महाराष्ट्रातील एलोराच्या लेण्यांमध्ये असलेले हे मंदिर भगवान शिवला समर्पित आहे. कैलास मंदिर हे एक मोठे दगड कापून बांधलेले सर्वात मोठे मंदिर आहे. कैलास मंदिराची खास गोष्ट म्हणजे या मंदिराची रचना केवळ एका दगडावर कोरून बनवण्यात आली आहे आणि ती एकाच दगडावर बनवलेली जगातील सर्वात मोठी आकृती आहे. कैलास मंदिर महाराष्ट्रातील एलोरा येथे स्थित आहे. राष्ट्रकूट वंशाचे नरेश कृष्ण (प्रथम) याने ७५७-७८३इ. स. मध्ये या मंदिरांची निर्मिती केल्याचे म्हटले जाते. एलोरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विस्तीर्ण मंदिरांची साखळी आहे. अखंड खडक किंवा शिला म्हणता येईल ते कट करून कैलास मंदिरात सुंदर स्तंभ बनवण्यात आले आहेत. अखंड खडक कोरून वरून खाली असे मंदिर कोरण्यात आल्याचे सांगितले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या मंदिरांवरील नक्षीकाम, सुरेख आकृत्या, कोरीव खघडण कशी बनवली असेल, हे एक रहस्य आहे. कारण त्यावेळी त्यावेळी आजच्या तंत्रज्ञानाप्रणाणे मशीन्स नव्हते. बाहेरून मूर्तींचे समूह कोरून द्रविड शैलीमध्ये मंदिराचे रूप दिले आहे. भगवान शिवच्या या मंदिराचा अद्वितीय रचनेची दखल घेत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे.
Thursday, September 7, 2023
वेरुळचे कैलास मंदिर
Tuesday, September 5, 2023
Karneshwar Temple :संभाजी महाराजांचे वास्तव्य असलेले 'संगमेश्वर-कर्णेश्वर'
https://pudhari.news/maharashtra/622526/shravan-2023-maharashtra-sangmeshwar-karneshwar-temple/ar
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हे तसे प्रसिद्ध ठिकाण. ऐतिहासिक गाव म्हणून या गावाची ओळख आहे. या तालुक्याचे मुख्यालय संगमेश्वर गावापासून १७ किलोमीटरवर असलेल्या देवरुख येथे आहे. सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असल्याने याला संगमेश्वर असे नाव मिळाले आहे. ते परिसरातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथून रत्नागिरीपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर हे मुंबई - गोवा महामार्गावर वसलेले आहे. तसेच कोकण रेल्वेने देखील संगमेश्वरला जाता येते. छत्रपती संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे. अशा ठिकाणी कर्णेश्वराचे प्राचीन मंदिर पाहायला मिळते. हे महामार्गापासून थोडे आत असल्यामुळे सहजासहजी नजरेस पडत नाही.
संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरपेक्षाही संगमेश्वर खूप जुनं मंदिर असल्याचे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास ‘रामक्षेत्र’ असेही म्हटले जाते. संगमेश्वरला जाण्यासाठी राजापूरची गंगा ठिकाणापासून अडीच तासांचा रस्ता आहे. सुरुवातीलाच संगमेश्वर हे छोटेखानी महादेवाचं मंदिर दिसतं. नदीच्या किनारी वसलेलं खूप सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे. पण, ५ मिनिटाच्या अंतरावर कर्णेश्वराचं मंदिर आहे. पण, ते सहजासहजी दृश्यास पडत नाही. एका लोखंडी पुलावरून पुढे गेल्यानंतर एखाद्या घराच्या पायऱ्या असल्याप्रमाणे जांभा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक विस्तीर्ण मैदान लागते. या मैदानावर कर्णेश्वराचे प्रसिध्द महादेव मंदिर आहे.
कर्णेश्वर मंदिर –
हे महादेवाचे प्रसिध्द मंदिर आहे. हे भूमीज नागर शैलीतील मंदिर आहे. कर्णेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर गावात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेपासून थोडे पुढे गेल्यावर हे आहे. इसवी सन २०१२ मध्ये या मंदिराला पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.
कोल्हापुरातील खिद्रापूरच्या मंदिराच्या स्थापत्यशैलीशी मिळते-जुळते असलेले कर्णेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर खिद्रापूरपेक्षाही जुने असल्याचे येथील मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून ओळखते. काही जण हे मंदिर कर्ण राजा (कोल्हापूर) ने बांधले असावे असे म्हणतात. तर काही जण इ.स. १०७५ ते १०९५ या काळात गुजरातच्या चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे.
कर्णेश्वर या महादेवाच्या देवालयात ५ पालथी ताटे कोरलेली आहेत. आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नामक राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. देवालयात पांडवकालीन लिपीत कोरलेले लेख आहेत. कर्णेश्वराच्या देवालयाजवळ एक सूर्य मंदिर आहे.
या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर गणपती, लक्ष्मी, महिषासूरमर्दिणी, विष्णू अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. अतिशय आखीव रेखीव कोरीव काम असलेल्या या मूर्ती भक्तांच्या चटकन लक्ष वेधून घेतात. त्याकाळात इतकी सुंदर शिल्पे कशी काय घडवली असावीत, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. मंदिरात गेल्यानंतर भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आढळते. बाहेर कितीही ऊन पडलेलं असो वा गर्मी असो, मंदिरात पाऊल ठेवताच मनाला आणि शरीराला शितलता वाटते. गर्भगृहात कर्णेश्वराची पिंड आहे. सोबत पार्वतीची मूर्तीही आहे. येथे सुंदर प्रभावळदेखील दिसते.
कसे जाल?
संगमेश्वर बस स्थानकापासून संगमेश्वर रेल्वेस्टेशन ४ कि. मी. अंतरावर आहे. संगमेश्वर बस स्थानकापासून देवरुख १७ कि. मी. अंतरावर आहे. साखरपाला जाण्यासाठी दर ३० मिनिटांनी देवरुख येथून बस आहेत. 'कोल्हापूर'ला जाण्यासाठी या मार्गाचा वापर होऊ शकतो तसेच संगमेश्वराहून रत्नागिरी, लांजा आणि राजापूरकडे जाणाऱ्या बसेस आहेत.
आजपर्यंत कुणीही उलगडू शकले नाही 'या' ५ मंदिरांचे रहस्य, असे या मंदिरांमध्ये आहे तरी काय?
भारताची समृद्ध संस्कृती, संपत्ती, इतिहास आणि अनेक रहस्यमय गोष्टींनी वेढलेला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा एक असा देश आहे, जिथे मंदिरांच्या मागील कहाणी अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. महाराष्ट्रातील कैलास मंदिर असो वा तामिळनाडूतील ऐरातेश्वर किंवा ओडिशातील लिंगराज आजपर्यंत 'या' खास मंदिरांचे कोडे सुटलेले नाही. वर्षानुवर्षे या मंदिरांचे संशोधन सुरू आहे. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या संशोधकांना अभ्यास करूनही हाती लागलेल्या नाहीत.
कैलास मंदिर
कैलास मंदिर हे भगवान शिवला समर्पित आहे. कैलास मंदिर सर्वात मोठे रॉक-कट मंदिर आहे. १६ व्या शतकात छत्रपती संभाजीनगरच्या एलोरा गुंफामध्ये बनवण्यात आलं आहे. कैलास गुंफा मंदिराची रचना अशी एक अद्भूत बाब आहे, जी कुणालाही न पटणारी आहे. एका मोठ्या खडकातून हे मंदिर बनवण्यात आले आहे. पुरातत्ववाद्यांच्या माहितीनुसार, अर्थ जाणून घेण्यासाठी ३० मिलियन संस्कृत नक्षी आतापर्यंत डिकोड करण्यात आलेले नाही.
लिंगराज मंदिर
ओडिशातील भुवनेश्वर हे सर्वात मोठे मंदिर आहे. यामध्ये भगवान शिवला समर्पित ५४ मीटरचे हे मंदिर आहे. हे मंदिर १०९० ते ११०४ ई. दरम्यान निर्माण करण्यात आलं होतं. असे म्हटले जाते की, गर्भ गृहाच्या आत, लिंगम स्वत: उत्पन्न झाले आहे, म्हणून त्यास स्वयंभू म्हटले जाते.
ऐरावतेश्वर मंदिर
तामिळनाडूमध्ये १२ व्या शतकात चोल राजांनी ऐरावतेश्वर मंदिराची निर्मिती केली होती. येथील मंदिराच्या पायऱ्या खूप गुढ आहेत. या पायऱ्यांमधून संगीत ऐकू येते. आश्चर्य वाटले ना? पण हे मंदिर इतक्या खास रितीने बनवण्यात आले की, या मंदिराच्या पायऱ्यांवर चढताना ध्वनी निर्माण होतात. संगीताच्या विविध ध्वनी इथे एकायला मिलतात.पण, या संगीताच्या मागे काय रहस्य आहे, हे आतापर्यंत कुणीही जाणू शकले नाही.
टिटलागढचे शिव मंदिर
असे म्हटले जाते की, ओडिसातील टिटलागढ येथे खूप उष्णता असते. याठिकाणी एक डोंगर आहे. ज्यावर शिव मंदिर स्थापित आहे. येथील खडकांमध्ये इतकी गर्मी असते की, लोकांना घामाच्या धारा लागतात. पण मंदिरावर उष्णतेचा कोणताही परिणाम होत नाही. मंदिरात इतकी थंडी आहे की, अनुभवणाऱ्यास आश्चर्य वाटेल. इतक्या गरमीमध्ये हे मंदिर इतके थंड कसे असू शकते? मंदिराच्या बाहेर येताच पुन्हा गरमीने बेहाल होतं.
निष्कलंक महादेव मंदिर
अरब समुद्राच्या किनारी निष्कलंक महादेव मंदिर एक प्रसिद्ध रहस्यमयी मंदिर आहे. हे मंदिर गुजरातच्या भावनगरमध्ये कोलियाक समुद्रकिनारी असून या पवित्र मंदिरात ५ शिवलिंग आहेत. हे स्वयंभू मंदिर असल्याचे म्हटले जाते. अरब सागराजवळ हे मंदिर असल्याने समुद्रात भरती आल्यावर शिवलिंग पाण्याने झाकून जाते. या मंदिराचा इतिहास महाभारत काळापासून जोडले गेले आहे. असे म्हटले जाते की, या ठिकाणी पांडवांनी अनेक वर्ष तप केलं होतं, असेही म्हटले जाते.
Tuesday, August 22, 2023
Bijli Mahadev Temple: या मंदिरावर १२ वर्षातून एकदा पडते वीज, असा घडतो चमत्कार
हिमाचल प्रदेशातील सुंदर पर्वतीय प्रदेशातील एक म्हणजे कुल्लू. निसर्गाने वेढलेलं आणि समृद्ध, सुंदर घरे, प्राचीन संरचनांपर्यंत अनेक गोष्टींसाठी ओळखले जाते. कुल्लू जिल्ह्यातील एका अनोख्या मंदिराविषयी काही रंजक गोष्टी सांगितल्या जातात. या मंदिराला खूप धार्मिक महत्त्व आहे. हे मंदिर बिजली महादेव म्हणून ओळखले जाते.
बिजली महादेव मंदिर हे २ हजार ४६० मीटर उंचीवर असलेल्या कुल्लू खोऱ्यातील काशवारी या सुंदर गावात आहे. हे मंदिर शिव देवतेला समर्पित आहे. भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांमध्येही याची गणना होते. अनेक पर्यटकांचे हे आवडते ठिकाण आहे. कुल्लू घाटीतील सुंदर गाव काशवरी येथे हे बिजली महादेव मंदिर आहे. (Bijli Mahadev Temple). हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक असल्याचे म्हटले जाते.
रिपोर्टनुसार, मंदिराच्या आत स्थित असलेले शिवलिंग प्रत्येक वर्षी १२ वर्षांनी विजेच्या संपर्कात येते. ज्यामुळे शिवलिंग खंडित होते. यानंतर पुजारी शिवलिंग अन्न, डाळ आणि पीठ तसेच मीठविरहित लोण्याच्या मिश्रणाने जोडतात. स्थानिक लोक हा भगवान शिवचा आशीर्वाद मानतात. काही लोकांचे हेदेखील म्हणणे आहे की, ही वीज एक दिव्य आशीर्वाद आहे, ज्यामध्ये अनेक शक्ती असतात.
Nagchandreshwar Mandir : वर्षातून एकदाच उघडते उज्जैनचे प्रसिद्ध नाग मंदिर, काय आहे खासियत?
देशात शतकानुशतके नागाची पूजा करण्याची परंपरा आहे. आपल्या देशात नागांचे अनेक प्रसिद्ध मंदिरेही आहेत. यापैकी एक आहे- उज्जैनमधील नागचंद्रेश्वर मंदिर. उज्जैनमधील महाकाल मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर नागचंद्रेश्वर मंदिर आहे. (Nagchandreshwar Mandir) या मंदिराची सर्वात मोठी खासियत ही आहे की, केवळ नागपंचमीच्या दिवशी दर्शनासाठी हे मंदिर उघडले जाते. (Nagchandreshwar Mandir)

असे म्हटले जाते की, नागराज तक्षक स्वत: या मंदिरात आहेत. त्यामुळेच केवळ नागपंचमीच्या दिवशी हे मंदिर उघडून नाग देवतेची पूजा-अर्चना केली जाते. नागचंद्रेश्वर मंदिरात ११ व्या शतकातील मूर्ती आहे आणि असा दावा केला जातो की, अशी मूर्ती जगभरात कुठेही नाही. ही मूर्ती नेपाळहून आणण्यात आली होती.

नागचंद्रेश्वर मंदिरात भगवान शंकर नागावर विराजमान आहेत. मंदिरात स्थापित केलेली प्राचीन मूर्ती, भगवान शिव, भगवान गणेश आणि माता पार्वती यांच्यासह दशमुखी नागावर विराजमान आहेत. पौराणिक मान्यतेनुसार, सर्पराज तक्षक यांनी भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती. सर्पराजाच्या तपश्चर्येने भगवान शंकर प्रसन्न झाले आणि मग त्यांनी नागांचा राजा तक्षक नाग याला वरदान म्हणून अमरत्व दिले. तेव्हापासून तक्षक राजा परमेश्वराच्या सान्निध्यात राहू लागला.

या प्राचीन मंदिराची उभारणी परमार राजा भोजने इ. स. १०५० च्या आसपास केली होती. यानंतर सिंधिया घराण्याचे महाराज राणोजी सिंधियाने १७३२ मध्ये महाकाल मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. त्यावेळी या मंदिराचाही जीर्णोद्धार झाला होता. नागराजवर विराजमान भगवान शंकराचे दर्शन घेण्यासाठी लाखो लोक वर्षाची प्रतीक्षा करतात.
रिपोर्टनुसार, भगवान नागचंद्रेश्वरची त्रिकाल पूजेची परंपरा आहे. त्रिकाल पूजेचा अर्थ तीन वेगवेगळ्या समयी केलेली पूजा होय. पहिली पूजा मध्यरात्रीला महानिर्वाणी, दुसरी पूजा नागपंचमीच्या दिवशी दुपारी प्रशासनद्वारा केली जाते. तिसरी पूजा नागपंचमीच्या सायंकाळी भगवान महाकालच्या पूजेनंतर मंदिर समिती करते. पुन्हा रात्री १२ वाजता एक वर्षासाठी दरवाजे बंद केले जातात.
Sunday, August 20, 2023
Shravan Special 1st somvar - Tungnath Temple: जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले शिव मंदिर
https://pudhari.news/features/tour-and-travels/620319/wolrld-highest-shiv-temple-tungnath-in-uttarakhand/ar
उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यात जगातील सर्वात उंच शिव मंदिर स्थित आहे. (Shravan Special – Tungnath Temple) या मंदिराला तुंगनाथ मंदिर देखील म्हटले जाते. असे म्हटले जाते की, या मंदिराची निर्मिती पांडवांद्वारे करण्यात आली होती. तुंगनाथ पर्वतावर स्थित असलेल्या या मंदिराची उंची ३६४० मीटर आहे. तुंगनाथ मंदिर पंचकेदार (तुंगनाथ, केदारनाथ, मध्य महेश्वर, रुद्रनाथ आणि कल्पेश्वर) पैकी सर्वात उंचावर स्थित आहे. असे म्हटले जाते की, याच ठिकाणी शिव भुजा रूपात विद्यमान आहेत. म्हणूनच प्राचीनकाळापासून या मंदिरात भगवान शिवच्या भुजांची पूजा होते. (Shravan Special – Tungnath Temple)
तुंगनाथ मंदिर विषयी पौराणिक मान्यता आहे की, या मंदिराची निर्मिती पांडवांद्वारे करण्यात आली होती. जेव्हा महाभारत युद्धात नरसंहाराने शिवजी पांडवांवर नाराज होते, तेव्हा त्यांना प्रसन्न करण्यासाठी पांडवांनी हे मंदिर बनवलं होतं. याशिवाय असे म्हटले जाते की, माता पार्वतीने भगवाव शिवला पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी तुंगनाथजवळ तपस्या केली होती.
चंद्रशिलाच्य़ा दर्शनाविना तुंगनाथ मंदिराची यात्रा अपूर्ण मानली जाते. मंदिरापासून काही अंतरावर चंद्रशिला मंदिर आहे. येथे रावणशिला आहे, ज्याला (स्पीकिंग माउंटेन) नावाने ओळखले जाते. सगळीकडे बर्फ, मऊमऊ गवत, रंग-बिरंगे फूल आणि ढगांनी व्यापलेला धुक्याने वेढलेला हा परिसर तुम्हाला भुरळ घालेल. जानेवारी-फेब्रुवारीमध्ये येथे फक्त बर्फाची चादर दिसते. म्हणूनच या ठिकाणाला ‘मिनी स्वित्झर्लंड’ असेही म्हणतात.
असेही म्हटले जाते की, उत्तराखंडचे तुंगनाथ मंदिर महादेव आणि पार्वती देवीला समर्पित आहे. १८ व्या शतकात संत शंकराचार्यांनी या मंदिराचा शोध लावल्याचे सांगितले जाते. मंदिरासोबतच आजूबाजूचे सौंदर्यही मंत्रमुग्ध करणारे आहे.
Tuesday, July 18, 2023
Dudhsagar Waterfall Crowd : 'दूधसागर'ला तरुणांची इतकी गर्दी का होतेय?
https://pudhari.news/features/youthworld/596007/why-dudhsagar-waterfall-is-crowded-with-tourist-trekkers/ar
Last Updated: July 17, 2023, 1:17 PM
दूधसागरला हजारोंच्या संख्येने पोहोचलेले पर्यटक, ट्रेकर यांचा काल रविवारी दि. १७ रोजी चांगलाच हिरमोड झाला. (Dudhsagar Waterfall Crowd) शनिवार, रविवार असे सुट्टीचे दिवस असल्याने अगदी पहाटेपासूनच कॅसल रॉक रेल्वे स्टेशनवर गर्दी होऊ लागली. तर साऊथवरून येणारे बहुसंख्य पर्यटक कोलेममधून दूधसागर धबधब्याजवळ चालत येत होते. ही संख्या जवळपास दोन हजारांहून अधिक असावी. देशभरातील लोक दूधसागर धबधबा पाहण्याच्या इच्छेने येथे दाखल होत असतात. मात्र, मुळातच याठिकाणी जाण्यास बंदी असल्याने रेल्वे पोलिसांसह, वनकर्मचाऱ्यांनी पर्यटक, ट्रेकर्सना अडवले. त्यांना परत माघारी जाण्याची सूचना केली. यामध्ये तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. यावेळी हजारोंच्या संख्येने तरूण रेल्वे रूळावर थांबून राहिले. पण, दूधसागर धबधब्याला तरुणांची इतकी मोठी गर्दी का होतेय? (Dudhsagar Waterfall Crowd)
निसर्गाचा अनोखा चमत्कार
निसर्गाच्या कुशीत लपून बसलेला दूधसागर धबधबा या ठिकाणापर्यंत पोहोचणं, एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. असेच एक ठिकाण म्हणजे दुधासारखा अखंड वाहणारा, चमचमत्या ताऱ्यांप्रमाणे जल वाहून नेणारा आणि खळाळत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारा धबधबा म्हणजे ‘दूधसागर.’ याचा अर्थ स्पष्ट आहे. दूधसागर म्हणजेच दुधाचा धबधबा असं म्हणता येईल. हा धबधबा मोल्लेम राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात आहे. हे ठिकाण अद्भूत, भव्य आणि निसर्गाची ओढ लावणारं आहे.
दूधसागर धबधबा-
दूधसागर हा भारतातील पाचवा सर्वात उंच धबधबा आहे जो १०२० फूट उंचीवरून कोसळतो. गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर हा धबधबा आहे. येथे जाण्यासाठी जवळचे दोन रस्ते आहेत. एक गोव्याहून आणि दुसरा कर्नाटकाहून. दूध सागर धबधबा गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर मांडवी नदीवर स्थित आहे. हा धबधबा जगातील २२७ व्या क्रमांकाचा सर्वात सुंदर धबधबा आहे. विदेशी पर्यटकांनाही या धबधब्याची भूरळ आहे.
बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग –
चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातील एका भागाचे शूटिंग याच धबधब्यावर झाले आहे. चेन्नई एक्सप्रेस या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यावर काही दृश्ये या धबधब्यावर चित्रीत करण्यात आली होती. उन्हाळ्यात हा धबधबा कोरडा पडतो. मात्र इतरवेळी हा धबाधबा पाहायला जाणे, हे पर्यटकांचे स्वप्न असते.
रेल्वेमधून नक्की जा!
निजामुद्दीन एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस या रेल्वे दूधसागरहून मार्गक्रमण करतात. तुम्हाला या धबधब्याच्या ठिकाणी प्रत्यक्षात जाता येत नसले तरी दक्षिण भारताकडे जाणाऱ्या या रेल्वेमधून तुम्ही प्रवास करत हा धबधबा पाहू शकता. रेल्वेमधून हा धबधबा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरेल.
ट्रेकिंगसाठी थ्रील अनुभव –
बहुसंख्येने ट्रेकर्स दूधसागर ट्रेक करण्यासाठी येत असतात. कॅसलरॉकपासून १२ किलोमीटर व कुलेमपासून ३ किलोमीटरपर्यंत चालत ट्रेकर्स धबधब्याजवळ जातात. तर काही जण रेल्वेतून उतरून जंगल आणि रेल्वे ट्रॅक वरून चालत जात दूधसागर धबधब्यापर्यंतचा १६ किलोमीटर ट्रेक पूर्ण करतात. कोलेम असो वा कॅसल रॉक…ट्रेकर्स रेल्वे ट्रॅकचाच मार्ग निवडतात. रेल्वे रुळावरून इतक्या किलोमीटरचा ट्रेक पूर्ण करणे, ट्रेकर्ससाठी थ्रील असते. ट्रेकर्स दूधसागर धबधब्याला भेट देऊन भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यास भेट देतात. आसपासची छोटी-मोठी ठिकाणे जंगलांनी वेढलेली दिसतात, जी पर्यटक, ट्रेकर्स-तरुणांना आकर्षित करणारी आहेत.
भगवान महावीर अभयारण्य किंवा मोल्लेम राष्ट्रीय उद्यान –
दूधसागर धबधबा भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यान यांच्यामध्ये आहे. एका बाजूला डोंगर कपाऱ्यांमधून वाहणारा धबधबा आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड घनदाट वने आणि पाने -फुले, औषधी वनस्पतींनी वेढलेली जंगले, स्पाईस गार्डन असा सगळा निसर्गाचा पसारा दूधसागरच्या सभोवताली आहे. धबधब्या भोवती जैवविविधतेने समृद्ध असे भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यान आहे, हे पाहण्यासाठी लोक हमखास जातात.
मोल्लेम जंगल
मोल्लेम जंगल हे घनदाट सदाबहार आणि निम्न-सदाबहार वनांनी वेढलेले आहे. हे जंगल विशाल वन्य जीव विविधतेने नटलेले आहे. येथे वाघ, बिबट्या, गवे आणि अन्य २०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आणि आहेत. येथे मायसेना जीनस नावाची प्रकाश देणारी मशरुमची प्रजातीही आढळते. तसेच किंग कोबरा, हंप-नोज्ड पिट वायपर, इंडियन रॉक पायथॉन अशा सापांच्या प्रजाती आढळतात.
तांबडी सुरला मंदिर –
माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना-फ़ुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी!!” ही बा. भ. बोरकरांनी लिहिलेली कविता येथील निसर्गाला तंतोतंत लागू पडते. तांबडी सुरला येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. अनोख्या शैलीतील या मंदिराची निर्मिती १२ व्या शतकात झाली आहे. हे मंदिर कदंब यादव वंश काळातील वास्तुकला शैलीचे एकमेव स्मारक आहे. तांबडी सुरला मंदिर पणजीपासून ६६ किलोमीटर आहे. तांबडी सुरला जवळ धबधबादेखील आहे. जो तांबडी सुरला मंदिरापासून २१ किलोमीटर अंतरावर आहे. तांबडी सुरला मंदिरापर्यंत गाडी जाते.
नेत्रावली धबधबा –
पश्चिम घाटात वाईल्डलाईफ सॅन्चुरी येथील नेत्रावली धबधबा सर्व निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. मान्सूनमध्ये फिरण्यासाठी हे सर्वांत उत्तम स्थळ आहे. येथे बर्ड वॉचिंग आणि स्पॉटिंग वाईल्ड लाईफ पाहू शकता. येथे Mhadei Wildlife Sanctuary सर्वात प्रमुख आहे.
मातीचे आरोग्य: अन्नसुरक्षा, पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा पाया
माती ही केवळ शेतीची जमीन नसून ती संपूर्ण सजीवसृष्टीचा आधार आहे. मानवाचे अस्तित्व, अन्नाची निर्मिती, जलसाठ्यांचे संवर्धन, हवामान संतुलन आणि ज...
-
संगमेश्वरातील कसबा हे छत्रपती संभाजी महाराजाच्या पावनस्पर्शाने पवित्र झालेले गाव आहे. याच परिसरात छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक आहे. कसब...
-
कोकण फिरायचं म्हटलं तर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती गोष्ट म्हणजे, वाहतूक आणि रस्ते. कुठल्याही ठिकाणी जाताना रस्ते जर चांगले असतील तर तासन...
-
मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...









