Wednesday, August 7, 2024

Maharashtra Konkan Tour : वेळणेश्वरचा अथांग समुद्र अन्‌ बामणघळ …

 मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबागविषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. रत्नागिरीतील गुहागरमधील 'वेळणेश्वर'ला एकदा का होईना, एकदा तरी भेट द्यायलाच हवी! समुद्राकाठचा वेळणेश्वर निसर्गसृष्टीने वेढलेला आहे. दोन दिवस तर इथे राहून वेळणेश्वर पाहायलाचं हवं. चैतन्यदायी, प्रफुल्लित वातावरण इथं नक्कीच पाहायला मिळते. (Maharashtra Konkan Tour) अथांग सागर, नारळी पोफळीच्या घनदाट बागा, जागृत देवस्थाने आणि अलौकिक निसर्ग सौंदर्य यांचा मिलाप हे वेळणेश्वरचं वैशिष्ट्य सांगता येईल. भगवान परशुरामांचे शिष्य असलेल्या व्याड मुनी यांनी याठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली. "व्याडांचा ईश्वर म्हणजेच वेळणेश्वर." याच वेळणेश्वरबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत. सोबतच बामणघळ, गुहाघर, तवसाळ अशा अनेक पर्यटन स्थळांविषयी माहिती देणार आहोत. तुम्हाला सुट्ट्या मिळाल्या की, याठिकाणी एकदा तरी नक्की फिरायला जा! (Maharashtra Konkan Tour)

वेळणेश्वर

गर्दीचं ठिकाण नसलेलं नीरव शांतता असलेलं पर्यटनस्थळ म्हणून वेळणेश्वर गावचा उल्लेख करावाच लागेल. तीव्र उतार, अनेक वळणे घेत वेळणेश्वरच्या गावात जाता येते. वेळणेश्वर हे प्राचीन भूमी असल्याचं म्हटलं जातं.

हेदवी
हेदवी

वेळणेश्वरचा निसर्ग

फोटोग्राफीची आवड असणार्‍यांसाठी हे उत्तम ठिकाण आहे. माडाची बने, लाल माती आणि जांभा दगडांची कौलारू घरं लक्ष वेधून घेतात. भात शेती, माडाच्या बनातून गाडीतून लॉन्ग ड्राईव्ह करत वेळणेश्वरला जाता येते. कोकणी पद्धतीची घरे, येथील वातावरण आत्मिक समाधान देऊन जाते. पांढरी वाळू, लांबलचक समुद्रकिनारा, मासे पकडणारे मच्छीमार दृष्टीस पडतात. हिरव्यागार माडाच्या झाडावर चढून शहाळे काढणारे, दोन मिनिटात नारळ सोलणारी कोकणी माणसे पाहून आपल्याला कुतुहल वाटतेच. मोठ्या पावसातही तग धरून राहणारी जांभा दगडांची कौलारु घरे तर निराळीच आहेत!

नवलाई देवी
नवलाई देवी

वेळणेश्वरचे मंदिर

वेळणेश्वरचे मंदिर अगदी शांत आणि परिसर हवेशीर आहे. वेळणेश्वरचे शिवमंदिर नजरेस पडते. त्यामागे लागूनच निळाशार समुद्रकिनारा पाहावयास मिळतो. निसर्ग परिसरातील या मंदिरात गेल्यानंतर मन प्रसन्न आणि शांत होतं. पोफळीच्या बागा आपसुकच तुमचं लक्ष वेधून घेतो. 'नवसाला पावणारा वेळणेश्वर' अशीही याची ख्याती आहे.

मंदिरासमोर १०-१२ फूट उंचीच्या दिपमाळा आहेत. घुमटाकार शिखर हे या मंदिराचे वेगळे वैशिष्ट्य म्हणता येईल. गाभाऱ्यात शिवपिंड असून त्यावर पाच फण्यांचा नाग आहे. या मंदिर परिसरात श्री गणपती, श्री लक्ष्मी नारायण, श्री काळ भैरव अशी मंदिरे आहेत.

वेळणेश्वर मंदिर
वेळणेश्वर मंदिर

वेळणेश्वर बीच

वेळणेश्वरची खासियत म्हणजे समुद्र किनार्‍यालगत अनेक खडकांची रांग दिसते. आजूबाजूला डोंगर आणि त्यात समुद्राच्या लाटा धडकून उमटलेली शिंपल्यांची नक्षी अतिशय सुंदर दिसतात. समुद्राच्या एका किनार्‍याच्या डोंगरातून एक नदी येऊन ती समुद्राला मिळते. हा अप्रतिम नजारा कुणाला आवडणार नाही.

कसे जाल?

चिपळूणजवळ वेळणेश्वर समुद्रकिनारा आहे. गुहागरपासून २२ किलोमीटर तर चिपळूणपासून एका तासांचा रस्ता आहे.

वेळणेश्वर
वेळणेश्वर

कुठे राहाल?

वेळणेश्वरात राहण्यासाठी काही रिसॉर्ट्स आहेत. जाण्यापूर्वी तुम्ही बुकिंग करू शकता. येथे घरगुती निवास व्यवस्था, निवासाचीही सोय आहे.

हेदवी बीच
हेदवी बीच

हेदवी – बामणघळ :

गुहागर तालुक्यातील हेदवी गावात हेदवी बीच आहे. चिपळूणपासून २५ किमी. अंतरावर हेदवी गाव आहे. समुद्राच्या खडकांमध्ये एक घळ आहे, त्यास बामणघळी म्हटले जाते. परिसरात उमा महेश्वर मंदिर आहे. कातळाला २५ फूट लांबीची चीर पडली असून यामध्ये समद्राच्या लाटा येऊन झडकतात. भरतीवेळी तर हे पाणी ३०-३५ फूट उंचावर उडते. निमुळत्या घळीचा हा अविष्कार तुम्हाला पाहायला नक्कीच आवडेल. (Maharashtra Konkan Tour)

बामणघळ
बामणघळ

कसे जाल?

गुहागरपासून २५ किमी. अंतरावर हे गाव आहे.

काय खाल?

उकडलेले मोदक, सुरमई, शहाळे, मच्छी, भात, वरण, आमटी, तांदळाची भाकरी, घावणे, पापड, सोलकढी, लोणचे, फणस भाजी, आंबे.

श्री दशभूज लक्ष्मी गणेश मंदिर – साध्या पद्धतीचे हे मंदिर तुमचं लक्ष वेधून घेणारे आहे. जागृत देवस्थान म्हणून हे मंदिर प्रसिध्द आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण तालुक्यात डोंगर माथ्यावर हे मंदिर आहे. या मंदिराची स्थापना पेशवे काळात झालीय.

तवसाळ फेरी बोट

जयगडहून तवसाळला फेरी बोट घेऊन जाता येते.

श्री दशभूज लक्ष्मी गणेश मंदिर
श्री दशभूज लक्ष्मी गणेश मंदिर

जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे-

गुहागर समुद्रकिनारा, सन वेळणेश्वर पॉईंट, राम मंदिर, श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिर, उमामहेश्वर देवस्थान हेदवी, नलवी धबधबा उमरठ, तवसाळ बीच इत्यादी.

गुहागर, वेळणेश्वर, हेदवीची ही तुमची ट्रीप तुम्हाला नक्कीच आठवणीत राहिल!

हेही वाचा : 

खारे वेळणेश्वरचा समुद्र अन्‌  बामणघळ


पुढारी ऑनलाईन डेस्क : मागील लेखात आपण सिंधुदुर्ग, रामेश्वर, देवबाग विषयी माहिती घेतली. यावेळी वेळणेश्वर तुम्हाला खुणावतोय. वेळणेश्वरच्या समुद्राला एकदा का होईना एकदा तरी भेट द्यायलाच हवी!
वेळणेश्वर या समुद्र काठच्या गावाला सृष्टीचा वरदहस्त लाभलेला आहे. गुहागर पर्यटन स्थळा मधेय वेळणेश्वर गावचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तीव्र उतारांचा वळनावळनांचा रस्ता उतरून गावात प्रवेश होतो.वेळणेश्वर हे गुहागर पासून साधारण 22 किलोमीटर अंतरावर गाव आहे. सुमारे 1200 वर्षांपूर्वीपासून गाव इथे वसलेले आहे.वेळणेश्वर मंदिराचा इतिहास म्हणजेच या गावाचा इतिहास आहे.
तवसाळ फेरी बोट -जयगडहून तवसाळला फेरी बोट घेऊन जाता येते. तवसाळ बीच

वेळणेश्वर बीच
बामणघळ
हेदवी बीच
श्री दशभूज लक्ष्मी गणेश मंदिर
उमामहेश्वर देवस्थान हेदवी
हेदवी नदी
नलवी धबधबा उमरठ  
सभोवताली नारळ - पोफळीच्या बागा , सुरक्षित आणि स्वच्छ समुद्र किनारा आणि लाटांच्या गाजेचे पार्श्वभूमीवर वेगळेपण जाणवते. वेला म्हणजे समुद्र किनारा , त्या तीरावर असणारा देव तो वेळणेश्वर किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून वेळणेश्वर . येथील गावकऱ्यांच्या मते 12 व्या शतकात इथे छोटे मंदिर होते त्यावेळी त्यास " वेळोबा " म्हणत.
मंदिर आवर खूपच मोठे आहे. त्यामाधेय 9-10 मित्र उंचीची दीपमाळ आहे. घुमटाकार शिखराचा सभामंडप , बाहेर पितळी ओटा , त्यावर चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फन्यांचा नाग आहे. गाभाऱ्यात अडीच - तीन फुटी लांबीची शिवपिंडी असून त्यावर शंकराचा मुखवट ठेवून पोशाख घालतात शिवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीच्या मागे कोनाड्यात पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता , महिषासुरमर्दिनी , गोपाळकृष्ण यांच्या पंच धातूच्या तर विठ्ठल रखुमाई ची पाषाण मूर्ती आहेत. मुख्य मंदिराला लागुनच श्री काळ भैरव , श्री गणपती , श्री लक्ष्मि नारायण अशी मंदिरे आहेत . स्थानिक लोक या काळ भैरवाला कौल लावताना पहायची संधी मिळाल्यास ती जरूर बघावी.

मुसाफिरींची प्रतीक्षा करणारा दूधसागर धबधबा

'चेन्नई एक्सप्रेस'लाही गोडी लावणारा दूधसागर धबधबा

 
भारतात निसर्गात फिरण्यासाठी आणि एकांतासाठी अनेक ठिकाणे आहेत. अनेकदा असं होतं की, आपल्याला काही ठिकाणे लवकर माहिती होत नाहीत. निसर्गाच्या कुशीत लपून बसलेल्या या ठिकाणापर्यंत पोहोचणं, एखाद्या चमत्कारापेक्षा कमी नाहीये. असेच एक ठिकाण म्हणजे दुधासारखा अखंड वाहणारा, चमचमत्या ताऱ्यांप्रमाणे जल वाहून नेणारा आणि खळाळत एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणारा धबधबा म्हणजे 'दूधसागर.' याचा अर्थ स्पष्ट आहे. दूधसागर म्हणजेच दुधाचा धबधबा असं म्हणता येईल. सामान्य धबधब्याशी याची तुलना करण्याची कल्पना अजिबात करू नका. कारण, दूधसागर पाहिल्यानंतर तुमचे तोंड आ वासून राहील.
 
तुम्ही सफर करणारे 'राही' असाल तर सर्वात आधी फिरण्यासाठी 'दूधसागर' निवडा. कारण, हा धबधबा मोल्लेम राष्ट्रीय उद्यानाच्या क्षेत्रात आहे. हे ठिकाण अद्भूत, भव्य आणि निसर्गाची ओढ लावणारं आहे.
 
दूधसागर धबधबा-
 
भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक दूधसागर असून त्याची उंची ३१० मीटर (१०१७ फूट) आणि लांबी ३० मीटर (१०० फूट) यांच्या दरम्यान आहे. गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर हा धबधबा आहे. येथे जाण्यासाठी ज‍वळचे दोन रस्ते आहेत. एक गोव्याहून आणि दिसरा कर्नाटकाहून. तुम्ही जर कोल्हापूरहून जाणार असाल तर कोल्हापूर-बेळगाव-भीमगढ जंगल मार्गे-कॅसल रॉकला जाता येते. कॅसल रॉक हे रेल्वे स्टेशनचं ठिकाण आहे. या स्टेशनवर राणी चेन्नमा एक्सप्रेस गाडी थांबते. या रेल्वेतून जवळपास २ तासांचा प्रवास करून दूधसागर धबाधबा ठिकाणापर्यंत जाता येते.
 
 दूध सागर धबधबा गोवा आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर मांडवी नदीवर स्थित आहे. हा धबधबा भारतातील पाचव्या क्रमांकाचा आणि जगातील २२७ व्या क्रमांकाचा सर्वात सुंदर धबधबा आहे.
 
ट्रेकिंगसाठी थ्रील अनुभव -

तुम्ही जर ट्रेकला जाणार असाल तर हिच रेल्वे धबधब्यापासून काही किलोमीटर अंतर अलिकडे जंगलामध्ये फक्त ३० सेकंदासाठी थांबते. रेल्वेचे दुसरे इंजिन जोडूपर्यंत या ३० सेकंदाच्या वेळेतच रेल्वेतून खाली पटापट उतरावं लागतं. ही रेल्वे तुम्हाला सोडून पुढे दक्षिण भारताकडे मार्गक्रमण करते. अनेक बोगदे पार केल्यानंतर तुम्ही धबधब्याजवळ पोहोचता. बोगद्यातून आणि रेल्वे ट्रॅकवरून धबधब्यापर्यंतचा प्रवास एक थ्रीलचं असतो. तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही, असा हा प्रवास घडतो. खडकाच्या डोंगरांमधून वाहणारा धबधबा पाहून डोळे दिपतात. दूर अंतरावरून येणारे पाण्याचे फवारे ओलेचिंब करून जातात. एकीकडे धबधबा आणि दुसरीकेड जाणारी रेल्वे...यातून घडणारा प्रवास अवर्णनीय असतो.
 
यावेळी ''कोकरुसे नाचणारे खेळणारे नग्न पाणी, उंच काळ्या फत्तरींचे पांढरे फेसाळ पाणी''... यावेळी गोमंतक पुत्र कवी बा. भ बोरकर यांची कविता आठवल्याशिवाय राहत नाही.
 
धबधब्याच्या शिरोमणीवर नजर टाकली की, हे पाणी नेमकं येतं तरी कोठून? असा प्रश्न आपसूक मनात येतो. बा. भ. बोरकर यांची सुंदर कविता आहे. माझ्या गोव्याच्या भूमीत गड्या नारळ मधाचे कड्या-कपाऱ्यांमधून घट फ़ुटती दुधाचे!!
 
दूधसागर धबधब्यापर्यंत कसे जाल ?
 
या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेळगाव मार्गे कॅसल रॉक रेल्वे स्टेशन आहे. बेळगाव सोडल्यानंतर भीमगढ अभयारण्यातून (कर्नाटक) रस्ता आहे. भीमगढच्या जंगलात भीमगढचा किल्लादेखील आहे. हे जंगल आरक्षित असल्याने येथे सहजासहजी प्रवेश मिळत नाही. भीमगढची घनदाट जंगले मागे टाकत गाडीने कॅसल रॉक रेल्वे स्टेशना पोहोचता येईल. येथे उत्तरेकडून येणारी रेल्वे जी दिक्षण भारतात जाते, ती पकडता येईल. बेळगावपासून (कर्नाटक) सुमारे ८० कि.मी. या अंतरावर आहे. महत्त्वाचं म्हणजे, दूधसागर धबधब्याजवळ कोणतेही रेल्वे स्टेशन नाही. त्यामुळे जाणकार व्यक्ती किंवा गाईडला घेऊन जाणे सोईस्कर ठरेल. पावसाळ्यात हा धबधबा डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरतो.

तुम्ही जर गोव्याहून येणार असाल तर भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यातून टॅक्सी घेऊन जाता येईल. हा एकमेव र्स्ता आहे, जो धबधब्यापर्यंत जातो. पणजी (गोवा) पासून ६० किमी. अंतरावर दूधसागर आहे. तसेच मडगावपासून ४६ किमी. अंतर आहे.
 
या धबधब्याची सुंदरता आणि सभोवतालची पानझडीचा आनंद घेण्यात मजा आहे. जर तुम्ही पहिल्यांदा प्रवास करत असाल तर ज्या प्रकारच्या रस्त्यांवरून येथेपर्यंत पोहोचता येते आणि दूधसागर पाहण्याचे जे थ्रील आहे, ते तुम्हाला अधिक उत्साहित करेल. तुम्ही आसपासच्या ठिकाणे फिरला तरीदेखील तुम्हाला ती ठिकाणे जंगलांनी वेढलेली दिसतील. याच गोष्टी पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत.
 
बॉलिवूड चित्रपटांचे शूटिंग -

'चेन्नई एक्सप्रेस' चित्रपटातील एका भागाचे शूटिंग याच धबधब्यावर झाले आहे. 'चेन्नई एक्सप्रेस' या चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण यांच्यावर काही दृश्ये या धबधब्यावर चित्रीत करण्यात आली होती. उन्हाळ्यात हा धबधबा कोरडा पडतो. मात्र इतरवेळी हा धबाधबा पाहायला जाणे, हे पर्यटकांचे स्वप्न असते.
 
भगवान महावीर अभयारण्य किंवा मोल्लेम राष्ट्रीय उद्यान -
 
दूधसागर धबधबा भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यान यांच्या मध्ये आहे. एका बाजूला डोंगर कपाऱ्यांमधून वाहणारा धबधबा आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड घनदाट वने आणि पाने -फुले, औषधी वनस्पतींनी वेढलेली जंगले असा सगळा निसर्गाचा पसारा दूधसागरच्या सभोवताली पाहता येतो. धबधब्या भोवती जैवविविधतेने समृद्ध असे भगवान महावीर अभयारण्य आणि मोल्लेम राष्ट्रीय उद्यान आहे.
 
मोल्लेम जंगल हे घनदाट सदाबहार आणि निम्न-सदाबहार वनांनी वेढलेले आहे. हे जंगल विशाल वन्य जीव विविधतेने नटलेले आहे. येथे वाघ, बिबट्या, गवे आणि अन्य २०० हून अधिक पक्ष्यांच्या प्रजाती आणि आहेत. येथे मायसेना जीनस नावाची प्रकाश देणारी मशरुमची प्रजातीही आढळते. तसेच किंग कोबरा, हंप-नोज्ड पिट वायपर, इंडियन रॉक पायथॉनअसा सापांच्या प्रजाती आढळतात.
 
तांबडी सुरला - माझ्या गोव्याच्या भूमीत वनश्रीची कारागिरी पाना-फ़ुलांची कुसर पशु-पक्ष्यांच्या किनारी!!'' ही बा. भ. बोरकरांनी लिहिलेली कविता येथील निसर्गाला तंतोतंत लागू पडते. तांबडी सुरला येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. अनोख्या शैलीतील या मंदिराची निर्मिती १२ व्या शतकात झाली आहे. हे मंदिर कदंब यादव वंश काळातील वास्तुकला शैलीचे एकमेव स्मारक आहे. तांबडी सुरला मंदिर पणजीपासून ६६ किलोमीटर आहे. तांबडी सुरला जवळ धबधबादेखील आहे. जो तांबडी सुरला मंदिरापासून २१ किलोमीटर अंतरावर आहे.
 
नेत्रावली धबधबा

पश्चिम घाटात वाईल्डलाईफ सॅन्चुरी येथील नेत्रावली धबधबा सर्व निसर्गप्रेमींसाठी उत्तम ठिकाण आहे. मान्सूनमध्ये फिरण्यासाठी हे सर्वांत उत्तम स्थळ आहे. येथे बर्ड वॉचिंग आणि स्पॉटिंग वाईल्ड लाईफ पाहू शकता. येथे Mhadei Wildlife Sanctuary सर्वात प्रमुख आहे.

आणखी काय पहाल -
 
बोंडला वन्यजीव अभयारण्य

मोलमेल नेशनल पार्क

सहयाद्री स्पाइस फार्म

दूधसागर वृक्षारोपण और फार्मस्टे

भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य

श्री राक्षस मल्लिकेश्वर टेम्पल कुलेम

शेवटी म्हणावंस वाटतं-

''निसर्ग-लीला निळी काजळी
कथुनि कायसें काळिज निखळी
एकाची सगळी वसती-
तेथें कर माझे जुळती''
- कवी ,लघुकथा लेखक ,कादंबरीकार गोमंतक पुत्र कवी बा. भ. बोरकर

Friday, July 19, 2024

रहस्यमयी पर्यावरण अन् अफाट निसर्ग सौंदर्याचं लेणं मानस सरोवर -

मानस सरोवर केवळ धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्वासाठी ओळखले जात नाही तर या पर्वत परिसराचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे येथील निसर्ग आणि पर्यावरण. प्रत्येक वर्षी शेकडो लोक मानस सरोवराच्या यात्रेला जातात. कैलास पर्वताला धरतीचे केंद्र मानले जाते. भगवान शिवचे निवासस्थान अशी ओ‍ळख असलेले कैलास पर्वत जैन आणि बौद्ध बांधवांसाठी धार्मिक महत्त्व अधोरेखित करते आणि याच पर्वताच्या कुशीत असलेल्या मानस सरोवराच्या धार्मिक अन्‌ सांस्कृतिक महत्त्वामुळेचं‌ येथील अफाट निसर्ग सौंदर्य आणि पर्यावरण यांची सांगड घातली गेली आहे. हा निसर्ग अनुभवण्यासाठी कैलास-मानस सरोवराची यात्रा केली जाते. अगदी प्राचीन काळापासून मानस सरोवर हे एक तीर्थस्थान म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. हे तिबेटच्या हद्दीत येत असले, तरी त्याचे मोठे आकर्षण भारतीयांनाच आहे. हिमालय पादाक्रांत करून गेल्यावर तिबेटचे पठार लागते. तिथून सुमारे ३२.१८७ किलोमीटर गेल्यावर पर्वतांनी वेढलेली दोन सरोवरे लागतात. एकाचे नाव आहे राक्षसताल आणि दुसर्‍याचे मानस सरोवर. ही दोन सरोवरे मनुष्याच्या दोन डोळ्यांसारखी असून दोन्हींमध्ये नाकासारखा उंच उठलेला एक पर्वत आहे. ह्या पर्वतामुळेच ही दोन्ही जलाशये वेगवेगळी होतात. त्यापैकी राक्षसताल हे आकाराने फार मोठे आहे. शिवाय ते गोल नाही व चौकोनीही नाही. त्याच्या कित्येक भुजा अनेक किलोमीटर दूर पसरलेल्या आहेत आणि अनके वेडीवाकडी वळणे घेत पर्वतांच्या पोटात घुसलेली आहेत. लंकेचा राजा रावण याने ह्या सरोवराच्या काठी शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी तप केले. म्हणून त्याला राक्षसताल हे नाव मिळाले. मानस सरोवर हे अंडाकृती आहे. मानस सरोवराची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे १५ हजार फूट आहे. त्याचा परिघ सुमारे ५४ मैलांचा आहे. तसेच पाण्यावर दिवसभर लहरी उमटत असतात. रात्री मात्र ते शांत असते. मानस सरोवरात मासे आहेत, तसेच मानस सरोवर हे राजहंस पक्ष्याचे वसतिस्थान आहे. राजहंस आणि नुसताच हंस अशा हंसांच्या दोन जाती तिथे आहेत. राजहंस शुभ्र असतात तर सामान्य हंस मातकट पांढरे किंवा काहीसे बदामी रंगाचे असतात. या सरोवरात कमळे नाहीत. संस्कृत आणि अन्य भारतीय भाषांत मानस सरोवराचा उल्लेख अनेकदा येतो. मानस सरोवराचा पृष्ठभाग नेहमीच बर्फाच्छादित असतो. त्याच्या तळाशी उकळत्या पाण्याचे झरे आहेत. त्यातून निघणार्‍या वाफेच्या दाबाने मानस सरोवराच्या पृष्ठावरच्या बर्फाचे मोठमोठे खंड हिवाळ्यात त्याच्या काठावर फेकले जातात. त्यामुळेच मानस सरोवराचा बर्फाच्छादित भाग भेगाळलेला दिसतो. या पोटातल्या कढत पाण्याच्या झर्‍यांमुळे मानस सरोवराचे पाणी समशीतोष्ण असते. त्यामुळे त्यात स्नान करणे त्रासदायक वाटत नाही. हिवाळ्यात ह्या सरोवरातील पाणी गोठून त्याचे बर्फ होते. उन्हाळ्यात हे बर्फ वितळते, पण त्यामुळे कोणतेही अनर्थ होत नाहीत. ते पाणी आपली नैसर्गिक मर्यादा ओलांडत नाही. बर्फ विरघळते, तेव्हा एक रहस्यमय आवाज दूरदूरपर्यंत ऐकू येतो. आजपर्यंत समजू शकलेले नाही की, हा आवाज कुठून येतो. हा मृदंगाचा आवाज असल्याचे भाविक मानतात. आदिम काळी मानस सरोवराचे पाणी राक्षसतालामध्ये जात असे, असे म्हणतात. पण सध्या तरी तसे होताना आढळत नाही. जलधारेचे ते स्थान आजही दिसून येते. पण, अलीकडच्या काळात त्याची उंची वाढलेली आहे. प्रत्यक्षात मानस सरोवरातून कोणत्याही नदीचा उगम दिसत नाही. पण संशोधकांचे मत असे आहे, की मानस सरोवराचे पाणी भूगर्भातून कित्येक किलोमीटर दूर जाऊन मग वर येते आणि तेच ठिकाण एखाद्या नदीचे उगमस्थान ठरते. शरयू व ब्रह्मपुत्रा या नद्या अशाच प्रकारे मानस सरोवरातून उगम पावल्या आहेत. माहितीनुसार, जैन धर्म अनुयायी मानतात की, पहिले तीर्थकर ऋषभनाथ यांना कैलाश पर्वतावर तत्वज्ञान प्राप्त झाले होते. जैन भक्त कैलासला अष्टपद म्हणतात. कारण ऋषभदेवांनी आठ पायऱ्यांमध्ये प्रवास केला, असे त्यांचे मत आहे. बौद्ध अनुयायींचे मानणे आहे की, या स्थानी येऊन त्यांना निर्वाण प्राप्ती होते. भगवान बुद्ध यांच्यानंतर बौद्ध धर्मातील तमाम प्रसिद्ध लामांनी १७ व्या शतकात येथे प्रवास केल्याचे म्हटले जाते. कैलास पर्वताला बौद्ध 'कांग रिनपोचे' देखील म्हणतात असं म्हटलं जातं की, मानस सरोवर नजीक भगवान बुद्ध महाराणी माया यांच्या गर्भात आले. कैलासपर्वते राम मनसा निर्मित परम्। ब्रह्मणा नरशार्दूल तेनेहं मानसं सरः॥ महर्षी विश्वामित्र श्रीरामाला म्हणतात, “हे नरशार्दूल रामा, कैलास पर्वतावर ब्रह्मदेवाने आपल्या मनापासून निमाण केलेले एक विशाल सरोवर आहे. मनोनिर्मित असल्यामुळेच त्याला मानस सरोवर असे म्हणतात.” म्हणजेच हे सरोवर ब्रह्मदेवाच्या मनातून निर्माण झालेले आहे. महाभारतात असे वर्णन केलेले आहे- ततो गच्छेत राजेन्द्र मानसं तीर्थमुत्तमम्। तत्र स्नात्वा नरो राजन् रुद्रलोके महीयते॥ हे नृपश्रेष्ठा, उत्तम अशा मानस तीर्थाला जावे. तिथे स्नान केल्याने हे राजा, मनुष्याची रुद्रलोकामध्ये पूजा होते. विष्णूने जो पहिला अवतार घेतला, तो मत्स्यावतार होय. तो अवतार मानस सरोवरात घेतला, असे वामन पुराणात म्हटले आहे. येथे सती देवीच्या शरीराचा उजवा हात पडला. म्हणूनच, दगडी दगडाचे रूप म्हणून येथे त्याची पूजा केली जाते. येथे एक शक्तिपीठ आहे. मानस सरोवराची यात्रा अत्यंत कष्टाची असते. मानस सरोवराकडे जायला हिमालयातून अनेक पायवाटा आहेत. त्या सर्वात अलमोड्यावरून जाणारा रस्ता जास्त सोयीचा समजतात. हा मार्ग सुमारे २०९ मैलांचा आहे. अलमोड्यापासून गर्बिआंग, पुढे लिपुखिंड आणि त्यापुढे तकलाकोट लागते. तकलाकोट हे तिबेटातील पहिले गाव होय. तकलाकोटापासून मानस सरोवराचा दक्षिणेकडील काठ सुमारे ४९ किलोमीटर आहे. तकलाकोटपासून पुढचा प्रवास अधिक त्रासाचा आहे. चालणे शक्य नसल्यास बसण्यासाठी घोडी व सामानासाठी खेचरे भाड्याने घ्यावी लागतात. हा भाग अगदी उजाड असून फूट-सव्वाफूट वाढणार्‍या काटेरी झुडुपांव्यतिरिक्त तिथे अन्य काहीही उगवत नाही. आसपास कुठेही, कसलीही लागवड करता येत नाही. हवा विरळ झाल्यामुळे धाप लागते व थकवाही फार येतो. वाटेत कुठेही घर नाही किंवा कुठलाही आडोसा नाही. असे म्हटले जाते की, मानसरोवरचे शुद्ध पाणी आहे. मानसरोवरात एकदा स्नान केले तर तो रुद्रलोकात पोहोचतो आणि जो मानसरोवराच्या मातीला स्पर्श करतो तो ब्रह्मलोकात पोहोचतो. येथील पाणी जो पितो त्याला देवाने निर्माण केलेल्या स्वर्गात जाण्याचा अधिकार प्राप्त होतो.

समुद्री जीवसृष्टी असलेला मोचेमाड समुद्रकिनारा

फारशी वर्दळ नसलेल्या आणि निवांत किनारा म्हणजे कोकण मधील वेंगुर्लेतील मोचेमाड. या समुद्रकिनाऱ्याचे कौतुक करावं तितकं कमीच आहे! मनाला भावणारा हा किनारा सहजासहजी नजरेस पडत नाही. म्हणूनच की काय याठिकाणी फारशी गर्दी नसते. विस्तीर्ण असा हा किनारा कोणालाही मोहात पाडेल, असा आहे. मोचेमाड वेंगुर्ल्यापासून ८-९ किमी अंतरावर आहे. तुम्ही बस, टॅक्सी किंवा खासगी वाहनाने तिथे पोहोचू शकता.


मोचेमाड समुद्रकिनारा निवांत आणि शांत आहे. वाहणारे खारे वारे स्पर्शून गेल्यानंतर कोकणात आल्याचा अप्रतिम अनुभव येईल. स्फटिकासारखाच स्वच्छ पाण्याचा अगदी प्राचीन समुद्रकिनारा हा आहे. समुद्राच्या लाटांवर स्वार होता येईल, इतका सुरक्षित आहे. समुद्रकिनाऱ्यावर खेळणारी स्थानिक मुलं आणि स्थानिक मच्छीमार वगळता याठिकाणी अजिबात गर्दी नसते.

मोचेमाड बीच हा निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि शांततापूर्ण सुट्टीसाठी एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही कुटुंब आणि मित्रांसोबत येथे भेट देऊ शकता. काही ठिकाी  काळ्या वाळूसाठी प्रसिद्ध असलेला हा किनारा पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. काजू आणि माडांच्या बनात वेंगुर्ला हिरवागार दिसतो. महाराष्ट्रातील कमी प्रदूषित समुद्र किनार्‍यांमध्ये वेंगुर्ल्याच्या किनार्‍यांचा समाविष्ट होते. मोचेमाड बीच सोबत सागरेश्वर बीच, निवती बीच, शिरोडा बीच,  वायंगणी बीच, तेरेखोल बीच हे पर्यटकांना खुणावतोय.

मोचेमाड या निळ्या समुद्रात दूरवर नजर फेकली असता अनेक नौका समुद्रावर हेलकावे घेताना दिसतात. पण याठिकाणी एकटे जाऊ नये, दोघे किंवा ग्रुपने गेल्यास अति उत्तम होईल. राहायचे झाल्यास जवळ काही अंतरावर असणारा सागरेश्वर समुद्रकिनारा उत्तम आहे. येथे राहण्यासाठी खोल्या उपलब्ध आहेत. याच ठिकाणी रात्रीच्या वेळी तुम्ही येथे कॅम्प फायर करून खळखळणाऱ्या समुद्राचा आनंद घेऊ शकता. टेंटमध्येदेखील राहण्याची सोय येथे केली जाते.  
मोचेमाड गाव तसे शांत आणि कमी वस्ती असणारं. भाताची, बांबूची शेती आणि हिरव्यागार निसर्गाने नटलेल्या दगडांच्या डोंगररांगेत मोचेमाड समुद्र मोठ्या डौलाने खळखळताना दिसतो.

 किनाऱ्यावर जुन्या गावाचे फिल देणाऱ्या वस्त्या, सर्वांचे लक्ष वेधून घेतात. प्रचंड पावसामुळे उतरत्या छपराची कौलारू घरे, कोकणी पद्धतीने बांधलेली अनेक घरे पाहून शहरी माणसांसाठी हा कुतुहलाचा भाग ठरतो. मोचेमाड कडे जाताना गर्द झाडीतील छोटे रस्ते, पोफळीच्या, सुपारीच्या बागा, केळीच्या बागा, काजूची मळे, नारळाची झाडे, असंख्य नानाविध प्रकारची झाडे, फुलांनी सजलेली पायवाट मोचेमाड किनाऱ्याकडे जाते. याठिकाणी पार्किंग करण्यासाठी कोणतेही पैसे लागत नाही. वाहनांचे पार्किंग केल्यानंतर १० ते १५ मिनिटांच्या अंतरावर चालत चालत किनाऱ्यावर पोहोचता येते.

हे बीच मोचेमाड गावात लपलेले आहे. थोडेसे आडवळणी असल्यामुळे येथे वेळ काढून जावे. अथांग पसरलेला समुद्र तोही विशालकाय जागेमध्ये जो आधी आपण कधी पाहिला नसेल असा, पाढंरी वाळू, सभोवताली नारळाची झाडे, खारफुटीची जंगल आणि समुद्राच्या लाटा धडकून शिंपल्यांनी सजलेली अनेक मोठे खडक लक्ष वेधून घेतात. येथील समुद्रकिनाऱ्यालगत विविध प्रकारांची जलजीवांची संरचना आढळतात. समुद्री शेवाळ, शिंपले आणि काळ्याकुट्ट पसरलेल्या दगडांमध्ये असंख्य खेकड्यांची घरे दिसतात. या खडकांमध्ये प्रचंड संख्येने असणारी विविध जातीची खेकडे आणि समुद्री जीव दिसतात. इथल्या समुद्रकिनाऱ्याच्या तटावर विविध प्रकारची वनस्पती आहेत.
 
मोचेमाड हा सोनेरी वाळूसाठी प्रसिद्ध आहे. हा किनारा निसर्गरम्य दृश्यांसह वेढलेला आहे आणि पर्यटकांसाठी आणि स्थानिकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. मोचेमाड समुद्रकिनारा हा कोकणात भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे. तुम्ही शांतता आणि निवांतता शोधत असाल किंवा जलक्रीडांचा आनंद घेण्यास उत्सुक असाल, तर तुम्हाला मोचेमाडमध्ये नक्कीच आवडेल. ऑक्टोबर ते फेबुवारी महिन्यांच्या दरम्यान भेट देण्यासाठी उत्तम वेळ आहे जेव्हा हवामान सुखद असते.
 
मोचेमाडला राहण्याची अथवा खाण्याची सोय नाही. राहण्यासाठी मोचेमाड पासून जवळ असणाऱ्या सागरेश्वर किनाऱ्यालगत अनेक होम स्टे, हॉटेल्स उपलब्ध आहेत. बजेट हॉटेल्सपासून ते लक्झरी रिसॉर्ट्सपर्यंत अनेक निवास पर्याय उपलब्ध आहेत.तुम्हाला येथे ताजी सीफूड आणि स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल.
 
कोल्हापूर-राधानगरी अभयारण्य रोड-फोंडा घाट-फोंडा-पनवेल कोची कन्याकुमारी हायवे-कुडाळ तिट्टा-वेंगुर्ला बेळगाव रोड-वेंगुर्ला असा प्रवास करत वेंगुर्ला याठिकाणी पोहोचता येते. शिरोडा नजीक असणारे वेंगुर्ला हे पर्यटन स्थळ नजरेत भरणारे आहे.  फोंडा घाटापासून दिड तास अंतरावर वेंगुर्ला हे ठिकाण आहे. वेंगुर्लापासून गोवा हे केवळ तीन तास अंतर आहे. वेंगुर्ला बाजार जसे वर्दळीचे ठिकाण तसे पुढे पुढे गेल्यानंतर ही वर्दळ कमी होताना दिसते.  

मानसीश्वर मंदिर, वेतोबा मंदिर, सागरेश्वर बीच, सागरेश्वर मंदिर, मासळी बाजार, केपा देवी मंदिर, डच फॅक्टरी, गर्द झाडीतील श्री नारायण मंदिर, श्री देव तांबळेश्वर मंदिर, सातेरी भद्रकाली मंदिर, सागरेश्वर मंदिर अशी किनाऱ्यावरील सुंदर पर्यटनस्थळे भटकंती करून पाहता येतात. तुम्ही स्थानिक बाजारपेठेतून ताजी सीफूड आणि हस्तकला खरेदी करू शकता आणि स्थानिक संस्कृतीचा आनंद घेऊ शकता. समुद्रकिनारी नारळाची झाडे आणि आसपासचे मनमोहक दृश्ये तुम्हाला मंत्रमुग्ध करतील. तुम्ही येथे पोहणे, सूर्यस्नान, बोटिंग आणि मासेमारीचा आनंद घेऊ शकता.

वेंगुर्ला परिसरात काही ठिकाणी घरगुती खानावळी आहेत. तेथेही तुम्ही जेवू शकता. अस्सल कोकणी पद्धतीचे जेवणदेखील येथे मिळते. रेस्टॉरेंट, हॉटेल उपलब्ध आहेत.  यामध्ये विविध प्रकारचे मच्छी करी, मासे, बांगडा,  मच्छी, गोलमा, झिंगे, कडी भात, पापलेट, रोहू, कटला, सुरमई, किंग कोळंबी, तांदळाची भाकरी, अंडाकरी, चिकन तर शाकाहारमध्ये चपाती, भाजी, भात, लोणचे, पापड, वरण, श्रीखंड, उकडी मोदक, नाश्ताला शहाळे, घावणे-चटणी, चहा, पोहे,  कांदा भजी इ. 

मातीचे आरोग्य: अन्नसुरक्षा, पर्यावरण आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा पाया

माती ही केवळ शेतीची जमीन नसून ती संपूर्ण सजीवसृष्टीचा आधार आहे. मानवाचे अस्तित्व, अन्नाची निर्मिती, जलसाठ्यांचे संवर्धन, हवामान संतुलन आणि ज...