिशरचे दर्शनही घेता येते. पानमांजराचे हक्काचे घर (उदमांजरे) म्हणजे कांदळवन होय. कांदळवनात खेकड्यांची पैदास चांगली होते. जमिनीची धूप होऊ नये म्हणून कांदळवनाचा उपयोग होतो.

श्रीवर्धनमध्ये आणखी काय पहाल?

श्री भैरवनाथ मंदिर, श्री भैरवनाथ मंदिर गुडेघर, श्री बोरेश्वर महादेव मंदिर, काळेश्वरी मंदिर, श्रीवर्धन, घुमेश्वर मंदिर, श्री दत्त मंदिर, गणपती मंदिर, घुमेश्वर नदी (पर्यटकांचे आकर्षण असलेले ठिकाण), रानावली नावाचं ठिकाण, मदगड, कुसमेश्वर. (मदगड येथे शिवकालीन किल्ला आहे)

पर्यटनाची आवड असणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी श्रीवर्धनची सफर कायमची स्मरणात राहणारी ठरेल.

आता कुठं जायचं? मग, आंबोळगडला जा ना!



तुम्ही रत्नागिरी, साखरपा, गणपतीपुळे, आरेवारे, दापोलीला पर्यटनाला गेला असाल. पण, कधी आंबोळगडाला गेलाय का? तुम्ही म्हणाल, येथे आहे तरी काय? ही पुढील माहिती वाचल्यानंतर येथे जायला तुम्हाला नक्की आवडेल. तर मग, चला आंबोळगडला!...  



आंबोळगड हे नाव आपल्या फारसं परिचयाचं नसलं तरी रत्नागिरी जिल्ह्यातील हे प्रसिध्द ठिकाण आहे. निखळ खळखळणारा अर्धचंद्राकृती समुद्रकिनारा, घेरायशवंतगड, गगनगिरी महाराजांचं मठ, ध्यानकेंद्र, मुसाकाजी बंदर, आंबोळगडचा किल्ला आणि बरंच काही,  जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पही या ठिकाणाजवळचं आहे. आंबोळगडाला लागून असलेला अथांग पसरलेला अरबी सुमद्र पर्यटकांना खुणावतोय. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात दोन किनारी दुर्ग आहेत, ते म्हणजे आंबोळगड व यशवंतगड. राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळ यशवंतगडावरून सरळ थेट रस्ता आंबोळगडाला जातो. आंबोळगडापर्यंतच्या प्रवासात तुम्हाला काजू आणि आंब्याच्या बागा, फणसाची झाडे आणि दुतर्फा झाडांनी नटलेला निसर्ग पाहता येतो.   


आंबोळगडाला जाताना जी गावे लागतात, तिथे तुम्हाला प्रवासात फार वस्ती, वाहने दिसणार नाहीत. येथील गावेही शांत असलेली तुम्हाला दिसतील. गावातील कर्ते पुरुष हे कामानिमित्त बाहेरगावी असलेले दिसतात.


आंबोळगडचा समुद्रकिनारा -


नेहमी आपल्य़ाला समुद्रकिनारी पिवळी, सोनेरी वाळू दिसते. पण, आंबोळगडच्या समुद्रकिनारी पांढरी आणि काळी वाळू पाहायला मिळते. येथे छोट्या-मोठ्या नौका, होड्यादेखील पाहायला मिळतात. मासेमारीसाठी या होड्य़ा वापरल्या जातात. छोटा समुद्रकिनारा लाभला असला तरी, येथील शांतता मनाला समाधान देऊन जाते. नितळ, स्वच्छ पाणी, भिरभिरणारं वारं आणि सुंदर समुद्रकिनारा तुम्हाला मोहात पाडतो. 


यशवंतगड -


कोकणातील राजापूर तालुक्यातील नाटे गावात श्री किल्ले घेरायशवंत गड नावाचा किल्ला आहे. नाटे गावातून सरळ पुढे चालत गेल्यानंतर डाव्या बाजूला एक भक्कम बुरूज आणि त्याच्या कडेने खंदक असलेलं पाहायला मिळतं. दोन भक्कम बुरुंजामघ्ये प्रवेशद्वार लपलेलं दिसतं. गडावर काही अवशेष, कोरडी विहीर आणि कोठारे पाहायला मिळतात. जैतापूर खाडीच्या काठावर हा किल्ला वसलेला आहे.


गगनगिरी महाराजांचे आश्रम-


एका बाजूला विस्तीर्ण जांभ्याच्या पठारावर श्री गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे. आणि दुसऱ्या बाजूला समुद्र. अगदी नीरव शांतता असणारं हे ठिकाण. परंतु, समुद्राच्या लाटा या परिसरातील शांतता भंग करतात. आंबोळगडाच्या या आश्रमात सुंदर दत्तमंदिर आहे. आश्रमाच्या खालील बाजूस समुद्राकडे जाणाऱ्या जांभा दगडांच्या पायऱ्या आहेत. समोरचं लक्ष वेधून घेणारा निळाशार समुद्र आहे. 


येथे गगनगिरी महाराजांनी तपश्चर्या गुहा आहे. येथे भाविक, पर्यटकांना जाता येतं. गगनगिरी महाराजांनी येथे तपश्चर्या केल्याचं सांगितले जातं. येथे ध्यानकेंद्र देखील आहे. या आश्रमाच्या जवळचं आंबोळगडाचा किल्ला आहे. 


आंबोळगडचा किल्ला-


आंबोळगडावर पाहण्यासारखं म्हणजे तुटलेली तोफ, तटबंदीचे काही अवशेष आहेत. वाड्याचे काही अवशेषही इथं शिल्लक आहेत. किल्ल्याच्या दक्षिणेस समुद्र आहे. आणि उत्तर-पश्चिमेस खंदक आहे. किल्ल्यात एक चौकोनी विहीर आहे. 


मुसाकाजी बंदर -


रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेलं हे मुसाकाजी बंदर होय. स्वच्छ परिसर असलेलं हे बंदर अप्रतिम आहे. राजापूर तालुक्यातील नाटे गावाजवळील यशवंतगडाकडून ३ किमी. अंतरावर आंबोळगडाच्या डावीकडील रस्त्यावर हे लहानसे बंदर आहे. समुद्राचे निळेशार पाणी आणि मऊ वाळू पर्यटकांचे चटकन लक्ष वेधून घेतात. येथे फारशी वर्दळ नसते. बंदरावर छोट्या-छोट्या होड्या निदर्शनास पडतात. 


शिमगोत्सव -


अप्रतिम शिमगोत्सव येथे पाहायला मिळतो. विशिष्ट पध्दतीच्या पगड्या, एकसारखा वेष, पालखी, हातात वाद्ये आणि एका तालात नृत्य हे नाटे आणि शेडभूच्या परिसरात आम्ही अनुभवलेला शिमगोत्सव होता. तसं पाहिलं तर कोकणात प्रादेशिकरित्या विविध संस्कृती, चालीरीती पाहायला मिळतात. येथील शिमगोत्सवाचे स्वरूपही वेगवेगळे असते. 


आणखी काय पाहाल? 


रत्नागिरी जिल्ह्यात कणकादित्य मंदिर (कनकादित्य हे सूर्यमंदिर असल्यामुळे या मंदिरात रथसप्तमीचा मोठा उत्सव साजरा केला जातो), महाकाली मंदिर, गोडवणे बीच, आर्यादुर्गा मंदिर आणि कातळशिल्पे ही ठिकाणेही पाहता येतील.  


कसे जाल? 


कोल्हापूर-शाहूवाडी मार्गे रत्नागिरी- आडीवरे-नाटे-आंबोळगड 


कोल्हापूर -राजापूर-नाटे-शेडभू-आंबोळगड  


तुम्हाला निवांतपणा, शांतता हवी असेल तर आंबोळगडच्या बीचवर जा. येथे तुम्हाला फारशी वर्दळ दिसणार नाही. पण, समुद्रालगत बरीच वस्ती आहे. काही हॉटेल्स आणि रूम्सदेखील उपलब्ध आहेत. येथे राहण्याची आणि खाण्याची सोयदेखील उत्तम आहे. मासे, सोलकडी, अंडाकरी, चिकनकरी असे घरगुती पध्दतीच्या जेवणाची चवदेखील येथे चाखता येते. दोन दिवसांत तुम्हाला आंबोळगडाचा प्रवास करून परत येता येते. विविध समुद्रकिनारी तुम्ही अनुभवलेल्या नेहमीच्या ट्रीपपेक्षा आंबोळगडचा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल...

Friday, May 19, 2023

Maharashtra Tourism : 'निसर्गराजा कड्यावरच्या गणपती'ला कधी भेट दिलीय का?


मुलांना सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहे. उन्हाळ्यात चांगलेच तापमान वाढले आहे. पण इतक्या कडक उन्हाळ्यात फिरणार कुठे? असा प्रश्न तुम्हाला जर पडला असेल तर चिंता करू नका. (Maharashtra Tourism) आम्ही आज निसर्गरम्य ठिकाणांची माहिती येथे देणार आहोत. ज्या ठिकाणाला 'निसर्गराजा' असंही म्हटलं जातं. एका मिनी रेल्वेचं इंजिन चालवणाऱ्या माणसाने हा गणपती साकारायचा ठरवला आणि दगडात साकारला गेला १०० फूटी उंच कड्यावरचा गणपती. आज हे कड्यावरचा गणपती असेलेले ठिकाण पर्यटकांचे आकर्षण बनले आहे. (Maharashtra Tourism)


‘कड्यावरचा गणपती’ माथेरान येथे स्थित असून हजारो पर्यटक येथे भेट देत असतात. विद्येची देवता गणपतीला जाता जाता अनेक गिर्यारोहकदेखील येथे येतात. येथील पेबचा किल्ला देखील प्रसिद्ध आहे. जर तुम्ही माथेरानला गेला तर कड्यावरच्या गणपतीला नक्की भेट द्या.


 

सुखद वातावरण, हिरवीगार झाडी, डोंगर, प्रदूषणरहित हवा, मंत्रमुग्ध करणारे वातावरण अनुभवण्यासाठी माथेरानला एकदा तरी नक्की जा!


माथेरान-

अनेक हिल्स स्टेशनपैकी एक असलेले महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील माथेरान. पश्चिम घाटातील सह्याद्री रांगेमधील लोकप्रिय थंड हवेचे ठिकाण म्हणून माथेरान ओळखले जाते. माथेरान समुद्रसपाटीपासून जवळपास २६०० फूट उंचीवर स्थित आहे. वीकेंडला फिरण्यासाठी, एकापेक्षा एक परफेक्ट ठिकाणे म्हणून लोकप्रिय आहे. माथेरानला निसर्गाने भरभरून सौंदर्य दिलं आहे.


माथेरानमध्ये काय खाल?

वडापाव, चिक्की, कबाब प्रसिद्ध आहे. दाल खिचडी, छोले भटुरे, पनीर मसाला, व्हेज बिर्याणी, चना मसाला, मिसळ पाव, व्हेज पुलाव, महाराष्ट्रीयन आणि गुजराती, चायनीज, पंजाबी पदार्थदेखील येथे मिळतात.


वर्षभर येथे पर्यटकांची रेलचेल पाहायला मिळते. जर तुम्ही ट्रेकर असाल तर एप्रिल-मे मध्ये ट्रेकिंग करण्यास उत्तम काळ असतो.


कुठे राहाल?

येथे राहण्यासाठी हॉटेल, लॉज वा रिसोर्टची व्यवस्था उपलब्ध आहे.


कसे जाल?

माथेरानला बसने जाता येते. रेल्वेने जाण्यासाठी माथेरानमध्ये एक रेल्वे स्टेशन आहे जे टॉय ट्रेनच्या माध्यमातून नेरळ जंक्शनशी जोडले गेले आहे. आणि लोकल रेल्वेने कर्जत जंक्शनशा जोडलेले आहे.


कड्यावरचा गणपती

येथील भव्य गणपती नजरेस भरतो. विशालकाय मूर्ती पाहून प्रत्येक भाविक, पर्यटक श्रद्धेने इथे थांबतो. येथील गणपचीची मूर्ती नजरेस भरणारी आहे. मॉन्सून नंतर इथे निसर्गाने पांघरलेला हिरवागार शालू आणि दाट धुक्याची बोचणारी थंडी असते. हा निसर्ग पाहण्यासाठी तुम्ही पावसाळ्यानंतरचादेखील प्लॅन करू शकता. मूर्तीच्या अवतीभोवती असणारे डोंगर, आणि निसर्गाचे सौंदर्य डोळ्यात न मावणारे असते.


कसे जाल?

नेरळ स्थानकावरून माथेरानला जायला टॅक्सी उपलब्ध आहेत. तसेच टॉय ट्रेन जाते...घाटात मद्यात उतरून चालत अर्धा तासात कड्यावरचा गणपतीकडे जाता येते. नेरळ ते माथेरान २२ किमी. चे अंतर आहे. टॅक्सीने गेलात तर ९ किमीचे अंतर असून माथेरानला पोहोचण्यास २० मिनिटे लागतात. माथेरानच्या एन्ट्री पॉईंटपर्यंत तुम्ही तुमच्या गाडीने येऊ शकता. येथे पार्किंगची व्यवस्थादेखील आहे. भारतातील ऑटोमोबाईल फ्री हिल स्टेशन म्हणून माथेरानची ओळख आहे. हिल स्टेशनवर दुचाकी आणि चारचाकी गाड्य़ांना परवानगी नाही.




हिल स्टेशनला पोहोचण्यासाठी ई -ऑटो, हॉर्स रायडिंग, बग्गी आणि टॉयट्रेन ही साधने उपलब्ध आहेत.


कधी जाल?

ऑक्टोबर ते जानेवारी हा काळ येथे जाण्यासाठी उत्तम मानला जातो.  (Maharashtra Tourism)


विकटगड/पेबचा किल्ला🚩

माथेरानजवळील पेबचा किल्ला किंवा विकटगडला ट्रेकर्स भेट देत असतात. कड्यावरील गणपतीचे दर्शन घेऊन पेबच्या किल्ल्याला जाता येते.


शिवसंग्रहालय -

इको पॉईंटच्या बाजूला शिवसंग्रहालय आहे. येथे शिवकालीन शस्त्रे आदी वस्तू पाहायला मिळतील.


अंबरनाथ मंदिर

माथेरानमध्ये अंबरनाथ मंदिर असून इसवी सन १०६० मध्ये निर्मिती केल्याचे म्हटले जाते.


मंकी पॉईंट

मंकी प्वाईंटमध्ये माकडांची संख्या अधिक आहे.


नेरळ माथेरान टॉय ट्रेन

नेरळ माथेरान टॉय ट्रेन सन १९०० मध्ये सुरु केल्याचे सांगितले जाते. आदमजी पीरभॉय द्वारा ही रेल्वे बनवल्याचे सांगितले जाते.


माथेरानमध्ये आणखी काय पाहाल?

खदान -शिव टेंपल, शिव मंदिर अंबरनाथ ईस्ट, इको पॉईंट, हनीमून पॉईंट, पलंग पॉईंट, लुईस पॉईंट, एलेक्जेंडर पॉईंट, रामबाग पॉईंट, लिटिल चौक पॉईंट, चौक पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, ओलंपिया रेसकोर्स, लॉर्डस पॉईंट, सेसिल पॉईंट, पनोरमा पॉईंट अशा ठिकाणांनाही भेटी देता येतील.


पनोरमा पॉईंटमधून सूर्योदय आणि सूर्यास्त पाहिलं जाऊ शकतं. लूईजा पॉईंटवरून प्रबळ किल्ल्याचे सुस्पष्ट दर्शन होतं. वन ट्री हिल पॉईंट, हार्ट पॉईंट, मंकी पॉईंट, पोर्क्युपाईंन पॉईंट, रामबाघ पॉईंट अशी मुख्य ठिकाणेही पाहता येतील.


हेदेखील वाचा - 


Historical Tourism : कडक उन्हाळ्याआधी फिरुन ‘या’ ही सुंदर ठिकाणे

Konkan Coastal Tourism : कऱ्हाटेश्वर, नांदिवडे अन्‌ जयगडला जा फिरायला

Ratnagiri best Tourism : राजापुरात पाहायला जा ‘ही’ अद्भूत ठिकाणे

Konkan kandalvan Safari : कांदळवनांचं पर्यटन करणाऱ्या गावात नक्की जा!

Discover Konkan : कोणार्कचं नव्हे तर कोकणातही आहे अप्रतिम सूर्यमंदिर!

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

Discover Konkan : वेंगुर्लाला गेलात! ‘ही’ ठिकाणे एकदा तरी नक्की फिरा

Unexplored Konkan : वालावल, नेरुर अन् निवती खुणावतोय!

Unexplored Konkan : कोकणात दडलीय ही सुंदर ठिकाणे, तुम्ही पाहिली का?

Konkan Travel : रत्नागिरीतील ‘मालगुंड’ला कधी गेलाय का? ही सुंदर ठिकाणे पाहा…

Unseen Konkan: मालवणमधील ‘ही’ प्रसिध्द ठिकाणे पाहिली का?


 https://pudhari.news/latest/526399/maharashtra-tourism-kadyavrcha-ganpati-matheran-and-toy-train-trip/ar

 

मातीचे आरोग्य: अन्नसुरक्षा, पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा पाया

माती ही केवळ शेतीची जमीन नसून ती संपूर्ण सजीवसृष्टीचा आधार आहे. मानवाचे अस्तित्व, अन्नाची निर्मिती, जलसाठ्यांचे संवर्धन, हवामान संतुलन आणि ज...