Friday, January 27, 2023

शिरोड्याला जाताय? मग, तुम्ही न पाहिलेल्या 'या' ठिकाणांना भेट नक्की द्या


  गोवा पाहून कंटाळा आलाय? तर मग शिरोड्याला जा!. तुम्ही म्हणाल, आम्ही शिरोड्यालादेखील जाऊन आलोय. पण, शिरोड्याला पुन्हा एकदा जा, असं आम्ही आपल्याला सूचवू. कारण, शिरोडा बीचशिवाय, या परिसरातील काही अन्य स्थळे पाहण्यासारखी आहेत. कदाचित ही स्थळे तुम्ही कदाचित पाहिली नसतील. ती कोणकोणती स्थळे आहेत आणि तेथे कसे जाता येते, याविषयीची माहिती आम्ही येथे देत आहोत. 

शिरोडा हे महाराष्ट्रातील दक्षिण कोकणातील एक ठिकाण आहे. हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील एक गाव असून सुंदर समुद्रकिनारा लाभलेले प्रेक्षणीय स्थळ आहे. बीचवर किंवा समुद्री किनारी जायचं म्हटलं की, किती उत्साह असतो आपला! मासे, वडा कोंबडा, सी-फूड, घावण, सोलकडी विथ चिकण....मस्तचं...खायला मिळणार. मग, बोटींग, पॅराग्लायडींग करत समुद्राची सफारी त्याशिवाय खळखळत्या समुद्राच्या लाटांवर पोहायचं!...किती किती त्या इच्छा. समुद्राबरोबरचं जर तुम्हाला आणखी काही प्रेक्षणीय ठिकाणं पाहायला मिळाली तर? मग चला तर जेव्हा तुम्ही शिरोडा बीचवर जा, तेथून अगदी जवळ काही अंतरावर अनेक सुंदर ठिकाणं आहत, जे तुम्हाला पाहता येतील. फार वेळ आणि पैसाही खर्चिक होणार नाही. पण, विलोभनीय आणि आकर्षक अशी ही स्थळ तुम्हाला शिरोड्यात गेल्यानंतर पाहता येतील आणि त्याचा मनमुराद आनंद लुटता येईल.   


शिरोडा बीच : 

येथे समुद्रकिनारी राहायला तुम्हाला नक्कीच आवडेल. छोट्या - छोट्या खोल्या किंवा लाकडाची घरं तेही समुद्रासमोर तसेच आजूबाजूच्या परिसरात राहायला हॉटेल्स, रेस्टाॅरंटचीही व्यवस्था आहे. त्यामुळे राहण्याचा, जेवण खाण्याचाही प्रश्न मिटतो. सायंकाळी सूर्यास्त होताना आकाशी पसरलेली सूर्यकिरणे, लाल-केशरी-पिवळ्या रंगछटा आणि मंद वारं ही निसर्गाची उधळण तुम्ही अनुभवायला हवी. त्याचबरोबर येथे समुद्र सफारीही करता येते. बोटीतून समुद्रात जाणे आणि पॅराग्लायडिंगचा येथे अनुभवही येथे घेता येतो. हे फार खर्चिक नसून आपल्याला परवडण्यासारखे आहे.


रेडीचा गणपती :

रेडी गणेश मंदिर हे रेडी बंदराजवळच आहे. रेडी गावातील लोह खनिजाच्या खाणीत १८ एप्रिल, १९७६ रोजी स्वयंभू श्री गणेशाची द्विभुजा मूर्ती सापडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी हे प्रसिध्द ठिकाण. उंच उंच माडाची झाडे, निसर्ग आणि समुद्रकिनाऱ्यालगत असलेलं हे रेडीचा गणेश मंदिर. जागृत देवस्थान अशी ख्याती असल्याने भाविकांचा मोठा ओघ येथे येत असतो. या मंदिरात गणेशाची सुंदर, मनमोहक मूर्ती पाहायला मिळते. शिवाय रेडीचा समुद्रकिनारा स्वच्छ आणि सुंदर आहे. 

येथे मॅगनीजच्या खाणीही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे लाल मातीचे डोंगर, लाल मातीचे कच्चे रस्ते, नारळ आणि पोफळीच्या बागा आणि यातून वाट काढत गेल्यानंतर रेडी गावात सागरकिनार्‍यालगत यशवंतगड किल्ला मोठ्या डौलाने उभा आहे. अनेक पर्यटकांना माहिती नसतं की, रेडीच्या गणपतीचे दर्शन घेऊन तुम्ही थेट यशवंतगड किल्ल्याला जाऊ शकता. त्याचबरोबर पणजी येथून जवळ आहे. त्यामुळे तुम्हाला आणखी थोडं फिरायचे असल्यास शिरोड्यातून तुम्ही गोव्यात कमी वेळेत पोहोचू शकता.    

यशवंतगड किल्ला : 

मंदिरात दर्शन घेऊन बाहेर पडल्यानंतर जवळपास २ -३ कि.मी अंतरावर यशवंतगड हा किल्ला समोर दिसतो. अगदी छोट्या छोट्या वाटेतून समुद्रालगत असणाऱ्या गिरिदुर्ग प्रकारातील या किल्ल्याच्या पायथ्याशी जाता येते. तसेच चारचाकीदेखील किल्ल्यापर्यंत जाते. येथे पार्किंगसाठी थोडी जागा देखील आहे. महत्त्वाचं म्हणजे हा किल्ला वर चढावा लागत नाही किंवा दमछाक होत नाही. त्यामुळे अगदी लहानांपासून वृध्दापर्यंत हा किल्ला तुम्हाला पाहता येतो. सुरुवातीला एन्ट्री केल्यानंतर टेहळणी बुरूज आणि काही पायऱ्यांशिवाय येथे काहीचं नाही, असं वाटतं. पण, थोडं लांब पाहिलं की, एक मोठं मैदान दिसतं. या मैदानावर मोठ्या प्रमाणात झाडंझुडपं असल्याने पलिकडचा महत्त्वाचा किल्ला दिसत नाही. झाडंझुडपं असले तरी किल्ल्यावर जायला मुख्य रस्ता आहे.  

हा किल्ला लवकर निदर्शनास पडत नाही. कारण आतील परिसर झाडाझुडपांनी वेढलेला आहे. किल्ल्याच्या बाजूंनी खंदक खोदलेले आहे. पण, तटदरवाज्यातून आत गेल्यानंतर बालेकिल्ला लागतो. सुरूवातीला केवळ किल्ल्याचे अवशेष दिसणारे आत गेल्यानंतर लाल रंगाचा किल्ला लक्ष वेधून घेतो. येथे वाड्याचे अवशेषही आहेत. परंतु, पाण्याचा साठा कुठे दिसत नाही.. शिवाय एक छोटे मंदिरदेखील आहे. हा किल्ला रेडीचा यशवंतगड म्हणून ओळखला जातो. हा किल्ला पाहण्यासारखा आहे. आतून किल्ल्याचा परिसर खूप मोठा आहे. आपण, याआधी एखाद्या किल्ल्यावर इतकी मोठी जागा कधीही पाहिली नसेल, अशी रचना येथील आहे. येथे  इ. स. १६३२ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला ताब्यात घेऊन त्याला ‘यशवंतगड’ असे नाव दिल्याची इतिहासात नोंद सापडते. 


तेरेखोल किल्ला - 

तेरेखोल किल्ला हा गोवा राज्यातील एक किल्ला आहे. पण, तो शिरोड्यापासून अगदी जवळ आहे. त्यामुळे महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेवरील या किल्ल्याचे रुपांतर हेरिटेज रिसॉर्टमध्ये केले गेले आहे. त्यामुळे किल्ल्याचे संवर्धन झाले आहे. किल्ल्यावर हॉटेल जरी झाले असले तरी पर्यटकांना किल्ला पाहण्यासाठी हॉटेलमध्ये जाता येते. तटबंदी दुरुस्त करून येथे रंगरंगोटी करण्यात आली आहे. किल्ल्यामध्ये सेंट अँथोनी चर्च सुस्थितीत आहे. तेरेखोलच्या खाडीच्या तीरावर सावंतवाडीच्या राजाने या किल्ल्याचे बांधकाम केले. त्यानंतर १७४६ मध्ये पोर्तुगीजांनी डॉम पेड्रो डी अलमेडाच्या नेतृत्वाखाली हा किल्ला जिंकून घेतला आणि त्यात काही बदल केले. त्यानंतर मराठे आणि नंतर पुन्हा पोर्तुगीजांनी या किल्ल्याचा ताबा घेतला. किल्ल्याच्या तटबंदीवरुन तेरेखोलच्या खाडीचे आणि पलीकडे असणाऱ्या गोव्याच्या माडबनांचे विहंगम दृश्य दिसते. 

याशिवाय सिध्देश्वर मंदिर, सोनुर्ली मंदिर, तसेच सागरतीर्थ बीच, आरवली बीच ही ठिकाणेदेखील पाहता येतील. 

कसे जाल : 

शिरोडा : सावंतवाडीतून शिरोडा गावात जाता येते.

रेडीचा गणपती : रेडीला येण्यासाठी वेंगुर्ल्याहून बसची सोय आहे. तसेच मालवणमधून रेडीपर्यंतही जाता येते. 

यशवंतगड : रेडी गावातून तीन-चार किलोमीटर अंतरावर यशवंतगड आहे. रेडी गावातून १५ मिनिटे पायी चालत किंवा थेट गाडीदेखील गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत जाते. 

तेरेखोल किल्ला : तेरेखोलला जाण्यासाठी महाराष्ट्र आणि गोव्यातून दोन मार्ग आहेत. महाराष्ट्रातून जाताना वेंगुर्ले, रेडी मार्गे तेरेखोलला पोहोचता येते. गोव्यातून येताना पणजी, हरमल, केरी मार्गे यावे लागते. 


             न्याहरी निवास योजना - 

न्याहरी निवास योजना ही एमटीडीसीअंतर्गत येते. स्वस्तात मस्त असणाऱ्या या योजनेंतर्गत पर्यटकांसाठी अत्यंत माफक दरात राहण्याची व्यवस्था केली जाते. स्थानिक घरांमधील कुटुंबे पर्यटकांसाठी राहण्याची, जेवणाची सोय करते. यासाठी येथील घरांना परवाना दिला जातो. एमटीडीसी त्याचं मार्केटिंग करतं. लॉज, हॉटेल्सपेश्रा कमी दरात घरगुती पध्दतीचा उत्तम नाष्ता, जेवणाची सोय केली जाते. येथे सुरक्षितता आहे. त्यामुळे पर्यटकांना घरातच झोपण्यासाठी सोय केली जाते. विशेष म्हणजे येथे स्वच्छता असते. त्यामुळे शिरोड्यात गेल्यानंतर हॉटेल शोधण्यासाठी फार धावपळ होत नाही. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात २५० न्याहरी निवास योजनेची व्यवस्था उपलब्ध आहे.


               

Travel Destination : कपलसाठी फिरायला बेस्ट आहेत 'ही' ५ ठिकाणे


 दिवाळी आली की सुट्ट्यांचा हंगाम सुरू होतो. दसरा दिवाळी संपली की, लोक ट्रीपचे प्लॅनिंग करतात. (Travel Destination) यामध्ये कपल्सदेखील मागे नाहीत. कपल्सना वेध लागतात ते टूरचे. फार गोंधळ, गोंगाट नसलेली जागा कपल शोधतात, असे मिश्किलपणे म्हणायला हरकत नाही. त्यांना एकांत हवा असतो. आपण महाराष्ट्रातील काही ठिकाणे पाहिल्यास जिथे पर्यटक अगदी तुरळक असतात. तर काही ठिकाणे गर्दीची असतात. पण, कपल्ससाठी काही बेस्ट ठिकाणे आपल्याकडे आहेत. ही ठिकाणे तुम्ही एकदा फिरून याच! (Travel Destination)

महाराष्ट्रातील एकांत असणारी बेस्ट ठिकाणे -

आंबोळगड -

तुम्हाला निवांतपणा, शांतता हवी असेल तर आंबोळगडच्या बीचवर जा. येथे तुम्हाला फारशी वर्दळ दिसणार नाही. पण, समुद्रालगत बरीच वस्ती आहे. काही हॉटेल्स आणि रूम्सदेखील उपलब्ध आहेत. येथे राहण्याची आणि खाण्याची सोयदेखील उत्तम आहे. मासे, सोलकडी, अंडाकरी, चिकनकरी असे घरगुती पध्दतीच्या जेवणाची चवदेखील येथे चाखता येते.

दोन दिवसांत तुम्हाला आंबोळगडाचा प्रवास करून परत येता येते. आंबोळगड - कोल्हापूर-शाहूवाडी मार्गे रत्नागिरी- आडीवरे-नाटे-आंबोळगड तसेच कोल्हापूर -राजापूर-नाटे-शेडभू-आंबोळगड असे जाता येईल. आंबोळगडचा समुद्रकिनारा, यशवंतगड, गगनगिरी महाराजांचे आश्रम, आंबोळगडचा किल्ला, मुसाकाजी बंदर अशी विविध ठिकाणे तुम्हाला पाहता येईल, येथील शिमगोत्सव ही पारंपरिक आणि मोठ्या उत्साहात असतो. विविध समुद्रकिनारी तुम्ही अनुभवलेल्या नेहमीच्या ट्रीपपेक्षा आंबोळगडचा अनुभव तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.

वेंगुर्ला-चिवला -

तुम्ही रत्नागिरी, साखरपा, गणपतीपुळे, आरेवारे, दापोलीला पर्यटनाला गेला असाल. तसेच तारकर्ली, सिंधुदुर्ग, देवबाग वगैरे ट्रीप देखील केली असेल. पण, वेंगुर्ला-चिवला बीचवर गेलाय का? इतर समुद्र किनाऱ्यांप्रमाणे हे बीच तसे फारसे वर्दळीचे नाही. नीरव शांतता येथे अनुभवायला मिळेल. तसेच अनेक रेस्टॉरंट, हॉटेल्स आणि कॉटेजेस राहण्यासाठी उत्तम आहेत.

येथे ताजे सुरमई, बोंबील, कोळींबीदेखील ताव मारता येतो. मच्छीमार्केटमध्ये नानाविध प्रकारचे माशांचा होणार लिलाव डोळ्यांनी पाहता येतो. स्वच्छ समुद्र किनारे आणि रम्य संध्याकाळी सोनेरी वाळूत बसून तुम्हाला चहा पिण्याचा आनंद घेता येतो. जवळचं वेंगुर्ला बंदर, लाईट हाऊस, मानसीश्वर मंदिर, पाहण्यासारखी ठिकाणे आहेत. येथून जवळच शिरोड्याला जाण्यासाठी मार्ग आहे. येतून मोचेबीड आणि सागरेश्वर बीचलादेखील जाता येते.

लोणार -

लोणार हे नाव औरंगाबाद जिल्ह्यातील एका तलावावरून पडले आहे. पृथ्वीवर उल्का पडल्यावर हा तलाव तयार झाला. हा तलाव पर्यटकांना खूप आवडतो. जाताना औरंगाबादचं पर्यटनदेखील तुम्हाला करता येईल. त्याशिवाय दैत्यसुदन मंदिर, कमलजा देवी मंदिर , गोमुख मंदिर येथेही जाता येतं.

इगतपुरी –

हे ठिकाण समुद्रसपाटीपासून उंच आहे. त्यामुळे येथे वर्षभर चांगले वातावरण असून आल्हाददायक हवामान असते. पावसाळ्यात जाणे म्हणजे स्वर्गाहून सुख. इगतपुरीत हिरवळ, जंगल आणि जलसंपदा आहे. निसर्गाची देणगी म्हणजे काय असते, हे याठिकाणी पाहायला मिळते. भातसा नदीचे पात्र डोळ्यांना सुखावणारं आहे. आर्थर तलावदेखील तुम्हाला पाहता येईल. अमृतेश्वर मंदिर, धम्मगिरी विपश्यना केंद्र, कळसुबाई शिखर, गिरीसागर फॉल्स, कॅमल व्हॅली, त्रिनगलवाडी फोर्ट, भावली धरण, थाल घाट, म्यानमार गेट, भावली डॅम, अशोका फॉल्स, घाटनदेवी माता मंदिर ही ठिकाणे इगतपुरीचे आकर्षण आहे.

पाचगणी –

महाराष्ट्राचे हिल स्टेशन म्हणून पाचगणीला म्हटले जाते. थंड ठिकाण आणि प्रमुख पर्यटन स्थळांच्या यादीत पाचगणीचा समावेश होतो. सह्याद्रीच्या रांगांमधील पाच टेकड्यांमुळे या स्थळाला पाचगणी असे नाव दिले जाते. येथे कमलगडचा किल्ला आणि धाम धरण तलाव पाहण खूप मनमोहक आहे. नयनरम्य दृश्य पाहून तुम्हीही सुखावून जाल.

Travel Tour : कोकण फिरताय? 'या' सुंदर बीचवर कधी गेलाय का?


 कोकण म्हणजे माडाची झाडं, पोफळीच्या बागा, सुपारी बागा आणि सुंदरबन त्याचबरोबर अथांग समुद्र आणि झुळझुळ वाहणारं समुद्री वारं, त्यात माशाचं कालवण म्हणजे क्या बात है! काय, आला ना डोळ्यांसमोर समुद्र. कोकणात तुम्ही अनेकदा गेला असाल किंवा एखादा बीच कदाचित बघायचा राहूनही गेला असेल. तारकर्ली, सिंधुदुर्ग, कुणकेश्वर, देवबाग, निवती, भोगवे (Travel Tour) याचबरोबर, गणपतीपुळे, आरेवारे यासारख्या ठिकाणी तुम्ही गेला असाल. ही ठिकाणे तशी वर्दळीची आहेत. पण, तुम्हाला माहितीये का? महाराष्ट्रात एक सुंदर बीच आहे... ज्याला 'महाराष्ट्राचं बटरफ्लाय बीच' म्हटलं जातं. तो समुद्र आहे तरी कुठे, तेथे कसं जाता येईल, यासाठी ही खास माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. ही माहिती शेवटपर्यंत वाचा. (Travel Tour)

सुट्टीच्या दिवशी एखाद्या ट्रीपचा प्लॅन करायचा म्हटलं तर १० ठिकाणांची नावे डोळ‍्यासमोर येतात. मग घरातील मंडळींचं प्रत्येकाचं मत वेगळं. कुणाला कोकणात जायचं असत, तर कुणाला थंड हवेच्या ठिकाणी. मग सर्वांना एकत्र घेऊन जाण्यासाठी एक स्वच्छ आणि सुंदर, नितळ पाणी असलेल्या बीचवर तुम्हाला नक्कीच जायला आवडेल. रागवू नका हं...पण, कपलसाठी तर एकदम परफेक्ट असणारं हे बीच आहे.

या बीचचे नाव 'कशेळी बीच' किंवा 'देवघळी बीच' (ता. राजापूर, जि. रत्नागिरी) असं आहे. कशे‍ळी हे रत्नागिरीच्या पश्चिमेकडे असणारे शेवटचं गाव आहे. या गावातूनच देवघळीचा रस्ता जातो.

काय काय पहाल? 

तीन दिवसाच्या ट्रीपमध्ये तुम्ही देवघळी-जाकादेवी मंदिर-पूर्णगड-कनकादित्य मंदिर-धुतपापेश्वर-पावस अशा ठिकाणांना भेट देता येईल.

देवघळी बीच-

कशेळी गावातून तुम्ही पोहोचल्यानंतर देवघळी बीचपर्यंत जाण्यासाठी रस्ता आहे. टू-व्हिलर, फोर व्हिलर गाड्यादेखील बीचपर्यंत जाऊ शकतात. खरंतरं बीचच्या वरच्या बाजूस विस्तीर्ण पठार आहे. येथे तुम्ही गाड्या पार्किंग करू शकता. येथे भूरळ पाडणारा नीरव शांतता असणारा समुद्र किनारा आहे. येथे पोहोचल्यानंतर येथील अथांग समुद्र डोळ्य़ांचे पारणे फेडणारा आहे. समुद्राच्या वरच्या बाजूस टेबल पॉईंट आहे. टेबल पॉईंटवरूनदेखील निळ्याशार समुद्राचे विहंगम दृश्य बघता येते. या टेबल पॉईंटवरून खाली उतरून गेल्यानंतर छोटेखानी बीचवर जाता येते. पांढऱ्या रंगाच्या वाळूत जांभा खडकाने बनलेले अनेक दगड वाळूत रुतलेले दिसतात.

त्याचबरोबर या दगडांवर लाटा येऊन धडकताना काही शिंपले चिकटलेले दिसतात. याची सुंदर नक्षी बीचच्या सौंदर्यात भर टाकते. येथे एक घळी आहे. याच घळीतून कनकादित्य मंदिरातील देवाची मूर्ती सापडल्याचे स्थानिक सांगतात.

कनकादित्य मंदिर -

देवघळी बीचपासून काही अंतरावर कनकादित्य मंदिर आहे.  गावात दोन मंदिरे आहेत. एक कनकादित्य मंदिर आणि दुसरे जाकादेवी मंदिर. कानकादित्य मंदिरातील मूर्ती ही देवघळीच्या गुहेत सापडली होती, असे सांगण्यात येते. ज्या घळीत कनकादित्याची मूर्ती आढळली, ती घळ देवघळी नावाने ओळखली जाते. कनकादित्याचे मंदिर खूप सुंदर अशून ते पाहण्यासारखे आहे.

मंदिराच्या बांधकाम कोकणी शैलीचे आहे. लाकूड आणि जांभा दगडाचा वापर करून कोरीव रेखीव मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. गाभागृहाच्या दोन्हीकडे द्वारपाल आहेत. गर्भगृहात कनकादित्याची मूर्ती असून मूर्तीच्या डोक्यावरील मुकूट हे दाक्षिणात्य पध्दतीचे आढळते.

जाकादेवी मंदिर -

कनकादित्य मंदिरापासून काही अंतरावर जाकादेवी मंदिर आहे. पूर्ण मंदिराचे बांधकाम जुने आणि पारंपरिक पध्दतीचे आहे. अशी फार कमी मंदिरे आहेत, जी अद्यापही मूळ स्थितीत टिकून आहेत.

देवघळीत राहताना- 

देवघळीत राहण्याची सोय नाही. पण तिथे टेंट भाड्याने मिळतात. तसेच ज्यांच्याकडून टेंट भाड्याने घेणार आहेत, तोच व्यक्ती तुम्हाला नाश्ता, चहा, जेवण बनवून देईल. तिथे मासे अथवा मटण, चिकन हवे असल्यास, सोबत जाताना घेऊन जायला लागेल. सोबत तुम्हाला पिण्यासाठी पाणीदेखील घेऊन जावे लागेल.

देवघळी किंवा कशेळीत कुठलेही मच्छी मार्केट नाही. त्यामुळे राजापुरातून जाताना सोबत घेऊन जावे लागेल.

देवघळीत राहायचं असेल तर रात्रीच्या वेळी पठारावर समुद्रांच्या लाटांचा आवाज ऐकत टेंटमध्ये झोपणे, हा एक अविस्मरणीय अनुभव असेल. येथील ग्रामपंचायतीचे टॉयलेट, बाथरूमचा वापर करता येतो. जर फक्त बीचला भेट देऊन परत यायचं असेल तर एका दिवसात देवघळी बीच बघता येतो.

कसे जाल देवघळीला-

कोल्हापूर-शाहूवाडी-मलकापूर -आंबा-साखरपा-पुनास-पावस-पूर्णगड-कशेळी-देवघळी बीच

कोल्हापूर- पोर्ले तर्फ ठाणे-वाघवे-नांदारी-करंजफेण-अनुस्कुरा घाट-पाचाळ-सौंडाळ-धुतपापेश्वर-आडिवरे-कशेळी-देवघळी बीच

कोल्हापूर-बालिंगे-असळज-खारेपाटण-राजापूर-खालची भंडारवाडी-आडिवरे-कशेळी-देवघळी बीच 

कोल्हापूरपासून जायचे असल्यास तुम्ही वरील तिन्हीपैकी एक मार्ग निवडू शकता.

 

Ratnagiri best Tourism : राजापुरात पाहायला जा 'ही' अद्भूत ठिकाणे


रत्नागिरीत अनेक प्रसिध्द पर्यटनस्थळे आहेत. खूप सारे पर्यटक समुद्र किनारी जायला पसंती देतात. खळखळत्या समुद्रकिनारी पर्यटकांची नेहमीच रेलचेल असते. पण, रत्नागिरीमध्ये अशी काही ठिकाणे आहेत, जिथे फार कमी लोक जातात किंवा तेथे फार गर्दी नसते. अशाच काही उत्तम ठिकाणांविषयीची माहिती आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. (Ratnagiri best Tourism) राजापूर, कसबा, संगमेश्वर, जुवे बेट आणि तुम्ही कादाचित या ठिकाणी कधी गेला नसाल अशा स्थळांबद्दल आम्ही सांगणार आहोत. लाँग ड्राईव्हसोबत वेगळी कला-संस्कृती आणि कोकणचा साद घालणारा निसर्ग यांचा तिहेरी संगम या रत्नागिरीच्या ट्रीपमधून तुम्हाला अनुभवता येईल. यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. यानंतर तुम्ही या ठिकाणांना नक्कीच भेट द्याल! तुमच्या नेहमीच्या टूरपेक्षा ही हटके टूर असेल. (Ratnagiri best Tourism)

राजापूरची गंगा - देवगिरीच्या यादव काळापासून राजापूर ही प्रसिद्ध व्यापारी पेठ होती. रत्नागिरी जिल्ह्यातील 'राजापूरची गंगा' तीर्थस्थानला खूप महत्त्व आहे. ऐतिहासिक काळापसून या ठिकाणाला महत्त्व आहे. जमिनीत असलेल्या १४ कुंड अचानक पाण्याने भरून जातात. सामान्यपणे तीन वर्षांतून एकदा राजापूरची गंगा अवतरते. साधारणपणे तीन महिने ही गंगा थांबते. गंगेचे दर्शन घेऊन स्नान करण्यासाठी येथे भाविक गर्दी करतात.

कसे जाल - बालिंगे- घरपण - साळवण - असळज-गगनबावडा-भूईबावडा घाट-तिरवडे तर्फ खारेपाटण-मेहबूबनगर-कोळपे-तीथवली-मुंबई-गोवा हायवे- पनवेल कोची कन्याकुमारी हायवे-हातखंबा गोवा रोड-राजापूर गाव-राजपूरची गंगा.

उन्हाळे - गरम पाण्याचे झरे येथे आढळतात. उन्हाळे हे राजापूर तालुक्यातीस गाव आहे. या गावात प्रसिध्द महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे. या मातेच्या चरणापासून झऱ्याची निर्मिती झाल्याचे सांगितले जाते. येथे १२ महिने गरम पाण्याचे झरे प्रवाहित होतात. राजापूर तालुक्यात असे अनेक छोटे-छोटे गरम पाण्याचे कुंड पाहायला मिळतात.

 उन्हाळे गावातील महालक्ष्मी मंदिरासमोर एक कुंड आहे. या कुंडात गरम पाण्याचे दोन वेगवेगळे झरे आहेत. यास गंगा तीर्थ असे म्हटले जाते. या गरम पाण्याच्या झऱ्यापासून ३०० मीटर अंतरावर श्री. स्वामी समर्थ महाराजांचा मठदेखील आहे. हा मठ पाहण्यासारखा आहे. नारळी, आंबा, पोफळी, फणस या झाडांच्यामध्ये हे गाव वसलेले आहे. 

आजूबाजूला नदी, हिरवागार निसर्ग, रम्य शांत वातावरणात हे मठ आहे. हे मठ कौलारु जांभ्या दगडापासून बनवलेले आहे. गंगा तीर्थ उन्हाळे येथे गंगा ही मूळगंगा, चंद्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुना कुंड, सरस्वती कुंड, गोदावरी कुंड, कृष्ण कुंड, नर्मदा कुंड, कावेरी कुंड, अग्नि कुंड, भीमा कुंड, चंद्रभागा कुंड आणि काशी कुंड या चौदा कुंडाकडे वाहते. यापैकी काशीकुंड आणि मूळ गंगा हे प्रमुख मानले जाते.

कसे जाल - राजापूरची गंगा पासून उन्हाळे गरम पाण्याचे झरे हे दीड किलोमीटरचे अंतर आहे. राजापूरची गंगा- रेल्वेस्टेशन रोड-उन्हाळे गरम पाण्याचे कुंड/हॉट वॉटर स्प्रिंग.

उक्षी ब्रीज - संगमेश्वरला जाताना डाव्या बाजुलाच मुंबई गोवा हायवेला लागून उक्षी ब्रीज आहे. अतिशय सुंदर हे ब्रीज असून कोकण म्हणजे काय? हे इथं अनुभवता येतं. सुंदर वातावरण, नदीवर पुल, आजूबाजूला विस्तीर्ण पसरलेली माडाची झाडे, पोफळीच्या बागा आणि सुपारीचे मळे तुम्हाला निदर्शनास पडतील. फोटोग्राफी करण्यासाठी हे उत्तम ठिकाण आहे.

कसबा पेठ - कसबा पेठेतून पुढे गेल्यानंतर छोटे संगमेश्वरचे मंदिर आहे. जरा अतिशय सुंदर शिल्पकाम असलेले कर्णेश्वर मंदिर दृष्टीस पडते. येथे जुनी गावे, गावातील जुने घरे, लाकडी वाडे, लाकडी वाड्यांवर केलेले कोरीव काम आणि निरामय शांतता अनुभवता येते. येथील बहुतांशी घराला कुलूप दिसते. जवळ असलेल्या मुंबईच्या ठिकाणी येथील माणसे बहुदा कामासाठी गेली असावीत, असा अंदाज लावता येईल. कसबा गावात सोमेश्वराचेदेखील दगडी बांधकाम असलेले प्राचीन मंदिर आहे.

संगमेश्वर मंदिर - संगमेश्वर येथे अनेक मंदिर पाहायला मिळतात. ही मंदिरे प्राचीन काळातील आहेत. कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील खिद्रापूरपेक्षाही संगमेश्वर खूप जुनं मंदिर असल्याचे म्हटले जाते. रत्नागिरी जिल्ह्यातील अलकनंदा, वरुणा आणि शास्त्री नदीच्या संगमाचे ठिकाण म्हणजे संगमेश्वर. यास 'रामक्षेत्र' असेही म्हटले जाते.

 संगमेश्वरला जाण्यासाठी राजापूरची गंगा ठिकाणापासून अडीच तासांचा रस्ता आहे. सुरुवातीलाच संगमेश्वर हे छोटेखानी महादेवाचं मंदिर दिसतं. नदीच्या किनारी वसलेलं खूप सुंदर असं संगमेश्वर मंदिर आहे. पण, ५ मिनिटाच्या अंतरावर कर्णेश्वराचं मंदिर आहे. पण, ते सहजासहजी दृश्यास पडत नाही. एका लोखंडी पुलावरून पुढे गेल्यानंतर एखाद्या घराच्या पायऱ्या असल्याप्रमाणे जांभा दगडी पायऱ्या नजरेस पडतात. या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर एक विस्तीर्ण मैदान लागते. या मैदानावर कर्णेश्वराचे प्रसिध्द महादेव मंदिर आहे.

कर्णेश्वर मंदिर - हे महादेवाचे प्रसिध्द मंदिर आहे. कोल्हापुरातील खिद्रापूरच्या मंदिराच्या स्थापत्यशैलीशी मिळते-जुळते असलेले कर्णेश्वराचे मंदिर आहे. हे मंदिर खिद्रापूरपेक्षाही जुने असल्याचे येथील मंदिराच्या स्थापत्यशैलीवरून ओळखते. काही जण हे मंदिर कर्ण राजा (कोल्हापूर) ने बांधले असावे असे म्हणतात. तर काही जण इ.स. १०७५ ते १०९५ या काळात गुजरातच्या चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले असावे, असे अभ्यासकांचे मत आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिरावर गणपती, लक्ष्मी, महिषासूरमर्दिणी, विष्णू अनेक देवदेवतांच्या मूर्ती आहेत. 

अतिशय आखीव रेखीव कोरीव काम असलेल्या या मूर्ती भक्तांच्या चटकन लक्ष वेधून घेतात. त्याकाळात इतकी सुंदर शिल्पे कशी काय घडवली असावीत, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडेल. मंदिरात गेल्यानंतर भूमीज शैलीची मंडप, महामंडप, अंतराळ आणि गर्भगृह अशी रचना आढळते. बाहेर कितीही ऊन पडलेलं असो वा गर्मी असो, मंदिरात पाऊल ठेवताच मनाला आणि शरीराला शितलता वाटते. गर्भगृहात कर्णेश्वराची पिंड आहे. सोबत पार्वतीची मूर्तीही आहे. येथे सुंदर प्रभावळदेखील दिसते.

कसे जाल -१) राजापूर-मांडवकरवाडी-नेरकेवाडी-मुंबई गोवा हायवे-हातखंबा गोवा रोड-पाली फाटा-निवळी घाट-उक्षी ब्रीज साईट रोड- संगमेश्वर रोड-संगमेश्वर मंदिर आणि कर्णेश्वर मंदिर.

२) मुंबई-गोवा महामार्ग-कसबा गाव - संगमेश्वर मंदिर आणि कर्णेश्वर मंदिर.

३) रेल्वेने यायचे असेल तर कोकण रेल्वे आहे. संगमेश्वर रेल्वे स्थानकाजवळ थांबता येते.

४) रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पुण्याहून एसटी आहे.

पण, शक्यतो स्वत:ची गाडी असलेली चांगली. यामुळे तुम्हाला जागोजागी थांबून विविध पॉईंट्स पाहता येतात. शिवाय वेळही वाचेल.

छत्रपती संभाजी महाराज स्मारक - संगमेश्वरात कसबा या गावात छत्रपती संभाजी महाराज स्मारक आहे.

छत्रपती संभाजी महाराज स्मारकश्री सप्तेश्वर मंदिर - संगमेश्वरापासून सप्तेश्वर मंदिर हे अंतर सव्वा तासांचे आहे. कुठेही पाहायला मिळणार नाही असा सप्तेश्वराचा मंदिर परिसर आहे. स्वच्छ नितळ पाण्याचे कुंड असलेला हा परिसर हिरवाईने नटलेला आहे.

कसे जाल - संगमेश्वर - मुंबई गोवा हायवे-संगमेश्वर सप्तेश्वर मार्ग- कसबा लावगणवाडी (Kasba lavganwadi) - पुढे आतमध्ये फाटा गेलेला आहे-सप्तेश्वर मंदिर

मल्लिकार्जुन मंदिर - शिरंबे येथील पाण्यातील मल्लिकार्जुन मंदिर पाहण्यासारखं आहे.

कसे जाल - मुंबई गोवा हायवेवर चिपळूण नंतर सावर्डे बस स्थानक- मल्लिकार्जुन मंदिर

जुवे बेट - राजापूर तालुक्यातील जुवे नावाचे गाव आहे. जुवे बेटाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. हे ठिकाण सप्तेश्वर मंदिरापासून ५० कि.मी अंतरावर आहे. पावणे दोन तासात हे अंतर कापता येते. या जुवे गावात पारंपरिक पद्धतीची कौलारू घरे आहेत. आंबा, फणस, नारळ, काजूची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. गावात आल्हाददायक वातावरण आहे. भौतिक सुख-सुविधांपासून हे गाव दूर आहे. गावात श्री रवळनाथ, श्री सीमराई देवीची मंदिरे आहेत. समुद्रकिनाऱ्यामुळे या गावाचे निसर्ग आणखी बहरले आहे. अर्जुना नदीच्या मुखाशी जुवे बेट असून याठिकाणची शांतता तुम्हाला मोहून टाकणारी आहे.

कसे जाल- सप्तेश्वर मंदिर-कसबा लावगणवाडी-मुंबई गोवा हायवे-शास्त्री पुल-पनवेल कोची कन्याकुमारी हायवे-कोल्हापूर रत्नागिरी रोड-निवखोळ रोड- कर्ला रोड- खालची गल्ली-जुवे.

आणखी काय पाहाल?

  • कोल्हापूरहून जाताना घाटकडा धबधबा पाहू शकता. पुढे व्हयू पॉईंट पाहू शकता.
  • राजापूर गढी, वखार, ब्रिटीश वेअरहाऊस
  • भूईबावडा घाट येथे सनसेट पॉईंट पाहण्यासाठी थांबू शकता.
  • कसबा पेठ येथे गणेश मंदिर, श्री लक्ष्मी-नृसिंह मंदिर येथे दर्शनासाठी जाऊ शकता.
  • राजापुरात तुम्हाला जितवणे धबधबा, कातळकडा धबधबा (हर्डी) अशा ठिकाणांनाही भेटी देता येतील.
  • हक्रावाने वाडी (Hakrawane Wadi) हे देखील पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे.
  • तसेच कुंभेश्वर, काशी विश्वेश्वर, केदारेश्वर, रावणेश शंकर, जलयुक्त नन्दिकेश (संगम मंदिर), काळभैरव अशा मंदिरांनादेखील भेटी देऊ शकता.
  • तुम्ही प्रसिध्द महादेवाचे मंदिर मार्लेश्वर आणि मार्लेश्वर धबाधबा देखील पाहू शकता.
  • काय खाल?

    मासे, सोलकडी, तांदळाची भाकरी, भात, गोलमा, ऑम्लेट, पोहे, चहा, अंडाकरी, चिकन, गोलमा, चपाती, ताक, शाकाहारी जेवण आदी.

Monday, January 23, 2023

Konkan Travel : रत्नागिरीतील 'मालगुंड'ला कधी गेलाय का? ही सुंदर ठिकाणे पाहा...



आमचा महाराष्ट्र सह्याद्रीच्या डोंगररांगानी व्यापलेला आहे. (Konkan Travel ) महाराष्ट्रातील पश्चिम किनारपट्टी आणि डोळ्यात न मावणारा निसर्गाचा ठेवा, आमच्याकडे आहे. हा अनमोल ठेवा जपत महाराष्ट्राची भटकंती तर करायलाच हवी.  या सुंदर ठिकाणांपैकी एक रत्नागिरी जिल्हा. त्यामधील सर्वात प्रसिद्ध ठिकाण म्हणजे गणपतीपुळे. पण, तुम्हाला माहितीये का गणपतीपुळ्याजवळ अनेक रमणीय आणि सुंदर अशी पर्यटनस्थळे आहेत, जिथे तुम्ही भेट देऊ शकता. तुम्ही जर गणपतीपुळेला गेला तर या पुढील ठिकाणांना नक्की भेट द्या. (Konkan Travel )

गणपतीपुळे - रत्नागिरी जिल्ह्यातील हे एक धार्मिक पर्यटनस्थ‍ळ आहे. येथे स्वयंभू गणपतीचे मंदिर असून ते ४०० वर्षांपेक्षा जुने असल्याचे म्हटले जाते. कोकण किनारपट्टीवर गणपतीपुळे असून एका बाजूला सह्याद्रीच्या रांगा आणि दुसऱ्या बाजूला विशाल अरबी समुद्र आहे. जवळपास मालगुंड आणि जयगड ही गावेदेखील प्रसिद्ध आहेत, जेथे तुम्ही भेट देऊ शकता. येथे वॉटर स्पोर्ट्स उपलब्ध आहे. शिवाय घोडागाडीमधून तुम्हाला समुद्र किनारी फेरफटका मारता येतो. (Konkan Travel )

कसे जाल - कोल्हापूर - बांबवडे- मलकापूर-कोल्हापूर रत्नागिरी मार्ग-आंबा घाट-साखरपा-चाफे-नेवरे फाटा-गणपतीपुळे

मालगुंड - कवी केशवसूत यांचे घर तुम्हाला मालगुंड गावात पाहायला मिळेल. शिवाय त्यांची साहित्यसंपदा आणि वाचनासाठी ग्रंथालयदेखील घराला लागून दिमाखात उभे आहे. अस्सल कोकणी पद्धतीच्या या घरात तुम्हाला आतमध्ये जाऊन पाहता येते. कवी केशवसुतांचे जन्मस्थान मालगुंड आहे.

कसे जाल- गणपतीपुळेपासून १ किलोमीटर अंतरावर मालगुंड आहे.

आरे-वारे बीच - हे दोन जुळे सुंदर समुद्रकिनारे आहेत. पांढऱ्या वाळूमुळे हे किनारे आपले लक्ष वेधून घेतात.

कसे जाल- गणपतीपुळे पासून आरे वारे अर्धा तासांच्या अंतरावर आहे. मंदिर व्ह्यू पॉईंट-आरे वारे रोड- आरे वारे ब्रीज-आरे वारे किनारा.

गावखडी बीच - दाट सुरुची वने आणि सुंदर निखळ समुद्रकिनरा या ठिकाणी पाहायला मिळतो. रत्नागिरीहून राजापूर रस्त्यावरून प्रवास करताना, पूर्णगडचा खाडी पूल ओलांडला की गावखडीचा समुद्र नजरेत भरतो. गावखडी समुद्रकिनारा अंदाजे १ किमी लांब आहे. गावखडी समुद्रकिनाऱ्याच्या उजवीकडे मुचकुंडी नदी आहे. तेथून तुम्ही पूर्णगड किल्ला पाहू शकता.

कसे जाल - पावस ते गावखडी हे अंतर ९ किमी आहे. गणपतीपुळेपासून हे अंतर दीड तासांचे आहे. गणपतीपुळे मंदिर-आरे-मुसलमानवाडी-गोलप-गावखडी बीच.

पूर्णगड किल्ला - गावखडी बीचला जाताना तुम्ही पूर्णगडला जाऊ शकता. जाताना तुम्ही रनपार समुद्रकिनारा आणि वायंगणी बीचलादेखील भेट देऊ शकता.

गणेशगुळे - या गावाला निसर्गरम्य समुद्रकिनारा लाभला आहे. येथे पर्यटकांसाठी निवास-भोजन अशा सर्व सोयी झाल्या आहेत. येथील रमणीय परिसरामुळे अनेक चित्रपटांचे व मालिकांचे शूटिंग या भागात होत असते.

कसे जाल - गणपतीपुळेपासून गणेशगुळेपर्यंत दीड तासांचा रस्ता आहे. गणपतीपुळे-भंडारवाडा-आरे वारे रोड-गंजुर्डा-सुभाष रोड- सी लिंक - गणेशगुळे रोड-गणेशगुळे.

पावस - हे ठिकाण स्वामी स्वरुपानंद यांच्या आश्रमासाठी प्रसिद्ध आहे.

कसे जाल - गणपतीपुळेपासून ४१ किमी. अंतरावर पावस आहे.

थिबा पॅलेस - हे पॅलेस पाहण्यासारखे असून गणपतीपुळे पासूनचे अंतर १ तासांचे आहे.

कसे जाल - गणपतीपुळे-भंडारवाडा-आरे वारे रोड -गंजुर्डा-थिबा पॅलेस.

जयगड - जयगडचा किल्ला पाहण्यासाठी अनेक पर्यटक, निसर्गप्रेमी आणि इतिहास अभ्यासक, संशोधक येथे येत असतात. हा किल्ला १६ व्या शतकातील आहे. येथे लाीटहाऊसदेखील आहे.

कसे जाल - गणपतीपुळेपासून २० किमी अंतरावर शास्त्री खाडीजवळ हा किल्ला दिमाखात उभा आहे.

जय विनायक मंदिर - जयगड येथील जय विनायक मंदिर प्रसिद्ध ठिकाण आहे. अनेक भाविक येथे भेट देत असतात. जर तुम्ही रत्नागिरीत आला तर या स्थळाला नक्की भेट द्या.

कसे जाल- जय विनायक मंदिराला जाण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागतो. गणपतीपुळे-आरे वारे रोड- जय विनायक मंदिर

रत्नदुर्ग किल्ला - रत्‍नदुर्ग हा रत्‍नागिरी शहरापासून अवघ्या २-३ कि.मी. वर आहे. रत्‍नदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण आहे. येथे सुंदर भगवती मंदिर आहे. येथून समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. किल्ल्याच्या पायथ्याशीच मिरकरवाडा हे बंदर आहे.

कसे जाल - गणपतीपुळे-आरे रोड- गंजुर्डा-रत्नदुर्ग किल्ला

रत्नदुर्गला जाताना तुम्ही रत्नागिरी मरीन फिश म्युझियम देखील पाहू शकता.

वर्षभर तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता. पण उन्हाळ्यात येथील तापमान जास्त असते. म्हणून ऑक्टोबर ते मार्चपर्यंत तुम्ही या ठिकाणांना भेट देऊ शकता.

Unexplored Konkan : कोकणात दडलीय ही सुंदर ठिकाणे, तुम्ही पाहिली का?



आपण मागील काही आठवड्यांमध्ये मालगुंड, आंबोली, राजापूर, मालवण, रत्नागिरी पर्यंटनाविषयी असंख्य माहिती घेतलीय. (Unexplored Konkan) या पर्यटनाची माहिती तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून वाचू शकता. तुम्ही न पाहिलेल्या स्थळांची सुंदर माहिती तुम्हाला या वृत्तामधून मिळेल. आता आम्ही तुमच्यासाठी आणखी काही अप्रतिम ठिकाणांची माहिती घेऊन आलो आहोत. काही अशी स्थळे आहेत, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसावी. किंबहुना, ती फार कमी लोकांना माहिती असावी. जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा. (Unexplored Konkan)

कुणकेश्वर बीच आणि मंदिर - कणकेच्या बनात असलेला ईश्वर म्हणजेच कुणकेश्वर, असं म्हटलं जातं. कुणकेश्वर मंदिराला भेट देणारे पर्यटक, भाविकांची संख्या प्रचंड असते. ११ व्या शतकातील हे प्राचीन महादेवाचे मंदिर अनेक पर्यंटकांना खुणावते. देवगडहून १८ कि.मी. अंतरावर कुणकेश्वर हे गाव आहे. येथे एसटीने जाता येते. बीचजवळ जाताच या मंदिराचा कळस आपले लक्ष वेधून घेतो. मंदिर पाहण्यासारखे आहे. येथे घरगुती जेवणदेखील मिळते. कोकणातील खास सोलकढी पिण्यासाठीदेखील पर्यटक येथे गर्दी करतात. येथे जाण्यासाठी देवगड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी पासून एस.टी. बस आहेत.

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे: विजय दुर्ग किल्ला, रामेश्वर मंदिर देवगड, देवगड जेट्टी

मिठमुंबरी बीच - मिठमुंबरी बीच हा अतिशय स्वच्छ व सुंदर आहे कुणकेश्वर पासून अतिशय जवळ आहे. इथे पर्यटकांची गर्दी कमी असते त्यामुळे मनसोक्त आनंद घेता येतो. या ठिकाणाहून सनसेट पाहणं, म्हणजे निसर्गाच्या चमत्काराची अनुभूती घेणं ठरतं. फारशी गर्दी नसणारे हे ठिकाण आहे. देवगडपासून चार किलोमीटर अंतरावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हे बीच आहे. या बीचला खूप कमी लोक भेट देतात. खूप मऊ चमकणारी वाळू आणि निळाशार समुद्र डोळे दिपवणारे आहेत. जवळचं तुम्हाला तारामुंबरी बीच पाहता येईल. 




दहिबाव - दहीबाव हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. दहीबाव आणि मीठबाव अशी दोन गावे याठिकाणी आहेत. येथील महादेश्वर मंदिर पाहण्यासारखे आहे. लाल गुलाबी रंगाचे छत असणारे महादेवाचे या मंदिराच स्थापत्यशैली अगदी वेगळी आहे. या गावामध्ये जाताना कोकणी पद्धतीची कौलारे घरे, भात शेती, आजूबाजूला नारळ, पोफळी, सुपारीच्या बागा, ओहळ, काजुचे मळे असा हिरवागार निसर्ग वेड लावणारा आहे. शुद्ध हवा आणि रस्त्यालगत असणारे हे मंदिर भक्तीमय वातावरण तयार करतेय. त्याचबरोबर, जर तुम्ही याठिकाणी पावसाळ्यात गेला तर दहिबाव गावातील गुपित धबधबा नक्की पहा. डोंगराच्या कुशीत लपलेला या धबधब्याजवळ गुहादेखील पाहायला मिळते.

मीठबाव - श्री रामेश्वर मंदिर,मिठबाव,ता.देवगड,जि.सिंधुदुर्ग. हे मंदिर स्थापत्यशास्त्र आणि वास्तू शास्त्र यांचा अभ्यास करून हे मंदिर बांधलेलं आहे. मीठबाव येथे असलेली हिरवीगार झाडी, विशाल समुद्र आणि श्रीदेव रामेश्वराचे मंदिर, रस्त्याच्या दुतर्फा कौलारू घरं, नीरव शांतता पाहून मीठबावला जाण्याचा मोह तुम्हाला आवरणार नाही.

गजबादेवी मंदिर - देवगड तालुक्यातील मिठबाव येथील गजबादेवी हे मंदिर श्रीक्षेत्र आहे. खूप सुंदर आणि कदाचित खूप कमी लोकांना माहिती असलेलं हे सुंदर ठिकाण आहे. गजबादेवी समोरील मंदिर खूप अद्भूत आहे. अत्यंत सुंदर, स्वच्छ समुद्र किनारा येथे पाहता येतो. गजबादेवी मंदिरासमोर मीठबाव तांबळडेग समुद्राची किनारपट्टी दिसते. सागरी महामार्गापासून हे ठिकाण आतमध्ये असल्याने या सागराची माहिती फारशी कुणाला नाही. येथे राहण्यासाठी जवळचं एमटीडीसीचे हॉटेल आहे.

आंगणेवाडी - येथे आई भराडीदेवीचे मोठे आणि प्रसिध्द मंदिर आहे. येथे खूप मोठी यात्रा भरते. देवगडपासून आंगणेवाडी ५८ किलोमीटर आहे. येथे जाण्यासाठी कुणकेश्वर-कटवण-मिठबाव-आचरा तिठा-बांदिवडे-मसुरे-आई भराडी देवी मंदिर असा दिड तासांचा प्रवास करावा लागतो.

देवगड पवनचक्की आणि बाग - हे ठिकाण आता पर्यटन स्थळ झाले आहे. अथांग पसरलेला अरबी समुद्र पटकन नजरेत भरतो. उंचावरून समुद्र आणि पवनचक्की पाहण्याची मजा कुछ और आहे. येथे खूप सारे पर्यटक फोटोशूट करायला येतात. पवनचक्कीजवळ सुंगर बाग आहे, जी पाहण्यासारखी असून समुद्रालगत आहे. येथील बैठक व्यवस्थाही अप्रतिम आहे. लाकडापासून बनवलेल्या टेबल खुर्च्यांवर बसून तुम्ही समुद्राकाठची संध्याकाळ न्याहाळू शकता.





देवगड किल्ला - देवगड हे हापूस आंब्यासाठी प्रसिध्द आहे. देवगडमध्ये राहण्यासाठी हॉटेल्स आहेत. किल्ला पाहताना पिण्याचे पाणी स्वत: घेऊन जावे. येथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही. देवगडपासून मालवण ५० किमी अंतरावर आहे. स्वत:चे वाहन असल्यास देवगड व विजयदुर्ग हे दोन्हीही किल्ले पाहता येतात. पुढे मालवणला मुक्काम करता येतो.

देवगड किल्ल्याला कसे जाल?

मुंबई व पुण्यावरून देवगड येथे जायला रेल्वे, एसटी उपलब्ध आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील नांदगाव तिट्ट्यावरून ४० किलोमीटर अंतरावर किल्ला आहे. कणकवली येथे रेल्वेस्थानक आहे.

दर्शन बीच - हे फारसे कुणालाही माहिती नसलेले अत्यंत स्वच्छ, सुंदर आणि नितळ पाण्याचा समुद्रकिनारा आहे. यास दर्शन बीच असंही म्हटलं जातं. देवगडच्या किल्ल्यापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर हे बीच आहे.

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...