Friday, July 19, 2024

रहस्यमयी पर्यावरण अन् अफाट निसर्ग सौंदर्याचं लेणं मानस सरोवर -

मानस सरोवर केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखले जात नाही तर या पर्वत परिसराचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील निसर्ग आणि पर्यावरण. प्रत्येक वर्षी शेकडो लोक मानस सरोवराच्या यात्रेला जातात. कैलास पर्वताला धरतीचे केंद्र मानले जाते. भगवान शिवचे निवासस्थान अशी ओ‍ळख असलेले कैलास पर्वत जैन आणि बौद्ध बांधवांसाठी धार्मिक महत्त्व अधोरेखित करते आणि याच पर्वताच्या कुशीत असलेल्या मानस सरोवराच्या धार्मिक अन्‌ सांस्कृतिक महत्त्वामुळेचं‌ येथील अफाट निसर्ग सौंदर्य आणि पर्यावरण यांची सांगड घातली गेली आहे. हा निसर्ग अनुभवण्यासाठी कैलास-मानस सरोवराची यात्रा केली जाते. अगदी प्राचीन काळापासून मानस सरोवर हे एक तीर्थस्थान म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. हे तिबेटच्या हद्दीत येत असले, तरी त्याचे मोठे आकर्षण भारतीयांनाच आहे. हिमालय पादाक्रांत करून गेल्यावर तिबेटचे पठार लागते. तिथून सुमारे ३२.१८७ किलोमीटर गेल्यावर पर्वतांनी वेढलेली दोन सरोवरे लागतात. एकाचे नाव आहे राक्षसताल आणि दुसर्‍याचे मानस सरोवर. ही दोन सरोवरे मनुष्याच्या दोन डोळ्यांसारखी असून दोन्हींमध्ये नाकासारखा उंच उठलेला एक पर्वत आहे. ह्या पर्वतामुळेच ही दोन्ही जलाशये वेगवेगळी होतात. त्यापैकी राक्षसताल हे आकाराने फार मोठे आहे. शिवाय ते गोल नाही व चौकोनीही नाही. त्याच्या कित्येक भुजा अनेक किलोमीटर दूर पसरलेल्या आहेत आणि अनके वेडीवाकडी वळणे घेत पर्वतांच्या पोटात घुसलेली आहेत. लंकेचा राजा रावण याने ह्या सरोवराच्या काठी शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी तप केले. म्हणून त्याला राक्षसताल हे नाव मिळाले. मानस सरोवर हे अंडाकृती आहे. मानस सरोवराची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे १५ हजार फूट आहे. त्याचा परिघ सुमारे ५४ मैलांचा आहे. तसेच पाण्यावर दिवसभर लहरी उमटत असतात. रात्री मात्र ते शांत असते. मानस सरोवरात मासे आहेत, तसेच मानस सरोवर हे राजहंस पक्ष्याचे वसतिस्थान आहे. राजहंस आणि नुसताच हंस अशा हंसांच्या दोन जाती तिथे आहेत. राजहंस शुभ्र असतात तर सामान्य हंस मातकट पांढरे किंवा काहीसे बदामी रंगाचे असतात. या सरोवरात कमळे नाहीत. संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांत मानस सरोवराचा उल्लेख अनेकदा येतो. मानस सरोवराचा पृष्ठभाग नेहमीच बर्फाच्छादित असतो. त्याच्या तळाशी उकळत्या पाण्याचे झरे आहेत. त्यातून निघणार्‍या वाफेच्या दाबाने मानस सरोवराच्या पृष्ठावरच्या बर्फाचे मोठमोठे खंड हिवाळ्यात त्याच्या काठावर फेकले जातात. त्यामुळेच मानस सरोवराचा बर्फाच्छादित भाग भेगाळलेला दिसतो. या पोटातल्या कढत पाण्याच्या झर्‍यांमुळे मानस सरोवराचे पाणी समशीतोष्ण असते. त्यामुळे त्यात स्नान करणे त्रासदायक वाटत नाही. हिवाळ्यात ह्या सरोवरातील पाणी गोठून त्याचे बर्फ होते. उन्हाळ्यात हे बर्फ वितळते, पण त्यामुळे कोणतेही अनर्थ होत नाहीत. ते पाणी आपली नैसर्गिक मर्यादा ओलांडत नाही. बर्फ विरघळते, तेव्हा एक रहस्यमय आवाज दूरदूरपर्यंत ऐकू येतो. आजपर्यंत समजू शकलेले नाही की, हा आवाज कुठून येतो. हा मृदंगाचा आवाज असल्याचे भाविक मानतात. आदिम काळी मानस सरोवराचे पाणी राक्षसतालामध्ये जात असे, असे म्हणतात. पण सध्या तरी तसे होताना आढळत नाही. जलधारेचे ते स्थान आजही दिसून येते. पण, अलीकडच्या काळात त्याची उंची वाढलेली आहे. प्रत्यक्षात मानस सरोवरातून कोणत्याही नदीचा उगम दिसत नाही. पण संशोधकांचे मत असे आहे, की मानस सरोवराचे पाणी भूगर्भातून कित्येक किलोमीटर दूर जाऊन मग वर येते आणि तेच ठिकाण एखाद्या नदीचे उगमस्थान ठरते. शरयू व ब्रह्मपुत्रा या नद्या अशाच प्रकारे मानस सरोवरातून उगम पावल्या आहेत. माहितीनुसार, जैन धर्म अनुयायी मानतात की, पहिले तीर्थकर ऋषभनाथ यांना कैलाश पर्वतावर तत्वज्ञान प्राप्त झाले होते. जैन भक्त कैलासला अष्टपद म्हणतात. कारण ऋषभदेवांनी आठ पायऱ्यांमध्ये प्रवास केला, असे त्यांचे मत आहे. बौद्ध अनुयायींचे मानणे आहे की, या स्थानी येऊन त्यांना निर्वाण प्राप्ती होते. भगवान बुद्ध यांच्यानंतर बौद्ध धर्मातील तमाम प्रसिद्ध लामांनी १७ व्या शतकात येथे प्रवास केल्याचे म्हटले जाते. कैलास पर्वताला बौद्ध 'कांग रिनपोचे' देखील म्हणतात असं म्हटलं जातं की, मानस सरोवर नजीक भगवान बुद्ध महाराणी माया यांच्या गर्भात आले. कैलासपर्वते राम मनसा निर्मित परम्। ब्रह्मणा नरशार्दूल तेनेहं मानसं सरः॥ महर्षी विश्वामित्र श्रीरामाला म्हणतात, “हे नरशार्दूल रामा, कैलास पर्वतावर ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून निमाण केलेले एक विशाल सरोवर आहे. मनोनिर्मित असल्यामुळेच त्याला मानस सरोवर असे म्हणतात.” म्हणजेच हे सरोवर ब्रह्मदेवाच्या मनातून निर्माण झालेले आहे. महाभारतात असे वर्णन केलेले आहे- ततो गच्छेत राजेन्द्र मानसं तीर्थमुत्तमम्। तत्र स्नात्वा नरो राजन् रुद्रलोके महीयते॥ हे नृपश्रेष्ठा, उत्तम अशा मानस तीर्थाला जावे. तिथे स्नान केल्याने हे राजा, मनुष्याची रुद्रलोकामध्ये पूजा होते. विष्णूने जो पहिला अवतार घेतला, तो मत्स्यावतार होय. तो अवतार मानस सरोवरात घेतला, असे वामन पुराणात म्हटले आहे. येथे सती देवीच्या शरीराचा उजवा हात पडला. म्हणूनच, दगडी दगडाचे रूप म्हणून येथे त्याची पूजा केली जाते. येथे एक शक्तिपीठ आहे. मानस सरोवराची यात्रा अत्यंत कष्टाची असते. मानस सरोवराकडे जायला हिमालयातून अनेक पायवाटा आहेत. त्या सर्वात अलमोड्यावरून जाणारा रस्ता जास्त सोयीचा समजतात. हा मार्ग सुमारे २०९ मैलांचा आहे. अलमोड्यापासून गर्बिआंग, पुढे लिपुखिंड आणि त्यापुढे तकलाकोट लागते. तकलाकोट हे तिबेटातील पहिले गाव होय. तकलाकोटापासून मानस सरोवराचा दक्षिणेकडील काठ सुमारे ४९ किलोमीटर आहे. तकलाकोटपासून पुढचा प्रवास अधिक त्रासाचा आहे. चालणे शक्य नसल्यास बसण्यासाठी घोडी व सामानासाठी खेचरे भाड्याने घ्यावी लागतात. हा भाग अगदी उजाड असून फूट-सव्वाफूट वाढणार्‍या काटेरी झुडुपांव्यतिरिक्त तिथे अन्य काहीही उगवत नाही. आसपास कुठेही, कसलीही लागवड करता येत नाही. हवा विरळ झाल्यामुळे धाप लागते व थकवाही फार येतो. वाटेत कुठेही घर नाही किंवा कुठलाही आडोसा नाही. असे म्हटले जाते की, मानसरोवरचे शुद्ध पाणी आहे. मानसरोवरात एकदा स्नान केले तर तो रुद्रलोकात पोहोचतो आणि जो मानसरोवराच्या मातीला स्पर्श करतो तो ब्रह्मलोकात पोहोचतो. येथील पाणी जो पितो त्याला देवाने निर्माण केलेल्या स्वर्गात जाण्याचा अधिकार प्राप्त होतो.

No comments:

Post a Comment

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...