Wednesday, August 7, 2024

मुसाफिरींची प्रतीक्षा करणारा दूधसागर धबधबा

'चेन्नई एक्सप्रेस'लाही गोडी लावणारा दूधसागर धबधबा

 
भारतात निसर्गात फिरण्यासाठी आणि एकांतासाठी अनेक ठिकाणे आहेत. अनेकदा असं होतं की, आपल्याला काही ठिकाणे लवकर माहिती होत नाहीत. निसर्गाच्या कुशीत लपून बसलेल्या या ठिकाणापर्यंत पोहोचणं, एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. असेच एक ठिकाण म्हणजे दुधासारखा अखंड वाहणारा, चमचमत्या ताऱ्यांप्रमाणे जल वाहून नेणारा आणि खळाळत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारा धबधबा म्हणजे 'दूधसागर.' याचा अर्थ स्पष्ट आहे. दूधसागर म्हणजेच दुधाचा धबधबा असं म्हणता येईल. सामान्य धबधब्याशी याची तुलना करण्याची कल्पना अजिबात करू नका. कारण, दूधसागर पाहिल्यानंतर तुमचे तोंड आ वासून राहील.
 
तुम्ही सफर करणारे 'राही' असाल तर सर्वात आधी फिरण्यासाठी 'दूधसागर' निवडा. कारण, हा धबधबा मोल्लेम राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात आहे. हे ठिकाण अद्भूत, भव्य आणि निसर्गाची ओढ लावणारं आहे.
 
दूधसागर धबधबा-
 
भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक दूधसागर असून त्याची उंची ३१० मीटर (१०१७ फूट) आणि लांबी ३० मीटर (१०० फूट) यांच्या दरम्यान आहे. गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर हा धबधबा आहे. येथे जाण्यासाठी ज‍वळचे दोन रस्ते आहेत. एक गोव्याहून आणि दिसरा कर्नाटकाहून. तुम्ही जर कोल्हापूरहून जाणार असाल तर कोल्हापूर-बेळगाव-भीमगढ जंगल मार्गे-कॅसल रॉकला जाता येते. कॅसल रॉक हे रेल्वे स्टेशनचं ठिकाण आहे. या स्टेशनवर राणी चेन्नमा एक्सप्रेस गाडी थांबते. या रेल्वेतून जवळपास २ तासांचा प्रवास करून दूधसागर धबाधबा ठिकाणापर्यंत जाता येते.
 
 दूध सागर धबधबा गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर मांडवी नदीवर स्थित आहे. हा धबधबा भारतातील पाचव्या क्रमांकाचा आणि जगातील २२७ व्या क्रमांकाचा सर्वात सुंदर धबधबा आहे.
 
ट्रेकिंगसाठी थ्रील अनुभव -

तुम्ही जर ट्रेकला जाणार असाल तर हिच रेल्वे धबधब्यापासून काही किलोमीटर अंतर अलिकडे जंगलामध्ये फक्त ३० सेकंदासाठी थांबते. रेल्वेचे दुसरे इंजिन जोडूपर्यंत या ३० सेकंदाच्या वेळेतच रेल्वेतून खाली पटापट उतरावं लागतं. ही रेल्वे तुम्हाला सोडून पुढे दक्षिण भारताकडे मार्गक्रमण करते. अनेक बोगदे पार केल्यानंतर तुम्ही धबधब्याजवळ पोहोचता. बोगद्यातून आणि रेल्वे ट्रॅकवरून धबधब्यापर्यंतचा प्रवास एक थ्रीलचं असतो. तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही, असा हा प्रवास घडतो. खडकाच्या डोंगरांमधून वाहणारा धबधबा पाहून डोळे दिपतात. दूर अंतरावरून येणारे पाण्याचे फवारे ओलेचिंब करून जातात. एकीकडे धबधबा आणि दुसरीकेड जाणारी रेल्वे...यातून घडणारा प्रवास अवर्णनीय असतो.
 
यावेळी ''कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी, उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी''... यावेळी गोमंतक पुत्र कवी बा. भ बोरकर यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही.
 
धबधब्याच्या शिरोमणीवर नजर टाकली की, हे पाणी नेमकं येतं तरी कोठून? असा प्रश्न आपसूक मनात येतो. बा. भ. बोरकर यांची सुंदर कविता आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या-कपाऱ्यांमधून घट फ़ुटती दुधाचे!!
 
दूधसागर धबधब्यापर्यंत कसे जाल ?
 
या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेळगाव मार्गे कॅसल रॉक रेल्वे स्टेशन आहे. बेळगाव सोडल्यानंतर भीमगढ अभयारण्यातून (कर्नाटक) रस्ता आहे. भीमगढच्या जंगलात भीमगढचा किल्लादेखील आहे. हे जंगल आरक्षित असल्याने येथे सहजासहजी प्रवेश मिळत नाही. भीमगढची घनदाट जंगले मागे टाकत गाडीने कॅसल रॉक रेल्वे स्टेशना पोहोचता येईल. येथे उत्तरेकडून येणारी रेल्वे जी दिक्षण भारतात जाते, ती पकडता येईल. बेळगावपासून (कर्नाटक) सुमारे ८० कि.मी. या अंतरावर आहे. महत्त्वाचं म्हणजे, दूधसागर धबधब्याजवळ कोणतेही रेल्वे स्टेशन नाही. त्यामुळे जाणकार व्यक्ती किंवा गाईडला घेऊन जाणे सोईस्कर ठरेल. पावसाळ्यात हा धबधबा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो.

तुम्ही जर गोव्याहून येणार असाल तर भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यातून टॅक्सी घेऊन जाता येईल. हा एकमेव र्स्ता आहे, जो धबधब्यापर्यंत जातो. पणजी (गोवा) पासून ६० किमी. अंतरावर दूधसागर आहे. तसेच मडगावपासून ४६ किमी. अंतर आहे.
 
या धबधब्याची सुंदरता आणि सभोवतालची पानझडीचा आनंद घेण्यात मजा आहे. जर तुम्ही पहिल्यांदा प्रवास करत असाल तर ज्या प्रकारच्या रस्त्यांवरून येथेपर्यंत पोहोचता येते आणि दूधसागर पाहण्याचे जे थ्रील आहे, ते तुम्हाला अधिक उत्साहित करेल. तुम्ही आसपासच्या ठिकाणे फिरला तरीदेखील तुम्हाला ती ठिकाणे जंगलांनी वेढलेली दिसतील. याच गोष्टी पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.
 
बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग -

'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटातील एका भागाचे शूटिंग याच धबधब्यावर झाले आहे. 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यावर काही दृश्ये या धबधब्यावर चित्रीत करण्यात आली होती. उन्हाळ्यात हा धबधबा कोरडा पडतो. मात्र इतरवेळी हा धबाधबा पाहायला जाणे, हे पर्यटकांचे स्वप्न असते.
 
भगवान महावीर अभयारण्य किंवा मोल्लेम राष्ट्रीय उद्यान -
 
दूधसागर धबधबा भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यान यांच्या मध्ये आहे. एका बाजूला डोंगर कपाऱ्यांमधून वाहणारा धबधबा आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड घनदाट वने आणि पाने -फुले, औषधी वनस्पतींनी वेढलेली जंगले असा सगळा निसर्गाचा पसारा दूधसागरच्या सभोवताली पाहता येतो. धबधब्या भोवती जैवविविधतेने समृद्ध असे भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यान आहे.
 
मोल्लेम जंगल हे घनदाट सदाबहार आणि निम्न-सदाबहार वनांनी वेढलेले आहे. हे जंगल विशाल वन्य जीव विविधतेने नटलेले आहे. येथे वाघ, बिबट्या, गवे आणि अन्य २०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आणि आहेत. येथे मायसेना जीनस नावाची प्रकाश देणारी मशरुमची प्रजातीही आढळते. तसेच किंग कोबरा, हंप-नोज्ड पिट वायपर, इंडियन रॉक पायथॉनअसा सापांच्या प्रजाती आढळतात.
 
तांबडी सुरला - माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना-फ़ुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी!!'' ही बा. भ. बोरकरांनी लिहिलेली कविता येथील निसर्गाला तंतोतंत लागू पडते. तांबडी सुरला येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. अनोख्या शैलीतील या मंदिराची निर्मिती १२ व्या शतकात झाली आहे. हे मंदिर कदंब यादव वंश काळातील वास्तुकला शैलीचे एकमेव स्मारक आहे. तांबडी सुरला मंदिर पणजीपासून ६६ किलोमीटर आहे. तांबडी सुरला जवळ धबधबादेखील आहे. जो तांबडी सुरला मंदिरापासून २१ किलोमीटर अंतरावर आहे.
 
नेत्रावली धबधबा

पश्चिम घाटात वाईल्डलाईफ सॅन्चुरी येथील नेत्रावली धबधबा सर्व निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. मान्सूनमध्ये फिरण्यासाठी हे सर्वांत उत्तम स्थळ आहे. येथे बर्ड वॉचिंग आणि स्पॉटिंग वाईल्ड लाईफ पाहू शकता. येथे Mhadei Wildlife Sanctuary सर्वात प्रमुख आहे.

आणखी काय पहाल -
 
बोंडला वन्यजीव अभयारण्य

मोलमेल नेशनल पार्क

सहयाद्री स्पाइस फार्म

दूधसागर वृक्षारोपण और फार्मस्टे

भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य

श्री राक्षस मल्लिकेश्वर टेम्पल कुलेम

शेवटी म्हणावंस वाटतं-

''निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसें काळिज निखळी
एकाची सगळी वसती-
तेथें कर माझे जुळती''
- कवी ,लघुकथा लेखक ,कादंबरीकार गोमंतक पुत्र कवी बा. भ. बोरकर

No comments:

Post a Comment

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

  मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर...