Friday, July 19, 2024

समुद्री जीवसृष्टी असलेला मोचेमाड समुद्रकिनारा

फारशी वर्दळ नसलेल्या आणि निवांत किनारा म्हणजे कोकण मधील वेंगुर्लेतील मोचेमाड. या समुद्रकिनाऱ्याचे कौतुक करावं तितकं कमीच आहे! मनाला भावणारा हा किनारा सहजासहजी नजरेस पडत नाही. म्हणूनच की काय याठिकाणी फारशी गर्दी नसते. विस्तीर्ण असा हा किनारा कोणालाही मोहात पाडेल, असा आहे. मोचेमाड वेंगुर्ल्यापासून ८-९ किमी अंतरावर आहे. तुम्ही बस, टॅक्सी किंवा खासगी वाहनाने तिथे पोहोचू शकता.


मोचेमाड समुद्रकिनारा निवांत आणि शांत आहे. वाहणारे खारे वारे स्पर्शून गेल्यानंतर कोकणात आल्याचा अप्रतिम अनुभव येईल. स्फटिकासारखाच स्वच्छ पाण्याचा अगदी प्राचीन समुद्रकिनारा हा आहे. समुद्राच्या लाटांवर स्वार होता येईल, इतका सुरक्षित आहे. समुद्रकिनाऱ्यावर खेळणारी स्थानिक मुलं आणि स्थानिक मच्छीमार वगळता याठिकाणी अजिबात गर्दी नसते.

मोचेमाड बीच हा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि शांततापूर्ण सुट्टीसाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत येथे भेट देऊ शकता. काही ठिकाी  काळ्या वाळूसाठी प्रसिद्ध असलेला हा किनारा पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. काजू आणि माडांच्या बनात वेंगुर्ला हिरवागार दिसतो. महाराष्ट्रातील कमी प्रदूषित समुद्र किनार्‍यांमध्ये वेंगुर्ल्याच्या किनार्‍यांचा समाविष्ट होते. मोचेमाड बीच सोबत सागरेश्वर बीच, निवती बीच, शिरोडा बीच,  वायंगणी बीच, तेरेखोल बीच हे पर्यटकांना खुणावतोय.

मोचेमाड या निळ्या समुद्रात दूरवर नजर फेकली असता अनेक नौका समुद्रावर हेलकावे घेताना दिसतात. पण याठिकाणी एकटे जाऊ नये, दोघे किंवा ग्रुपने गेल्यास अति उत्तम होईल. राहायचे झाल्यास जवळ काही अंतरावर असणारा सागरेश्वर समुद्रकिनारा उत्तम आहे. येथे राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत. याच ठिकाणी रात्रीच्या वेळी तुम्ही येथे कॅम्प फायर करून खळखळणाऱ्या समुद्राचा आनंद घेऊ शकता. टेंटमध्येदेखील राहण्याची सोय येथे केली जाते.  
मोचेमाड गाव तसे शांत आणि कमी वस्ती असणारं. भाताची, बांबूची शेती आणि हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या दगडांच्या डोंगररांगेत मोचेमाड समुद्र मोठ्या डौलाने खळखळताना दिसतो.

 किनाऱ्यावर जुन्या गावाचे फिल देणाऱ्या वस्त्या, सर्वांचे लक्ष वेधून घेतात. प्रचंड पावसामुळे उतरत्या छपराची कौलारू घरे, कोकणी पद्धतीने बांधलेली अनेक घरे पाहून शहरी माणसांसाठी हा कुतुहलाचा भाग ठरतो. मोचेमाड कडे जाताना गर्द झाडीतील छोटे रस्ते, पोफळीच्या, सुपारीच्या बागा, केळीच्या बागा, काजूची मळे, नारळाची झाडे, असंख्य नानाविध प्रकारची झाडे, फुलांनी सजलेली पायवाट मोचेमाड किनाऱ्याकडे जाते. याठिकाणी पार्किंग करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाही. वाहनांचे पार्किंग केल्यानंतर १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर चालत चालत किनाऱ्यावर पोहोचता येते.

हे बीच मोचेमाड गावात लपलेले आहे. थोडेसे आडवळणी असल्यामुळे येथे वेळ काढून जावे. अथांग पसरलेला समुद्र तोही विशालकाय जागेमध्ये जो आधी आपण कधी पाहिला नसेल असा, पाढंरी वाळू, सभोवताली नारळाची झाडे, खारफुटीची जंगल आणि समुद्राच्या लाटा धडकून शिंपल्यांनी सजलेली अनेक मोठे खडक लक्ष वेधून घेतात. येथील समुद्रकिनाऱ्यालगत विविध प्रकारांची जलजीवांची संरचना आढळतात. समुद्री शेवाळ, शिंपले आणि काळ्याकुट्ट पसरलेल्या दगडांमध्ये असंख्य खेकड्यांची घरे दिसतात. या खडकांमध्ये प्रचंड संख्येने असणारी विविध जातीची खेकडे आणि समुद्री जीव दिसतात. इथल्या समुद्रकिनाऱ्याच्या तटावर विविध प्रकारची वनस्पती आहेत.
 
मोचेमाड हा सोनेरी वाळूसाठी प्रसिद्ध आहे. हा किनारा निसर्गरम्य दृश्यांसह वेढलेला आहे आणि पर्यटकांसाठी आणि स्थानिकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. मोचेमाड समुद्रकिनारा हा कोकणात भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही शांतता आणि निवांतता शोधत असाल किंवा जलक्रीडांचा आनंद घेण्यास उत्सुक असाल, तर तुम्हाला मोचेमाडमध्ये नक्कीच आवडेल. ऑक्टोबर ते फेबुवारी महिन्यांच्या दरम्यान भेट देण्यासाठी उत्तम वेळ आहे जेव्हा हवामान सुखद असते.
 
मोचेमाडला राहण्याची अथवा खाण्याची सोय नाही. राहण्यासाठी मोचेमाड पासून जवळ असणाऱ्या सागरेश्वर किनाऱ्यालगत अनेक होम स्टे, हॉटेल्स उपलब्ध आहेत. बजेट हॉटेल्सपासून ते लक्झरी रिसॉर्ट्सपर्यंत अनेक निवास पर्याय उपलब्ध आहेत.तुम्हाला येथे ताजी सीफूड आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.
 
कोल्हापूर-राधानगरी अभयारण्य रोड-फोंडा घाट-फोंडा-पनवेल कोची कन्याकुमारी हायवे-कुडाळ तिट्टा-वेंगुर्ला बेळगाव रोड-वेंगुर्ला असा प्रवास करत वेंगुर्ला याठिकाणी पोहोचता येते. शिरोडा नजीक असणारे वेंगुर्ला हे पर्यटन स्थळ नजरेत भरणारे आहे.  फोंडा घाटापासून दिड तास अंतरावर वेंगुर्ला हे ठिकाण आहे. वेंगुर्लापासून गोवा हे केवळ तीन तास अंतर आहे. वेंगुर्ला बाजार जसे वर्दळीचे ठिकाण तसे पुढे पुढे गेल्यानंतर ही वर्दळ कमी होताना दिसते.  

मानसीश्वर मंदिर, वेतोबा मंदिर, सागरेश्वर बीच, सागरेश्वर मंदिर, मासळी बाजार, केपा देवी मंदिर, डच फॅक्टरी, गर्द झाडीतील श्री नारायण मंदिर, श्री देव तांबळेश्वर मंदिर, सातेरी भद्रकाली मंदिर, सागरेश्वर मंदिर अशी किनाऱ्यावरील सुंदर पर्यटनस्थळे भटकंती करून पाहता येतात. तुम्ही स्थानिक बाजारपेठेतून ताजी सीफूड आणि हस्तकला खरेदी करू शकता आणि स्थानिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. समुद्रकिनारी नारळाची झाडे आणि आसपासचे मनमोहक दृश्ये तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. तुम्ही येथे पोहणे, सूर्यस्नान, बोटिंग आणि मासेमारीचा आनंद घेऊ शकता.

वेंगुर्ला परिसरात काही ठिकाणी घरगुती खानावळी आहेत. तेथेही तुम्ही जेवू शकता. अस्सल कोकणी पद्धतीचे जेवणदेखील येथे मिळते. रेस्टॉरेंट, हॉटेल उपलब्ध आहेत.  यामध्ये विविध प्रकारचे मच्छी करी, मासे, बांगडा,  मच्छी, गोलमा, झिंगे, कडी भात, पापलेट, रोहू, कटला, सुरमई, किंग कोळंबी, तांदळाची भाकरी, अंडाकरी, चिकन तर शाकाहारमध्ये चपाती, भाजी, भात, लोणचे, पापड, वरण, श्रीखंड, उकडी मोदक, नाश्ताला शहाळे, घावणे-चटणी, चहा, पोहे,  कांदा भजी इ. 

No comments:

Post a Comment

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...