Monday, January 22, 2024

Kolhapur-Sangli Ramling Temples : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील 'या' राममंदिर आणि रामलिंग स्थळांना भेट दिलीय का?

 


कोल्हापूर जिल्ह्यात रामलिंग नावाची अनेक ठिकाणे आहेत. आज आपण काही प्रसिद्ध रामलिंग मंदिरांची माहिती पाहणार आहोत. खूप कमी खर्चात तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता. शिवाय एक रामलिंग आणि परिसर पाहण्यासाठी एका दिवसाचा कालावधी पुरेसा ठरतो. सर्व ठिकाणे डोंगराच्या कुशीत, धबधबे, खळखळणारे झरे आणि हिरव्यागार निसर्गात पाहता येतात. 

हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ रामलिंग (Ramling) म्हणून असेच एक स्थान आहे. रामलिंग नावाची अनेक ठिकाणे आहेत.

गगनबावड्यातील रामलिंग -  

कोल्हापूर जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि हिरवाईने नटलेला परिसर म्हणजे पळसंबे. पळसंबे (ता. गगनबावडा) येथील रामलिंग मंदिर आणि गुहेतील शिवलिंग अशी दोन क्षेत्र. (Kolhapur-Sangli Ramling Temple ) याठिकाणी देशभरातील पर्यटक भेटी द्यायला येतात. निसर्गाचा अद्भूत चमत्कार म्हणावा, असे हे ठिकाण. इथे गेल्याशिवाय या चमत्काराची प्रचिती येणार नाही. त्यामुळे तुम्ही इथे कुटुंबासह किंवा सोलो ट्रीपदेखील करू शकता. (Kolhapur-Sangli Ramling Temple )

गगनबावडा तालुक्यात पळसंबे गावामध्ये रामलिंग गुहा आणि मंदिर आहेत. येथील आकर्षण म्हणजे पावसाळ्यात धो-धो वाहणारा धबधबा, दाट धुके आणि उन्हाळ्यातदेखील गारवा देणारे ठिकाण. हे ठिकाण पांडवकालीन लेण्यांसाठीही प्रसिद्ध आहेत. अखंड शिळेमध्ये कारलेले रामलिंग हे आणखी एक वैशिष्ट्य सांगता येईल. 

 रामलिंगचा धबधबा आणि रामलिंग गुहेत पडणारे पाणी एक वेगळी अनुभूती देऊन जाते. या गुहेत पाणी कमी असताना जाता येते. गुहेच्या दगडांमधून पाझरणारे पाणी अंगावर झेलत शिवलिंगाचे दर्शन गुहेत करता येते. गुहेत काळोख असल्यामुळे येथे जाताना मोबाईलची टॉर्च अथवा मोठी टॉर्च घेऊन जावे. खळखळणाऱ्या नितळ पाण्यातून मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणे, अविस्मरणीय आहे. 

पळसंबे रामलिंग स्थळी कसे जाता येईल? 

कोल्हापूर शहरापासून ४२ किलोमीटर अंतरावर पळसंबे गाव आहे. कोल्हापूर-बालिंगा-कळे मार्गे पळसंबे. पळसंबे गावापासून डावीकडे ३ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून या ठिकाणी चारचाकी-दुचाकी जाते. आडबाजूला हे रामलिंग असल्यामुळे नीरव शांतता, हिरवागार निसर्ग आणि धार्मिक पर्यटन अशी ओळख ठरली आहे. येथे बौद्धकालीन लेणी असल्याचेही म्हटले जाते. (Kolhapur-Sangli Ramling Temple )

गगनगिरी महाराजांचे मठ - 

हे ठिकाण पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जात असले तरी त्यास व्यावसायिक रूप देण्यात आलेले नाही. याठिकाणी अनेक पर्यटकांसोबत शाळेच्या सहलीदेखील भेट देण्यास येतात. या रामलिंग ठिकाणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे गगनगिरी महाराजांचे बाजूलाच मठ आहेय या मठाचा विस्तीर्ण परिसर असून अतिशय सुंदर आणि स्वच्छ आहे. तुम्ही याठिकाणी बसून जेवणाचा आस्वाददेखील घेऊ शकता. 

काय खाता येईल? 

पळसंबे गावात खाण्याची कोणतीही सोय नाही. इथे जाताना देखील पिण्यासाठी पाणी घेऊन जावे. पण, पळसंबेपासून पुढे गेल्यानंतर गगनबावड्याचे मुख्य ठिकाण एसटी स्टॅण्डजवळ शाकाहारी जेवण मिळू शकते.

 शिवाय, नाष्टा, चहा-पाण्याची अनेक दुकाने इथे आहेत. 

आळते रामलिंग - 

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात आळते गावाजवळ रामलिंग आहे. रामलिंग नावाची अनेक ठिकाणे आहेत. आळते गावात डोंगराच्या कुशीत दडलेलं रामलिंग. याठिकाणी गेला तर तुम्हाला मंदिराच्या बाहेर गोमुखातून सतत पाण्याची धार पडताना दिसेल. येथील पाणी कधीच आटत नाही. १२ महिने २४ तास ही धार सुरु असते. रामलिंगच्या गुहेतून गेल्यानंतर शिवपिंड आहे, या शिवपिंडीवर गुहेतील काळ्या दगडातून झिरपणारे पाणी पडत असते. संपूर्ण गुहेत दगडांमधून पाझरणारे पाणी, गारवा आणि मनाला समाधान देते. 


हे पाणी अत्यंत पवित्र आणि स्वच्छ आहे. मंदिर परिसरात अनेक छोटी मंदिरे आणि पाण्याचे कुंड आहेत. विठोबा रखुमाईची मूर्ती, धुनी अग्निकुंड, पार्वती, गणपती, वीरभद्र, कालभैरव यांच्या मूर्ती आहेत. सप्तर्षीच्या नावाची मंदिरे आणि दगडी धर्मशाळा देखील आहे. कोल्हापूरपासून गेल्यास एका दिवसात ही ठिकाणे पाहून होतात. या मंदिर परिसरात धुळोबा जागृत देवस्थान मंदिरही आहे. 

याशिवाय काय पाहता येईल? 

बाहुबली (कुंभोज) हे जैन धर्मीयांचे कोल्हापूर जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र आहे. जहाज मंदिर आणि संग्रहालय, पद्मावती मंदिर, आलमप्रभू डोंगर, आळते. 

काय खाल? 

याठिकाणी शुद्ध सात्विक जेवणाचे हॉटेल आहेत. पाणी, मुलांसाठी खाऊची छोटी दुकानेदेखील आहेत. 

बहेतील रामलिंग -  

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीमध्ये रामलिंग नावाचे बेट आहे. या बेटावर शिवपिंड आणि रामाचेही स्थान आहे. हे क्षेत्र ‘बहेचा मारुती’ म्हणूनही ओ‍ळखले जाते. मारुतीचे क्षेत्र म्हणजे बहे बोरगाव हे खूप निसर्गरम्य ठिकाण आहे. बहे रामलिंग बेटावर कसे जाता येईल पाहा. 

बहे रामलिंग स्थळी कसे जाता येईल?

कोल्हापूरहून जायचे असल्यास एनएच ४ हायवेवरून तुम्हाला सर्वात आधी इस्लामपूरमध्ये जावे लागेल. येथून सहा किलोमीटरवर बहे गाव आहे. या गावच्या अलिकडेच डाव्या बाजूने बंधारा असून तेथून थोड्या अंतरावर चालत जावे लागते, जिथे कृष्णेच्या नदीमध्य़े रामलिंग बेट आहे. 

काय खाल? 

इस्लामपूर शहर मोठे असल्यामुळे याठिकाणी जेवणाची सर्व सोय उपलब्ध आहेत. अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट्स उपलब्ध आहेत. 

शिवाय तुम्हाला इस्लामपूरमधील राजाराम नगर येथे प्रभू श्रीरामांचे मोठे मंदिर आहे. येथे रामनवमीला मोठी  यात्रा भरते.


Friday, January 19, 2024

Raigad Explore : जिजाऊंचे पाचाड-शिवरायांच्या रायगडला गेला का?

स्वर्गसुख’ ज्याला म्हणतात, ते म्हणजे ‘दुर्गराज रायगड’ होय. आयुष्यात एकदा तरी ‘रायगडवारी’ करावी. जमलचं तर रायगडचा किल्ला डोंगराच्या पायथ्यापासून चालत सर करावा. पावसाळ्यानंतरचा रायगड किल्ला डोळ्यांनी पाहणं म्हणजे सुवर्णपर्वणीच होय. (Raigad Explore ) तुम्ही सोलो ट्रिप किंवा फॅमिली ट्रिपदेखील करू शकता. दाट धुक्यातील रायगड, वेगाने वाहणारं वारं आणि क्षणाक्षणाला बदलणारे हवामान पाहूनचं रायगड किती भव्य आणि दिव्य आहे, याची प्रचिती येते.


रायगडला रस्त्यावरून जाताना हा केवळ डोंगर आहे, असे वाटते. पण, त्याच भव्य डोंगराच्या माथ्याला गेल्यानंतर दिव्यत्वाची अनुभूती येते. रायगडला भेट देणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. तुम्हाला चालत जायचे असेल तर २ दिवसांचा वेळ काढून जावं लागेल. किंवा रोप वेतून जाण्य़ाचा पर्यायदेखील तुम्ही स्वीकारू शकता.

रायगड किल्ला –

इतिहासामध्ये रायगड किल्ल्याची एक खास ओळख आहे. रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’ होते. छत्रपती शिवाजीराजांनी रायगडचे महत्त्व पाहून १६ व्या शतकात आपल्या राज्याची राजधानी बनविली.

शिवरायांचा शिवराज्याभिषेक याच ठिकाणी झाला. शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगडाच्या भूमीला आयुष्यात एकदा तरी भेट नक्की द्यावी. दुर्गम, अजिंक्य अशा रायगडला जाण्याचा अनुभव पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात घ्यावा.

रायगड किल्यावर काय पाहाल?

शिवाजी महाराजांची समाधी, जगदिश्वर मंदिर, हत्ती तलाव, खुबलढा बुरूज, चोरदिंडी, हिरकणी बुरुज. (हिरकणी गावात अद्यापही हिरकणीचे वंशज राहतात)

नाणे दरवाजा, महादरवाजा, गंगासागर तलाव, पालखी दरवाजा, उंच मनोरे, बाजारपेठ, नगारखाना, रत्नशाळा, राजभवन, राजसभा, शिरकाई देऊळ, कुशावर्त तलाव, वाघ दरवाजा, टकमक टोक.

कुठे राहाल?

रायगडाच्या डोंगरावर राहण्यासाठी धर्मशाळा आहे. तेथे टेंटमध्येदेखील राहण्याची सोय होते. रायगडाच्या पायथ्याशी राहायचे असेल तर अनेक होम स्टे आणि हॉटेल्स, गेस्ट हाऊसेस उपलब्ध आहेत.

काय खाल?गडावर छोटी हॉटेल्स आणि खाऊ मिळण्याची छोटी दुकाने आहेत. यातून स्थानिकांना रोजगार प्राप्त होतो. रायगडाच्या पायथ्याला, अनेक हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि घरगुती जेवण मिळते.

यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे जेवण मिळते. चहा नाष्टादेखील येथे उपलब्ध होतो.


रोप वेची सुविधा –

दुर्गराज रायगड चढण्यासाठी कठीण वाटतो. पण ज्यांना चालायला जमत नाही ते रोप वे मधून जाऊ शकतात. रोप वेची व्यवस्था रायगडच्या पायथ्याशी आहे. माणसी ४०० ते ५०० रुपयांचे तिकिट या रोप वे साठी मोजावे लागतात.

पावसाळ्यात रायगड डोंगर परिसरातील जोरात वारे वाहून हवामान बदलते, त्यामुळे काही वेळा रोप वेची वाहतूक थांबवण्यात येते.

त्यामुळे अशा काही प्रसंगात वस्ती राहण्याची तयारी ठेवूनच रायगडला जावे. रायगड पायथ्यापासून तीन हजार फूट उंचीवर आहे. त्यामुळे रोप वेतून जाताना भव्य रायगडचा डोंगर, हिरवीगार सृष्टी, शेती-वने, घरे आणि सभोवतालचा निसर्ग आपल्याला सुखद क्षण देऊन जातो.

ट्रेकर्ससाठी सह्याद्रीतील सुखद अनुभव – सह्याद्रीचे कणखर डोंगर, दर्‍याखोऱ्या आणि जंगलातून निघणारा मार्ग शोधणार्या ट्रेकर्ससाठी रायगडवारी म्हणजे सुखद धक्का असतो. अनेक ट्रेकर्स रायगड सर करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत असतात. ((Raigad Explore) )

कोणत्या कालावधीत जाल?

रायगडला जाण्यासाठी पावसाळा संपत असताना किंवा संपल्यानंतरचा कालावधी उत्तम आहे. रायगडच्या डोंगरावरून पडणारे फेसाळणारे अनेक धबधबे चटकन लक्ष वेधून घेणारे असतात.

सोबत हिरवागार शालू पांघरून डोंगर ऐटीत उभारलेला दिसतो. त्यामु‍ळे रोप वे मधून जात असताना नयनरम्य अनुभूती येते.

कसे जाल रायगडला? 

मुंबईहून गोवा महामार्गाने माणगाव पार केल्यानंतर डावीकडे रायगडला जाणारा रस्ता आहे. महाडमार्गे रायगड १८५ किलोमीटर आहे

माँ जिजाऊंचे पाचाड –

रायगड किल्ल्यावरील थंड हवामान राजमाता जिजाऊ माँसाहेबांना मानवत नसल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचाड येथे भव्य राजवाडा बांधला होता. हा राजवाडा म्हणजे जिजामातांचे निवासस्थान होते.

पाचाडमधील जिजाऊंचे निवासस्थान

रायगडाला भेट दिल्यानंतर किल्ल्याच्या पायथ्याशी काही अंतरावर राजमाता जिजाऊंची समाधी आहे. ते गाव पाचाड होय. इथे जिजाऊंचे निवासस्थान असलेल्या राजवाड्याचे अवशेषदेखील पाहायला मिळतात.

पाचाड गावात उजवीकडे जिजाऊंचे निवासस्थान असलेला राजवाड्याचे अवशेष कितीतरी एकरात पाहायला मिळतात.

संपूर्ण दगडी बांधकाम असलला चौथरा, स्वयंपाक घर, घोडे बांधण्याची जागा, विहिरी, तटबंदी, चौकी पहारे, मुख्य इमारत, इतर छोट्या इमारती असे अवशेष पाहायला मिळतात. त्या निवास्थानाला ‘कोट’ असे म्हणतात. येथून ‘दुर्गराज’ रायगडचा दिमाखात उभा असलेला डोंगर नजरेस भरतो.

राजमाता जिजाऊंची समाधी

राजमाता जिजाऊंचे निवासस्थान असलेला राजवाडा पाहिल्यानंतर तिथून काही अंतरावर जवळच जिजाऊंची समाधी पाहायला मिळते. विस्तीर्ण जागेत असलेल्या समाधीच्या परिसरात नीरव शांतता आहे. सभोवताली हिरवेगार झाडे आणि मैदान परिसर आहे. ((Raigad Explore) )

कसे जाल पाचाड?

मुंबईहून माणगावमार्गे पाचाड हे अंतर १५७ किलोमीटर आहे.

गांधारपाले लेणी

डोंगरावर कोरलेली ही लेणी हायवेला लागूनच आहेत. लेण्यापर्यंत जायला पायऱ्या आहेत. ही लेणी गांधारपाले या गावाला लागून असलेल्या टेकडीवर आहेत. पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर ही लेणी आहेत. लेणी समूहात एकूण २८ लेणी असून त्यात ३ चैत्यगृह आणि १९ विहार आहेत. पायऱ्या चढण्यासाठी जवळपास २५ मिनिटे लागतात.

कसे जाल गांधारपाले लेणी पाहायला?

लेणी रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा हायवेवर (NH 17) महाड शहरालगत आहे. मुंबईपासून अंतर १७५ कि.मी. आहे.

चिपळूण परशुराम मंदिर –

खरंतर परशुरामाचे हे मंदिर महेंद्रगिरी नावाच्या डोंगरावर स्थित आहे. पण येथे पायथ्यापर्यंत गाडी जाते. गावातील परशुरामाच्या मंदिरामुळे गावाला परशुराम म्हणतात. या मंदिरात काळ, काम आणि परशुराम यांच्या तीन मूर्ती आहेत. परशुरामांची मूर्ती थोडी उंच असून आकर्षक आहे. मंदिराची स्थापत्यशैली वेगळी आहे. लाकडी बांमधकामावर सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. येथे परशुराम जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गावात तीन दिवस हा उत्सव असतो. शानदार वास्तूशिल्प आणि मंदिरावर हिंदू-इस्लामिक स्थापत्यशैलीचा प्रभाव दिसतो. या मंदिराची निर्मिती जवळपास ३०० वर्षापूर्वी ब्रह्मेन्द्र स्वामी यांनी केल्याचे म्हटले जाते.हे मंदिर शांत परिसरात आहे. परशुराम मंदिराच्या मागे रेणुका देवीचे मंदिर आहे. रेणुकामंदिर आणि परशुराम मंदिर यांच्यामध्ये बाणगंगा कुंड आहे. कुंडाच्या पलीकडे गंगामातेचे मंदिर आहे. या मंदिर परिसरात नक्षत्र गार्डनदेखील आहे. परशुराम मंदिराच्या जवळच ग्रामदेवी जाखमातेचे मंदिर आहे.

कसे जाल परशुराम मंदिर?

चिपळूणपासून ४ किलोमीटर अंतरावर मुंबई-गोवा हायवेवर हे मंदिर आहे. चिपळूणमध्ये लोटे औद्योगिक भागात डावीकडे जाणाऱ्या रस्त्याने परशुराम मंदिराकडे जाता येते. चिपळूण शहरातूनसुद्धा रिक्षाने मंदिराकडे जाता येते. चिपळूण शहराच्या अलीकडे दहा किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. मंदिराकडे जाणारा रस्ता अरूंद आहे. पण तिथे चारचाकी गाडी जाऊ शकते. हे मंदिर सहजासहजी नजरेस पडत नाही. पुढे पुढे गेल्यानंतर परशुरामाचे मोठे मंदिर दिसते. येथे गाडी पार्क करण्यासाठी मैदान आहे.


 https://pudhari.news/features/693043/maharashtra-explore-raigad-fort-pachad-jijamata-rajwada-village-chiplun-parshuram-temple-gandharpale-caves/ar

Thursday, November 30, 2023

Konkan-Vengurla Hidden Tourism : वेंगुर्ल्यात गेला तर 'आरवली'ला नक्की भेट द्या, 'मोचेमाड' देईल 'बाली'चं फील



शिरोडा नजीक असणारे वेंगुर्ला हे पर्यटन स्थळ नजरेत भरणारे आहे.  फोंडा घाटापासून दिड तास अंतरावर वेंगुर्ला हे ठिकाण आहे. वेंगुर्लापासून गोवा हे केवळ तीन तास अंतर आहे. वेंगुर्ला बाजार जसे वर्दळीचे ठिकाण तसे पुढे पुढे गेल्यानंतर ही वर्दळ कमी होताना दिसतेय.  असंख्य ख्रिश्चन बांधवांची जुनी घरे आणि जुन्या गावाचे फिल देणाऱ्या वस्त्या, सर्वांचे लक्ष वेधून घेतात. प्रचंड पावसामुळे उतरत्या छपराची कौलारू घरे, कोकणी पद्धतीने बांधलेले अनेक घरे पाहून शहरी माणसांसाठी कुतुहलाचा भाग ठरतो. एकूणचं वेंगुर्ला गर्द झाडीत वसलेला आहे. पोफळीच्या, सुपारीच्या बागा, केळीच्या बागा, काजूची मळे, नारळाची झाडे, असंख्य नानाविध प्रकारच्या झाडे, फुलांनी सजलेल्या वेगुर्ल्याला एकदा का होईना! भेट द्यायला हवी.  

कसे जाल वेंगुर्ल्याला?

कोल्हापूर-राधानगरी अभयारण्य रोड-फोंडा घाट-फोंडा-पनवेस कोची कन्याकुमारी हायवे-कुडाळ तिठ्ठा-वेंगुर्ला बेळगाव रोड-वेंगुर्ला.

मानसीश्वर मंदिर -

मंदिरात नेहमीसारखी मूर्ती दिसत नाही. निराळ्या पद्धतीचे मंदिर हे वेगळेपण दर्शवते. 

कसे जाल मानसीश्वर मंदिराला?

वेंगुर्ला बाजारातून पुढे गेल्यानंतर रस्त्यालगत मानसीश्वरचे मंदिर आहे.

सागरेश्वर बीच -

सागरेश्वर समुद्रकिनारा निवांत आणि शांत आहे. वाहणारे खारे वारे शरिराला स्पर्शून गेल्यानंतर आपल्याला कोकण फील नक्कीच येईल. अनेक नौका समुद्रावर हेलकावे घेताना दिसतील. रात्रीच्या वेळी तुम्ही येथे कॅम्प फायर करून खळखळणाऱ्या समुद्राचा आनंद घेऊ शकता. 

सागरेश्वर बीच येथे कुठे राहाल?

सागरेश्वर बीच किनारी अनेक सुविधा आहेत. अनेक होम स्टे, हॉटेल्स आहेत. टेंटमध्येदेखील राहण्याची सोय येथे केली जाते.  

हँगिंग वुडेन हट्स -

सागरेश्वर बीच किनारी अनेक हँगिंग वुडेन हट्स आहेत. येथे अनेक मराठी अभिनेत्रींनी भेट दिलेली आहे. फोटोशूटसाठी हे ठिकाण परफेक्ट आहे. लाकडापासून बनवलेले हे हट्स तुम्हाला फोटो काढण्यास मोहात पाडतात.

वेंगुर्ला ऑबझरव्हेशन ब्रीज - वेंगुर्ला बंदर - वेंगुर्ला लाईट हाऊस -

वेंगुर्ल्यातील ऑबझरव्हेशन ब्रीज नव्याने बांधण्यात आले आहे. या ब्रीजवरुन संपूर्ण समुद्राचे दर्शन आणि वेंगुर्ला लाईट हाऊस पाहता येते. ब्रीजवरून काही अंतरावर वेंगुर्ला वाईट हाऊस आहे. या ठिकाणी रात्रीच्या वेळी जा. विद्युत रोषणाईने नटलेले वेंगुर्ला लाईट हाऊस नजरेत भरणारे आहे.  

वेंगुर्ला ब्रीज जवळचं नवबाग बीच आहे, जो खूप सुंदर, पांढऱ्या वाळूचे आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. 

काय खाल?

वेंगुर्ला परिसरात काही ठिकाणी घरगुती खानावळी आहेत. तेथेही तुम्ही जेवू शकता. सिवाय रेस्टॉरेंट, हॉटेल्स उपलब्ध आहेत. अस्सल कोकणी पद्धतीचे जेवणदेखील येथे मिळते. यामध्ये विविध प्रकारचे मच्छिकरी, मासे, बांगडा, पापलेट, रोहू, कटला, सुरमई, किंग कोळंबी, मच्छी, गोलमा, झिंगे, कडी भात, तांदळाची भाकरी,अंडाकरी, चिकन तर शाकाहारमध्ये चपाती, भाजी, भात, लोणचे, पापड, वरण, श्रीखंड, उकडी मोदक, नाश्ताला शहाळे, घावणे-चटणी, चहा, पोहे, भजी इ. काहींना ताडी-माडीदेखील पिणे आवडते.

मोचेमाड बीच - 

हे बीच मोचेमाड गावात लपलेले आहे. थोडेसे आडवळणी असल्यामुळे येथे वेळ काढून जावे. अथांग पसरलेला समुद्र तोही विशालकाय जागेमध्ये जो आधी आपण कधी पाहिला नसेल असा, पाढंरी वाळू, सभोवताली नारळाची झाडे, खारफुटीची जंगल आणि समुद्राच्या लाटा धडकून शिंपल्यांनी सजलेली अनेक मोठे खडक लक्ष वेधून घेतात. समुद्री शेवाळ, शिंपले आणि काळ्याकुट्ट पसरलेल्या दगडांमध्ये असंख्य खेकड्यांची घरे दिसतात. या खडकांमध्ये प्रचंड संख्येने असणारी विविध जातीची खेकडे आणि समुद्री जीव दिसतात. शांतता आणि निवांत ठिकाण असेल तर हे परफेक्ट ठिकाण आहे. इथे बालीचं फिल नक्कीच येईल!

कसे जाल मोचेमाडला ? 

वेंगुर्ला शहरापासून मोचेमाड बीच १० किलोमीटर अंतरावर आहे. वेंगुर्ला ते शिरोडा रोड दरम्यान एक फाटा (छोटा रस्ता) लागतो, जे मोचेमाड गाव म्हणून ओळखले जाते. मोचेमाड ग्रामपंचायतीचा फलक आणि बीचची माहिती देणारे फलक येथे दिसते. या फाट्यातून आत जाताना खूप छोटे छोटे रस्ते लागतात. मोचेमाडची खाडी देखील रस्त्यामध्ये नजरेस पडते. पुढे गेल्यानंतर स्थानिक रहिवाशांना मोचेमाड बीच कोणत्या दिशेला हे विचारून जावे. कारण खूप छोटे छोटे रस्ते आणि पायवाटा असल्यामुळे बीचला जाणारा रस्ता सहजासहजी सापडत नाही. पण, काही अंतरावर गेल्यावर गाडी पार्क करून ५ मिनिट चालत जावे लागते. त्यानंतर मोचेमाडचा विशालकाय समुद्र दृश्यास नक्की पडतो. 

वेतोबा मंदिर -

आरवली गावातील हे जागृत देवस्थान असून पुरातन दुमजली मंदिर पाहायला मिळते. प्रसिद्ध वेतोबा मंदिराची ख्याती निराळी आहे. येथे नवसाला केळीचा घड दिला जातो. तर अशी मान्यता आहे की, संरक्षण करण्यासाठी वेतोबा हा पूर्ण गावभर फिरत असतो. त्यामुळे त्याचे जोडे झिजतात. म्हणून त्याला नवीन जोडे दिले जातात. हे जोडे आकाराने खूप मोठे असून १०० ते १५० वर्षे जुने आहेत. ते एका काचेच्या कपाटात सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. ते तुम्ही मंदिरात गेल्यानंतर पाहू शकता. 

वेतोबा मंदिर कसे जाल?

वेंगुर्लेपासून १२ किमी अंतरावर आणि मोचेमाडपासून जवळ असणारे वेतोबा मंदिर आहे. वेंगुर्ला-शिरोडा रोडवर रस्त्याच्या बाजूलाच वेतोबाचे मोठे मंदिर आहे.

आरवली बीच -

आरवलीच्या समुद्रकिनारी चुलीवर भाजलेल्या काजूंचा आस्वाद घेता येतो. वेंगुर्ल्यातून जात असताना घरगुती फलक पाहायला मिळतात, जिथे चुवीवर भाजलेले काजू मिळतात. स्थानिक मच्छिमार ताडे मासे पकडण्यासाठी रापण लावताना दिसतात. स्थानिक बाजारात या माशांचा लिलिवदेखील होतो, तिथून तुम्ही ताजे मासे खरेदी करू शकता. बाजारात काजूपासून बनवलेल्या अनेक मिठाई, काजूगर, सॉल्ट काजू, काजू चॉकलेट्स आणि ड्रायफ्रूट्स खरेदी करू शकता.

आरवली परिसरात काय पाहाल?

प्रमुख आकर्षणांपाकी रेडी गणेश मंदिर, तेरेखोल समुद्र, तेरेखोल चर्च किल्ला. येथील शिरोडा मीठागरालादेखील भेट द्याला विसरू नका.

आरवली कसे जाल?

गोवा विमानतळ जवळ आहे. जवळचे रेल्वे स्टेशन सिंधुदुर्ग आणि झारप रेल्वे स्थानक आहे. शिवाय एमएसआरटीसीच्या एसटी देखील उपलब्ध आहेत.

ही सर्व ठिकाणे फिरताना वेंगुर्ल्यातच राहणे सोईस्कर ठरेल. याठिकाणी तुम्हाला राहणे, खाण्याच्या सर्व सुविधा उपलब्ध होतील.

आणखी काय पाहाल? 

वेंगुर्ला मासळी बाजार, केपा देवी मंदिर, डच फॅक्टरी, गर्द झाडीतील श्री नारायण मंदिर, श्री देव तांबळेश्वर मंदिर, सातेरी भद्रकाली मंदिर, सागरेश्वर मंदिर.

Tags - best places in Maharashtra, best places in malvan, best sea, best sea in maharashtra, best tourism places in konkan, best travel places, clean sea, clean sea maharashtra, konkan, Konkan Explore, konkan places, Konkan tourism, vengurla beach, navbag beach, sagareshwar beach , sagareshwar temple,  tourism travel in maharshtra, Travel Tour, Sateri Bhadrakali Mandir, Navabag Beach, vetoba mandir, vengurla trip, vengurla tourism, sindhudurg, vungurla best places, vengurla temples, famous places in vengurla, clean beaches in vengurla, hidden places in vengurla, konkan trip, konkan tour, konkan trip, vengurla food, sea food, vengurla light house, vengurla port, maharashtra tourism, best places in maharshtra 

Monday, November 27, 2023

Konkan Devbag Explore : 'देवबागच्या मिनी केरळ'ला गेलात का?




काही महिन्यांपूर्वी आम्ही कोकण सफरची मालिका आपल्यासाठी आणली होती. आंबोळगड, कशेळी, देवघळी, रत्नागिरी, गणेशगुळे, भोगवे, निवती अशा अऩेकविध पर्यटन ठिकाणांची इत्यंभूत माहिती आम्ही दिली होती. (Konkan Devbag Explore) आता आम्ही तुम्हाला देवबागची सफर दाखवणार आहोत. तुम्हाला माहितीये का, देवबागमध्ये मिनी केरळदेखील आहे. तसेच युरोपमधून हिवाळ्यात येणारे सीगल पक्षी देखील स्वच्छंदी फिरताना तुम्हाला दिसतात. बांगडे, सुरमई, कोळंबी, चिकन अशी मेजवानी तर उत्तमचं असते. याठिकाणी तुम्ही ग्रुप, फॅमिली आणि सोलो ट्रीप देखील करू शकता. स्कूबा डायव्हिंग, बनाना, वल्हे हाकायची नौका चालवण्याची मजा तर ट्रीपमध्ये आणखी रंगत वाढवणारी ठरेल. तर मग सुट्टीत देवबागचा प्लॅन करताय ना! (Konkan Devbag Explore)

देवबागला जाताना तुम्हाला वाटेत तारकर्ली लागते. विशेष म्हणजे तारकर्ली-देवबाग हे दोन्ही किनारे एकदम स्वच्छ आहेत. तारकर्ली आणि देवबाग दोन्ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागेल. याठिकाणी हिवाळ्यात फिरणे खूर सोईस्कर ठरते. कारण, यावेळी येथील तापमान फार जास्त नसते. शिवाय फिरतानाही उन्हाचा फार त्रास होणार नाही. जाणून घेऊया कोणकोणत्या ठिकाणी भेटी देता येतील?

तारकर्ली –

तारकर्ली बीच अनेक ॲक्टिव्हीटीसाठी प्रसिद्ध आहे. तारकर्लीच्या समुद्रकिनारी वारंवार खळखळत येणाऱ्या लाटा तुमच्या पायाला स्पर्श करून जातात. शंख-शिंपले आणि छोटे-छोटे खेकडे आपले लक्ष वेधून घेतात. कोल्हापूर शहरापासून हे अंतर जवळपास १६० किलोमीटर आहे. येथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सचीदेखील सुविधा आहे. पर्यटकांना येथे स्नोकर्लिंग, कयाकिंग, जेट स्की राईड, बम्पर राईड, पॅरासेलिंग, बनाना राईड, बनाना, स्कूबा डायव्हिंग यासारखे वॉटर ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो.

तारकर्लीला कसे जाल?


कोल्हापूरमधून जाणार असाल तर कोल्हापूर-राधानगरी-फेजिवडे-एजिवडे-देवगड निपाणी हायवे-फोंडा घाट-फोंडा-कणकवली-मुंबई-गोवा हायवे- कसाल मालवण रोड-कट्टा-चौके-तारकर्ली रोड-तारकर्ली बीच, ( (Konkan Devbag Explore))

देवबाग –  

सीगल बर्ड – 

युरोपमधून हिवाळ्यात हे पक्षी काटेरी मासे खाण्यासाठी समुद्रात येतात. पांढऱ्या रंगाचे असंख्य पक्षी पाण्यावर तरंगताना दिसतात.

देवबाग बीच

देवबाग बीचचा समुद्र किनारा लांब आणि चमकत्या पांढऱ्या वाळूने पसरलेला आहे. देवबागचा निळाशार समुद्र तुम्हाला आकर्षित करतो. येथूनच तुम्हाला बोटीतून खाडीमध्ये नेले जाते. तिथे बोटीतूनच तुम्हाला वेगवेगळे ठिकाणे दाखवली जातात. पण, समुद्र खाडीपासून थोड्या लांब अंतरावर आहे. शिवाय समुद्रतळ अगदी जवळ असल्याने बोट फसण्याची शक्यता असते. त्यामुळे बोट खाडीतूनच फिरवली जाते. पण, तुम्हाला बोटीतून डोळ्यांनी समुद्र पाहता येतो. पुढे खाडीतून त्सुनामी आयलँडवर नेलं जातं. 

होड्यांची सफर

देवबाग संगम पॉईंट / डेल्टा संगम पॉईंट –

नीरव शांततेतील देवबाग आणि कर्ली नदीच्या संगमाचे ठिकाण आहे. देवबाग संगम ज्याला डेल्टा पॉईंटदेखील म्हटले जाते. अरब समुद्रात जाऊन मिळणाऱ्या कर्ली नदीचा संगम इथे पाहायला मिळतो. हा संगम पाहायला तुम्हाला बोटीतून नेलं जातं.

सनसेट पॉईंट –

देवबागच्या बीचवरून बोटीतून कर्ली नदीच्या खाडीमध्ये गेल्यानंतर संध्याकाळचा सुंदर सनसेट पॉईंट पाहायला मिळतो. सभोवतालच्या निसर्गावर, तुमच्या होडीवर आणि पाण्यात पडणारी सुर्याची किरणे पाहून चांदण्या चमकत असल्याचा भास होतो. बोटीचा प्रवास हा १ तासाचा असतो.

खारफुटी, मँग्रुव्ह्ज झाडे –

बोटीतून थोडे जवळून तुम्हाला खारफुटी आणि मँग्रुव्ह्जची झाडे पाहायला मिळतात.

मिनी केरळ –

मोटरच्या बोटीतून फिरताना सभोवताली गर्द झाडीतील नारळ, सुपारीची झाडे निदर्शनास येतात. केरळप्रमाणे देवबागमधील ‍नारळांच्या गर्द झाडींचा लांब पल्ला डोळ्यांनी पाहून अनुभवता येतो. समुद्रकिनारी, मासेमारी आणि रापण करताना मच्छिमार कोळी बांधव दृष्टीस पडतात. या ठिकाणाला मिनी केरळ असे म्हटले गेले आहे.

भोगवे बीच –

त्या बोटीतूनच भोगवे समुद्र पाहता येतो. तुम्ही देवबाग झाल्यानंतर भोगवे बीचलादेखील भेट देऊ शकता. पण इथे राहणे थोडे खर्चिक असल्यामुळे काही जण फक्त समुद्रकिनारी भेट द्यायला जातात. त्याच्या तुलनेत तारकर्ली, देवबाग, मालवण येथे राहणे सोईस्कर ठरते.


कर्ली नदी खाडी –

देवबागच्या समुद्राचे वैशिष्ट्य म्हणजे कर्ली नदी जी अरबी समुद्राला येऊन मिळते. तो हा संगम पॉईंट होय.

त्सुनामी आयलँड – देवबाग संगम पॉईंट, सीगल पक्षी, मिनी केरळ, कर्लीची खाडी पाहिल्यानंतर त्सुनामी आयलँडवर नेलं जातं. अगदी सहजपणे बोटीतून तुम्ही या ठिकाणी उतरू शकता. या आयलँडला लागून असलेली खाडी ज्यामध्ये तुम्ही कंबर एवढ्या पाण्यात चालत जाऊ शकता. आयलँडवर छोट्या खेकड्यांची असंख्य घरे पाहायला मिळतील. इथे मॅगी, चीज मॅगी, उकडीचे मोदक, कोकम, सोलकढी, आमरसची चवदेखील चाखता येते. शिवाय अगदी माफक दरात छोट्या-छोट्या वल्ह्याच्या नौका पाहायला मिळतात, ज्या तुम्ही स्वतछ चालवू शकता. भिरभिरणारे समुद्री खारे वारे शरीराला स्पर्शून जातात.

देवबागला कसे जाल? 

तारकर्ली ते देवबाग केवळ ७ किमी अंतरावर आहे. फोर व्हिलर अशेल तर तारकर्लीतून २० मिनिटांमध्ये देवबगला पोहोचता येते.

कुठे राहाल?

येथे राहण्यासाठी अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे लक्झरी हॉटेल्सच्या सुविधादेखील आहेत. खास म्हणजे बीचसमोर अनेक कॉटेजेस किंवा हॉटेल्स आहेत, जिथून तुम्ही खळखळत्या समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकता.

काय खाल?

मच्छि आणि कोळंबीची मेजवानी कोकणातच भारी वाटते. तेथे गेल्यानंतर मांसाहार आणि शाकाहार दोन्ही जेवण उपलब्ध आहेत. मच्छिमध्ये सुरमई, पापलेट, बांगडा आणि अन्य प्रकारचे मासे, सुकी बोंबील, प्रॉन्झ, कोळ‍ंबी, सोलकढी, उकडी भात, मच्छीकरी, अंडाकरी, चिकनकरी, तांदळाची भाकरी, शाकाहारमध्ये उकडी मोदक, उकडी भात, वरण, पापड, लोणचे, आमटी, उसळ भाजी, बटाटे भाजी, चपाती, ताक.

आणखी काय पाहाल?

मगरीच्या आकाराचा डोंगर, देवबाग लाईट हाऊस, कर्ली नदी, गाडेधेव जेट्टी.

Tags - best places in Maharashtra, best places in malvan, best sea, best sea in maharashtra, best tourism places in konkan, best travel places, clean sea, clean sea maharashtra, Devbag Beach, Devbag Explore, devbag tourism, Devbag tourism places, devbag trip, konkan, Konkan Devbag Explore, konkan places, Konkan tourism, Malvan, tarkarli beach, tourism travel in maharshtr,aTravel Tour, आंबोळगड, कर्ली नदी, कशेळी, खारफुटी, गणेशगुळे, गाडेधेव, जेट्टी, तारकर्ली, देवघळी, देवबाग, देवबाग पर्यटन, देवबाग बीच, देवबाग लाईट हाऊस, निवती भोगवे, भोगवे बीच, मँग्रुव्ह्ज झाडे, मिनी केरळ, रत्नागिरी सीगल बर्ड, 


Thursday, September 7, 2023

वेरुळचे कैलास मंदिर


महाराष्ट्रातील एलोराच्या लेण्यांमध्ये असलेले हे मंदिर भगवान शिवला समर्पित आहे. कैलास मंदिर हे एक मोठे दगड कापून बांधलेले सर्वात मोठे मंदिर आहे. कैलास मंदिराची खास गोष्ट म्हणजे या मंदिराची रचना केवळ एका दगडावर कोरून बनवण्यात आली आहे आणि ती एकाच दगडावर बनवलेली जगातील सर्वात मोठी आकृती आहे. कैलास मंदिर महाराष्ट्रातील एलोरा येथे स्थित आहे. राष्ट्रकूट वंशाचे नरेश कृष्ण (प्रथम) याने ७५७-७८३इ. स. मध्ये या मंदिरांची निर्मिती केल्याचे म्हटले जाते. एलोरा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विस्तीर्ण मंदिरांची साखळी आहे. अखंड खडक किंवा शिला म्हणता येईल ते कट करून कैलास मंदिरात सुंदर स्तंभ बनवण्यात आले आहेत. अखंड खडक कोरून वरून खाली असे मंदिर कोरण्यात आल्याचे सांगितले जाते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या मंदिरांवरील नक्षीकाम, सुरेख आकृत्या, कोरीव खघडण कशी बनवली असेल, हे एक रहस्य आहे. कारण त्यावेळी त्यावेळी आजच्या तंत्रज्ञानाप्रणाणे मशीन्स नव्हते. बाहेरून मूर्तींचे समूह कोरून द्रविड शैलीमध्ये मंदिराचे रूप दिले आहे. भगवान शिवच्या या मंदिराचा अद्वितीय रचनेची दखल घेत युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील असंख्य सुंदर मंदिरे आणि लेण्यांमध्ये एलोराच्या कैलास मंदिराचा समावेश होतो. कैलास मंदिर अप्रतिम आहे. हे मंदिर एलोराच्या गुहा क्रमांक १६ मध्ये आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, हे मंदिर आठव्या शतकात बांधले गेले असेल आणि ते बांधण्यासाठी येथून २ हजार टन दगड काढण्यात आले असतील. या मंदिरांची सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मंदिर ज्या पद्धतीने बांधले गेले आहे, ते आजच्या काळात इतके तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकी असतानाही  अशक्य वाटते, त्यामुळे हजारो वर्षांपूर्वी हे मंदिर कसे बनवले असेल बरे? कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय आणि जास्त ज्ञानाशिवाय इतके सुंदर रेखीव मंदिर बांधले गेले आहे.  पुरातत्वशास्त्रज्ञ म्हणताता की, आजच्या तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर हे दगड काढण्यासाठी आणि मंदिर बांधण्यासाठी शंभर वर्षाहून अधिक काळ लागू शकते.
या मंदिराची लांबी २७६ फूट आणि १५४ फूट रुंदी आहे. असा अंदाज लावला जातो की, ४० हजार टन वजनाचे दगड काढले जाऊन त्यावर हे कोरवी काम करण्यात आले असावेत. आधी एक विभाग वेगळा करण्यात आला असावा आणि नंतर या खडकाच्या आत आणि बाहेरून ९० फूट उंच मंदिर कोरण्यात आले असावे.

मंदिराच्या  आत आणि बाहेर सर्व बाजूंनी शिल्पे आणि सजावटीने परिपूर्ण आहे. या मंदिराच्या प्रांगणाच्या तीन बाजूंना गाभाऱ्यांच्या रांगा आहेत. ज्या मंदिराच्या वरच्या भागाला एका पुलाने जोडलेल्या होत्या. आता हा पूल पडलेला दिसतो.  समोरील मोकळ्या मंडपात नंदीची मूर्ती विराजमान आहे. त्याच्या दोन्ही बाजूला मोठे हत्ती व खांब उभे असलेले दिसतात. हे काम भारतीय वास्तुविशारदांच्या कौशल्याचे अप्रतिम उदाहरण म्हणता येईल.

एलोरामध्ये तीन प्रकारच्या गुहा आहेत. महायानी बौद्ध लेणी, पौराणिक हिंदू लेणी आणि दिगंबर जैन लेणी. या गुंफांपैकी फक्त एक गुहा १२ मजली आहे, ज्याला 'कैलास मंदिर' म्हणतात. ही गुहा म्हणजे कारागिरीचा अप्रतिम नमुना आहे. एकाच खडकात कोरलेले विशाल मंदिराचे प्रत्येक शिल्प उच्च प्रतीचे आणि उच्च दर्जाचे आहे. या लेण्यांपासून एलोरा गाव एक किलोमीटर अंतरावर आहे. या गावाच्या नावावरून त्यांना 'एलोरा लेणी' पडल्याचे म्हटले जाते.

कैलास मंदिर वगळता उर्वरित मंदिरे इ. स ६००-७५० च्या आसपास बांधली गेली असल्याचा अंदाज आहे. एलोराचे शिल्प वैशिष्ट्यपूर्ण असून गुप्त कालखंडानंतर एवढे भव्य बांधकाम इतर कोणत्याही कालखंडात झाली नाही. वर्षभर येथे देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी असते. या लेण्यांमध्ये इतके आकर्षण आणि कौशल्य आहे की, पाहणारे थक्क होऊन जातात. संपूर्ण मंदिर परिसरशांत आहे. एलोराजवळ घृष्णेश्वर महादेवाचे मंदिरदेखील आहे. लेण्यांमध्ये भव्य कोरीव काम करण्यात आले आहे. एलोराची गुहा क्रमांक १६ ही सर्वात मोठी गुफा आहे. यामध्ये जास्तीत जास्त कोरीव काम करण्यात आले आहे. येथील कैलास मंदिरात प्रचंड आणि भव्य नक्षीकाम आहे.

मंदिराचे वैशिष्ट्यपूर्ण रहस्य मनाला भिडणारे आहे. आज असे मंदिर बांधण्यासाठी शेकडो रेखाचित्रे, थ्रीडी डिझाईन सॉफ्टवेअर, सीएडी सॉफ्टवेअर, शेकडो अभियंते, अनेक उच्च शक्तीचे संगणक, लहान मॉडेल्स आणि त्याचे संशोधन इत्यादींची आवश्यकता असेल. त्या काळात ही सर्व यंत्र आणि साधनसामुग्री उपलब्ध असेल का, असा प्रश्न प्रत्येकाला पडणारा आहे.

येथे फिरण्यासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारीपर्यंत सर्वात चांगला काळ आहे. पण उन्हाळ्यात येथे खूप तापमान असल्यामुळे थंडीच्या दिवसात पर्यटनासाठी चांगला काळ मानला जातो.

Tuesday, September 5, 2023

Karneshwar Temple :संभाजी महाराजांचे वास्तव्य असलेले 'संगमेश्वर-कर्णेश्वर'

https://pudhari.news/maharashtra/622526/shravan-2023-maharashtra-sangmeshwar-karneshwar-temple/ar



रत्‍नागिरी जिल्ह्यातील ‘अलकनंदा’ आणि ‘वरुणा’ या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले ‘संगमेश्वर’ हे ‘कसबा संगमेश्वर’ म्हणून ओळखले जाते. Karneshwar Temple) त्या गावात दोन गोष्टी प्रमुख आहेत, त्या म्हणजे चालुक्यकालीन श्रीकर्णेश्वर मंदिर आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे तेथील वास्तव्य. संगमेश्वर हे देवळांचे गाव आहे. या परिसरात सुमारे ७० पांडव कालीन देवालये आहेत. त्यातील कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ विशेष प्रसिद्ध आहे. (Karneshwar Temple)

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर हे तसे प्रसिद्ध ठिकाण. ऐतिहासिक गाव म्हणून या गावाची ओळख आहे. या तालुक्याचे मुख्यालय संगमेश्वर गावापासून १७ किलोमीटरवर असलेल्या देवरुख येथे आहे. सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असल्याने याला संगमेश्वर असे नाव मिळाले आहे. ते परिसरातील एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापर्यंत येथून रत्‍नागिरीपर्यंत बोटीने जाता येत असे. संगमेश्वर हे मुंबई - गोवा महामार्गावर वसलेले आहे. तसेच कोकण रेल्वेने देखील संगमेश्वरला जाता येते. छत्रपती संभाजीराजांचे मुख्य ठाणे शृगारपूर हे संगमेश्वरच्या जवळच आहे. अशा ठिकाणी कर्णेश्वराचे प्राचीन मंदिर पाहायला मिळते. हे महामार्गापासून थोडे आत असल्यामुळे सहजासहजी नजरेस पडत नाही.

संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरपेक्षाही संगमेश्वर खूप जुनं मंदिर असल्याचे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास ‘रामक्षेत्र’ असेही म्हटले जाते. संगमेश्वरला जाण्यासाठी राजापूरची गंगा ठिकाणापासून अडीच तासांचा रस्ता आहे. सुरुवातीलाच संगमेश्वर हे छोटेखानी महादेवाचं मंदिर दिसतं. नदीच्या किनारी वसलेलं खूप सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे. पण, ५ मिनिटाच्या अंतरावर कर्णेश्वराचं मंदिर आहे. पण, ते सहजासहजी दृश्यास पडत नाही. एका लोखंडी पुलावरून पुढे गेल्यानंतर एखाद्या घराच्या पायऱ्या असल्याप्रमाणे जांभा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक विस्तीर्ण मैदान लागते. या मैदानावर कर्णेश्वराचे प्रसिध्द महादेव मंदिर आहे.

कर्णेश्वर मंदिर –

हे महादेवाचे प्रसिध्द मंदिर आहे. हे भूमीज नागर शैलीतील मंदिर आहे. कर्णेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील संगमेश्वर तालुक्यातील संगमेश्वर गावात आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरून संगमेश्वरच्या कसबा पेठेपासून थोडे पुढे गेल्यावर हे आहे. इसवी सन २०१२ मध्ये या मंदिराला पुरातत्त्व विभागाने राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

कोल्हापुरातील खिद्रापूरच्या मंदिराच्या स्थापत्यशैलीशी मिळते-जुळते असलेले कर्णेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर खिद्रापूरपेक्षाही जुने असल्याचे येथील मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून ओळखते. काही जण हे मंदिर कर्ण राजा (कोल्हापूर) ने बांधले असावे असे म्हणतात. तर काही जण इ.स. १०७५ ते १०९५ या काळात गुजरातच्या चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे.

कर्णेश्वर या महादेवाच्या देवालयात ५ पालथी ताटे कोरलेली आहेत. आख्यायिकेनुसार पांडव वनवासात असताना त्यांनी कर्ण नामक राजाच्या पणानुसार एका रात्रीत एका दगडातून हे देवालय कोरले. देवालयात पांडवकालीन लिपीत कोरलेले लेख आहेत. कर्णेश्वराच्या देवालयाजवळ एक सूर्य मंदिर आहे.

या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर गणपती, लक्ष्मी, महिषासूरमर्दिणी, विष्णू अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. अतिशय आखीव रेखीव कोरीव काम असलेल्या या मूर्ती भक्तांच्या चटकन लक्ष वेधून घेतात. त्याकाळात इतकी सुंदर शिल्पे कशी काय घडवली असावीत, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. मंदिरात गेल्यानंतर भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आढळते. बाहेर कितीही ऊन पडलेलं असो वा गर्मी असो, मंदिरात पाऊल ठेवताच मनाला आणि शरीराला शितलता वाटते. गर्भगृहात कर्णेश्वराची पिंड आहे. सोबत पार्वतीची मूर्तीही आहे. येथे सुंदर प्रभावळदेखील दिसते.

कसे जाल?

संगमेश्वर बस स्थानकापासून संगमेश्वर रेल्वेस्टेशन ४ कि. मी. अंतरावर आहे. संगमेश्वर बस स्थानकापासून देवरुख १७ कि. मी. अंतरावर आहे. साखरपाला जाण्यासाठी दर ३० मिनिटांनी देवरुख येथून बस आहेत. 'कोल्हापूर'ला जाण्यासाठी या मार्गाचा वापर होऊ शकतो तसेच संगमेश्वराहून रत्‍नागिरी, लांजा आणि राजापूरकडे जाणाऱ्या बसेस आहेत.


आजपर्यंत कुणीही उलगडू शकले नाही 'या' ५ मंदिरांचे रहस्य, असे या मंदिरांमध्ये आहे तरी काय?

https://pudhari.news/blog/630627/these-five-famous-mysterious-shiva-temples/ar


भारताची समृद्ध संस्कृती, संपत्ती, इतिहास आणि अनेक रहस्यमय गोष्टींनी वेढलेला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हा एक असा देश आहे, जिथे मंदिरांच्या मागील कहाणी अनेक आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेले आहे. महाराष्ट्रातील कैलास मंदिर असो वा तामिळनाडूतील ऐरातेश्वर किंवा ओडिशातील लिंगराज आजपर्यंत 'या' खास मंदिरांचे कोडे सुटलेले नाही. वर्षानुवर्षे या मंदिरांचे संशोधन सुरू आहे. पण अशा काही गोष्टी आहेत, ज्या संशोधकांना अभ्यास करूनही हाती लागलेल्या नाहीत.   

कैलास मंदिर

कैलास मंदिर हे भगवान शिवला समर्पित आहे. कैलास मंदिर सर्वात मोठे रॉक-कट मंदिर आहे. १६ व्या शतकात छत्रपती संभाजीनगरच्या एलोरा गुंफामध्ये बनवण्यात आलं आहे. कैलास गुंफा मंदिराची रचना अशी एक अद्भूत बाब आहे, जी कुणालाही न पटणारी आहे. एका मोठ्या खडकातून हे मंदिर बनवण्यात आले आहे. पुरातत्ववाद्यांच्या माहितीनुसार, अर्थ जाणून घेण्यासाठी ३० मिलियन संस्कृत नक्षी आतापर्यंत डिकोड करण्यात आलेले नाही. 

लिंगराज मंदिर 

ओडिशातील भुवनेश्वर हे सर्वात मोठे मंदिर आहे. यामध्ये भगवान शिवला समर्पित ५४ मीटरचे हे मंदिर आहे. हे मंदिर १०९० ते ११०४ ई. दरम्यान निर्माण करण्यात आलं होतं. असे म्हटले जाते की, गर्भ गृहाच्या आत, लिंगम स्वत: उत्पन्न झाले आहे, म्हणून त्यास स्वयंभू म्हटले जाते. 

ऐरावतेश्‍वर मंदिर 

तामिळनाडूमध्ये १२ व्या शतकात चोल राजांनी ऐरावतेश्‍वर मंदिराची निर्मिती केली होती. येथील मंदिराच्या पायऱ्या खूप गुढ आहेत. या पायऱ्यांमधून संगीत ऐकू येते. आश्चर्य वाटले ना? पण हे मंदिर इतक्या खास रितीने बनवण्यात आले की, या मंदिराच्या पायऱ्यांवर चढताना ध्वनी निर्माण होतात. संगीताच्या विविध ध्वनी इथे एकायला मिलतात.पण, या संगीताच्या मागे काय रहस्य आहे, हे आतापर्यंत कुणीही जाणू शकले नाही.

टिटलागढचे शिव मंदिर  

असे म्हटले जाते की, ओडिसातील टिटलागढ येथे खूप उष्णता असते. याठिकाणी एक डोंगर आहे. ज्यावर शिव मंदिर स्थापित आहे. येथील खडकांमध्ये इतकी गर्मी असते की, लोकांना घामाच्या धारा लागतात. पण  मंदिरावर उष्णतेचा कोणताही परिणाम होत नाही. मंदिरात इतकी थंडी आहे की, अनुभवणाऱ्यास आश्चर्य वाटेल. इतक्या गरमीमध्ये हे मंदिर इतके थंड कसे असू शकते? मंदिराच्या बाहेर येताच पुन्हा गरमीने बेहाल होतं.

 

निष्कलंक महादेव मंदिर 

अरब समुद्राच्या किनारी निष्कलंक महादेव मंदिर एक प्रसिद्ध रहस्यमयी मंदिर आहे. हे मंदिर गुजरातच्या भावनगरमध्ये कोलियाक समुद्रकिनारी असून या पवित्र मंदिरात ५ शिवलिंग आहेत. हे स्वयंभू मंदिर असल्याचे म्हटले जाते. अरब सागराजवळ हे मंदिर असल्याने समुद्रात भरती आल्यावर शिवलिंग पाण्याने झाकून जाते. या मंदिराचा इतिहास महाभारत काळापासून जोडले गेले आहे. असे म्हटले जाते की, या ठिकाणी पांडवांनी अनेक वर्ष तप केलं होतं, असेही म्हटले जाते. 


मातीचे आरोग्य: अन्नसुरक्षा, पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा पाया

माती ही केवळ शेतीची जमीन नसून ती संपूर्ण सजीवसृष्टीचा आधार आहे. मानवाचे अस्तित्व, अन्नाची निर्मिती, जलसाठ्यांचे संवर्धन, हवामान संतुलन आणि ज...